अनिल कपूरनं कांड केलं आणि आमिरचं फिल्मफेअर गेलं.

कोणाला काय शंका असतात काही सांगता येत नाही. आमचे एक भिडू आहे पियुष बेणीचेटके. त्यांना एक प्रश्न पडला,

आमिर खान अवॉर्ड शो ला का येत नाही?

खरंतर भारतात जागतिक दर्जाचा हा प्रश्न आपल्या पैकी अनेकांना पडतो. त्यातले लई जण छातीठोकपणे सांगतात की यामागे शाहरुख खान आहे. तस हे बेन हायच जरा चाबरं..!

बरोबरच आहे. आमिर खानने अवॉर्ड घ्यायचं कमी केलं, सलमानचं पिक्चरपेक्षा ऐश्वर्या आणि काळवीटाताच लै लक्ष होत. बच्चनचं वय झालेलं, अजय अक्षय मोठे स्टार झाले नव्हते. आमिरने अवॉर्ड घ्यायचं कमी केल्याचा सगळ्यात जास्त फायदा शाहरुख खानला झाला.

पण तुमचा अंदाज चुकतोय. हे पुण्यकर्म शाहरुखच नाही तर हे आहे आपल्या झक्कास भिडू अनिल कपूरच !!

1993 चे फिल्मफेअर अवॉर्डस. भारतात या अवॉर्डसना मान होता. अवॉर्ड शोचा सुळसुळाट झाला नव्हता. एखाद्या सण-समारंभाप्रमाणे आवरून सजून मुंबई फिल्मइंडस्ट्रीचे सगळे स्टार फिल्मफेअरच्या अवॉर्ड फंक्शनला हजर व्हायचे. तसच त्यावर्षी देखील होतं.

कॉम्पिटेशन पण जोरात होती. 1992 मध्ये बरेच भारी भारी सिनेमे आले होते. राजू बन गया जंटलमन, बेटा, खुदा गवाह, जो जिता वही सिकंदर, दिवाना लिस्ट खूप मोठी होती. सगळेच चांगले गाजले होते. फक्त पब्लिकलाच नाही तर फिल्मइंडस्ट्रीला सुद्धा उत्सुकता होती की,

कोण फिल्मफेअर जिंकणार?

त्या वर्षीच्या बेस्ट ऍक्टर नॉमिनेशनची लिस्ट खूप इंटरेस्टिंग होती. यात होता राहुल रॉय जुनून या सिनेमासाठी. (त्यात तो वाघ होत असतो, असो) शतकाचा महानायक अमिताभसुद्धा रेस मध्ये होता. त्याला “खुदा गवाह” साठी नॉमिनेशन मिळालं होतं. हे सोडून आमिर खान होता “जो जिता वही सिकंदरठ साठी आणि अनिल कपूर “बेटा”साठी.

खर तर आजही हे सिनेमे बघितलं तर कोणीही म्हणेल की आमिर खानचा “जो जिता वही सिकंदर” मधली एकटिंग जबरदस्त झालेली. त्याला स्वतःला देखील खूप आत्मविश्वास होता. जो जिता वही सिकंदरने बॉक्स ऑफिस वर अपेक्षित यश मिळवलं नव्हतं पण क्रिटिक्स नि त्याच खूप कौतुक केलं होतं, शिवाय पहेला नशा वगैरे गाणी रेकॉर्ड ब्रेक गाजली होती.

आमिर खान ला यापूर्वी त्याच्या पहिल्याच पिक्चर साठी म्हणजे कयामत से कयामतसाठी बेस्ट डेब्युचा फिल्मफेअर मिळालेलं. त्यावर्षी अनिल कपूरला तेजाबसाठी बेस्ट ऍक्टरच अवॉर्ड मिळालेला. त्यांनतर आमिरला दरवर्षी नॉमिनेशन मिळालं पण हुलकावणी दिलेली. यावर्षी आमिरने खूप मेहनत घेतली होती.

त्यावर्षीच्या फिल्मफेअरला अवॉर्ड मिळणार म्हणून तो हजर तर होताच शिवाय जुही चावला बरोबर त्याने डान्स परफॉर्मन्सदेखील केला होता.

