वीस वर्षे लागली पण उद्धव ठाकरेंनी करून दाखवलं !!

इतके दिवस सुरू असलेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीचा खेळ काल संपला. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांची महाराष्ट्र विकास आघाडी होणार आणि उद्धव ठाकरे शिवाजी पार्क मध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार हे निश्चित झाले.

शिवसेनेसाठी एक वर्तुळ पूर्ण झाले.

वीस वर्षांपूर्वी 1999 ला नारायण राणे मुख्यमंत्रीपदावरून पाय उतार झाले आणि शिवसेनेचा भगवा विधानभवनावरून खाली उतरला.ते शासन शिवसेना भाजप युतीच होतं पण पराभवाच सर्वात जास्त दुःख शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना झालं होतं.

एकेकाळी व्यंगचित्रकार असणाऱ्या या माणसाने साठच्या दशकात मराठी माणसासाठी लढणारी सेना बनवली, रक्ताचं पाणी करून तिला मोठं केलं. अनेक आंदोलने, खाचखळगे, तुरुंगवाऱ्या सगळं सोसून 1995 साली शिवसेनेला सत्तेपर्यंत आणलं.

सगळे शिवसैनिक तेव्हा त्यांना म्हणाले होते की तुम्हीच मुख्यमंत्री झाल पाहिजे. पण बाळासाहेबांनी नकार दिला.

मनोहर जोशींना खुर्चीवर बसवलं आणि रिमोट आपल्या हातात ठेवला. जेव्हा जोशींवर आरोप झाले, त्यांना सरकार चालवणे झेपत नाही हे लक्षात आल्यावर नारायण राणेंना मुख्यमंत्री केलं.

त्यावेळी पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांचा नाव चर्चेत आलं होतं,

अस म्हणतात की ते देखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते पण बाळासाहेबांनी आधीच सांगितलं होतं ठाकरे घराण्यातील कोणीही आता तरी सत्तेत सहभागी होणार नाही.

पुढे शिवसेनेच्या कार्याध्यक्ष पदी उद्धव आल्यानंतर बाळासाहेबांनी त्यांना आपला वारसदार निवडलंय अशीच चर्चा झाली. राणे, राज ठाकरे असे मोठे नेते पक्ष सोडून गेले. सगळ्यांनी खापर उद्धव वर फोडलं.

कोणी म्हणायचं उद्धव यांच्याकडे बाळासाहेबांचा करिष्मा नाही, राज जस भाषण करतो ते उध्दवला जमत नाही. कोण म्हणायचं तो फोटोग्राफर त्याला राजकारण काय कळतं, बाळासाहेबांच्या नंतर शिवसेना संपेल. त्यांच्या कॉर्पोरेट स्टाईल ला सुद्धा नावे ठेवण्यात यायचं.

राज ठाकरे म्हणाले होते,

“माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलय.”

1999 नंतर 2004 सालच्या निवडणूका शिवसेनेने उध्दवजींच्या नेतृत्वाखाली लढल्या.

तेव्हा बाळासाहेब वयोमानानुसार हळूहळू प्रचारातून लांब चालले होते. तेव्हा शिवसेनेचा पराभव झाला. 2009 लाही असेच घडले. फक्त मुंबई महानगरपालिका सोडल्यास सगळीकडे शिवसेनेचा पराभव होत होता, राज ठाकरेंच्या मनसेमध्ये विभागलेली मते हे देखील कारण होतं.

आपल्या अखेरच्या काळात बाळासाहेब राजकारणापासून दूर होत गेले होते. महाराष्ट्रात भगवा फडकला पाहिजे हे त्यांचं स्वप्न अपूर्णच होतं.

शेवटी शेवटी वाढवलेली दाढी, तोंडात चिरुट, डोळ्यावर गॉगल, अंगात भगवी कफनी, गळ्यात माळ, वाढलेली दाढीयामुळे बाळासाहेब एखाद्या सिद्धपुरुष योग्याप्रमाणे भासायचे.

उध्दववर कितीही टीका झाली तरी बाळासाहेबांनी त्यांच्यावरचा विश्वास कधी कमी होऊ दिला नाही. अस म्हणतात की उध्दवनी बाळासाहेबांच्या अखेरच्या दिवसात त्यांना वचन दिलेलं

की एक ना एक दिवस शिवसेनेचा मावळा मुख्यमंत्री बनवणारच.

2012 ला बाळासाहेबांचा मृत्यू झाला.

त्यांनंतर नरेंद्र मोदी नामक नव्या हिंदुहृदयसम्राटाच आगमन झाल. आता शिवसेना संपणार अस म्हणता म्हणता उध्दवनी शिवसेना टिकवली. मोठ्या मोठ्या लाटांमध्ये हेलकावे आले पण सेनेच तारू डगमगल नाही.

2014 च्या विधानसभा निवडणुका मध्ये पहिल्यांदाच शिवसेना भाजप युती तुटली. स्वतःवरील अति आत्मविश्वासामुळे भाजपने त्यांची साथ सोडली मात्र पुढे काही महिन्यांनी त्यांना शिवसेनेकडे यावेच लागले.

पण याकाळात फडणवीस सरकारने शक्य तेवढा शिवसेनेचा अपमान केला आणि उध्दवनी ते हलाहल प्राशनही केले.

सत्तेत असूनही वेळप्रसंगी सरकारला विरोध करत युतीचा गाडा 5 वर्ष ढकलला.

2019 च्या लोकसभा निवडणूका व विधानसभा निवडणुका त्यांनी युती करून लढल्या. उद्धव म्हणतात की त्यावेळी आमचा फॉर्म्युला ठरला होता की सत्ता आली तर सगळी पदे दोन्ही पक्षात समसमान वाटायची, मुख्यमंत्री पदा सकट.

यावेळी शिवसेना पूर्ण शक्तीनिशी निवडणुकीला उतरली होती. स्वतः आदित्य ठाकरे यांना तिकीट दिल होतं.

पहिल्यांदाच ठाकरे कुटूंबातील कोणीतरी निवडणूक लढत होता. महायुतीला निवडणुकीत विजय मिळाला. पण भाजपच्या जागा कमी होऊन फक्त 105 वर आल्या.

पण तरीही निकालानंतर फडणवीस सरकारने शिवसेनेबरोबर मुख्यमंत्रीपद वाटून घेण्यास इन्कार केला.

चर्चेची गुऱ्हाळे बसली, कोणतेही उत्तर आले नाही. उद्धव ठाकरे म्हणत राहिले की मी माझ्या शपथेला बांधील आहे, आम्हाला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद पाहिजे.

त्यांनी वाट पाहिली. संयम दाखवला. चर्चेची सगळी सूत्रे संजय राऊत यांच्याकडे दिली व स्वतः बॅकसीटवर राहून फक्त पहात होते. अनेकांनी त्यांच्या संयमावर टीका केली. एरवी तडकफडक असणारी शिवसेना वेट अँड वोच च धोरण स्वीकारली होती.

पण उध्दवनी योग्य वेळी घाव घातला.

अखेर  शिवसेनेने राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत आघाडी केली. अनेक घडामोडीनंतर पवारांनी सर्वसहमतीचा उमेदवार म्हणून उद्धव ना निवडले.

काल रात्री त्यांचे बाळासाहेबांच्या आठवणींपुढे नतमस्तक झालेले फोटो व्हायरल झालेत. एक वचन पूर्ण झाले आहे.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.