पण किती जरी घासला तरी त्यावर्षीसुद्धा फिल्मफेअर त्याला मिळालं नाही. तेव्हा परत अनिल कपूर जिंकला. सगळे आश्चर्यचकित झाले. आमिर भडकला. एकवेळ बच्चन ला खुदा गवाह साठी दिल असत तर ठीक आहे पण अनिल कपूर तेही बेटासाठी? बेटा पिक्चर सुपरहिट झाला होता पण ते अनिल मुळे नाही तर माधुरीच्या धकधक मुळे.

सगळ्यांना जाणवलं की दाल मै कुछ काला है. काही दिवसांनी कोणीतरी शोधपत्रकारिता केली. तेव्हा कळलं अनिल भाऊने स्कीम केल्या.

तेव्हा पद्धत होती की फिल्मफेअर मासिकामध्ये वोटिंगचा ऑप्शन असायचा. म्हणजे आपण त्यावरच फॉर्म भरून आपल्या आवडत्या सिनेमा, ऍक्टर, डायरेक्टर, संगीतकार अशाची नावे भरून ती लिस्ट टाइम्स च्या ऑफिस मध्ये पाठवून द्यायची. सगळ्यात जास्त वोट ज्याला मिळतील त्याला फिल्मफेअर मिळणार.

त्याकाळात ईव्हीएम नव्हतं. आता बॅलेट पेपर टाईप हे वोटिंग. तरी आपल्या अनिल भाऊने टेम्प्रिंग करायचं ठरवलं. त्याने म्हणे पाच हजार फिल्मफेअर मासिके विकत घेतली. सगळ्यात आपली नावे घातली आणि बेस्ट ऍक्टरची ट्रॉफी जिंकली.

आमिरला जेव्हा हे कळलं तेव्हा त्याने सगळं नाव फिल्मफेअरवर ढकललं. त्यांना माहीत न होता अनिल कपूर ही स्कीम करणे शक्यच नव्हतं. अनिल कपूरने पैसे देऊन हा अवॉर्ड विकत घेतलाय अस त्याच स्पष्ट म्हणणं होतं.

फिल्मफेअरने सरळ इन्कार केला. भांडणं झाली. आमिर खान म्हणाला,

तुम्ही आणि तुमचे अवॉर्ड गेले उडत. मी काय येत नसतो तुमच्या कार्यक्रमाला.

गंमत म्हणजे शाहरुख खानला त्यावर्षी “दिवाना”साठी बेस्ट डेब्यु मिळाला. पण त्याचा आणि आमिर-फिल्मफेअर भांडणात काही संबंध नव्हता.

त्याच्या पुढच्या वर्षी मात्र आमिरला “हम है राही प्यार के” साठी नॉमिनेशन मिळालं पण आमिर काय आला नाही. त्यावर्षी शाहरुख बाजीगर ठरला. त्याच्या पुढच्या वर्षी आमिर ने “रंगीला” मध्ये जादू दाखवली पण त्याला पण काही मिळालं नाही. नाही म्हणायला 1996 चा राजा हिंदुस्थानी, 2002 ला लगान, 2017 ला दंगल साठी त्याला पुरस्कार मिळाला. पण आमिर तिकडे फिरकला नाही. फक्त फिल्मफेअरच नाही तर नॅशनल अवॉर्ड, ऑस्कर अवॉर्ड हे सोडून बाकी सगळ्या पुरस्कारांना त्याने टाटा बाय बाय केलाय.

आता मजेची गोष्ट म्हणजे फक्त आमिर खान नाही तर सलमान खान, अजय देवगण, अक्षय कुमार, गोविंदा या मोठ्या सुपरस्टार वर सुद्धा अन्याय झालाय. त्यांना देखील बेस्ट ऍक्टर कधी मिळाला नाही. अजय देवगण सोडून बाकीचे अवॉर्डला येतात डान्स करतात, पैसे घेतात आणि निघून जातात. अक्षय कुमार तर स्पष्ट म्हणतो,

“मुझे अवॉर्ड नहीं सिर्फ रिवॉर्ड चाहीये.”

आणि शाहरुख खान? त्याला गेल्या तीस वर्षात 26 फिल्मफेअर नॉमिनेशन मिळालेत, त्यापैकी 8 वेळा तो जिंकला देखील आहे. तो दरवर्षी फिल्मफेअरला डान्स पण करतो, अँकरिंग देखील करतो पैसे पण घरी नेतो आणि अवॉर्ड पण.

प्रश्न उरला अनिल कपूरचा. बेटा नंतर त्याला कधी बेस्ट ऍक्टर मिळालं नाही.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.