संजय राऊत म्हणतायत त्याप्रमाणे मुंबईच्या पैशांवर गुजरातची बाजीरावगीरी सुरूय ?

स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरात राज्य वेगळे करण्यासाठी मोठा संघर्ष करण्यात आला होता. मराठी भाषिक आणि गुजराती भाषिक यांच्या अस्तित्वाची लढाई म्हणून या संघर्षाकडे बघितलं जातं. मात्र इतिहासाच्या याच संघर्षाच्या अध्यायात काही पानं मुंबईने स्वतंत्रपणे स्वतःच्या नावावर केली आहेत. ‘मुंबई नेमकं कुणाची?’ या तीन शब्दांवर लय मोठा तंटा झाला होता.

इतिहासातून डोकं वर काढत जर आज बघितलं तर या तंट्यातून काय निष्पन्न झालं, याचं उत्तर मिळतं. मुंबईला महाराष्ट्राची राजधानी म्हणून मोठ्या ऐटीत आपण मराठी लोक मिरवतो, हे तेव्हाच्या तंट्याचं यश आहे. मुंबई फक्त महाराष्ट्राची राजधानीच नाही झाली तर अक्ख्या भारतासाठी ‘स्वप्न नागरी’ झाली. देशभराला मुंबईचं असलेलं खूळ दाखवून देतं, की का गुजरात मुंबईचा अट्टहास करत होतं ते.

मात्र मुंबई महाराष्ट्राला मिळाली आणि गुजरातने मुंबईचा नाद सोडला असं जर तुम्ही समजत असाल, तर जरा थांबा. कारण ज्या कारणासाठी गुजरातला मुंबई हवी होती ते कारणच आता गुजरात महाराष्ट्रापासून हिरावून घेतंय, असं दिसतंय. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पुन्हा तंटा होण्याची चिन्हं निर्माण होताय भिडूंनो…

आताही सगळा वादंग उभा राहतोय तो एका सिटीमुळेच. ती म्हणजेच ‘गिफ्ट सिटी’. 

आम्हाला तर शाळेत या सिटीबद्दल शिकायला भेटलं नाही असं म्हणत जास्त लोड घेत भारताच्या नकाशात ही सिटी शोधायला जाऊ नका. कारण तिथे ती मिळणारच नाही. ही गिफ्ट सिटी म्हणजेच गुजरातचं ‘गांधीनगर’.

‘गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक’ असा या गिफ्ट (GIFT) नावाचा फुलफॉर्म.

गिफ्ट सिटी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वकांक्षी प्रकल्प असून गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली होती. आता नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आहेत. तेव्हा केंद्र सरकारच्या अनेक मंजुऱ्या आणि सवलती मिळवून गिफ्ट सिटीच्या उभारणीने वेग घेतला आहे.

मात्र महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये भांडणं सुरु करण्यात या गिफ्ट सिटीचा हात आहे. आणि याची सुरुवात झाली जेव्हा आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईऐवजी गुजरातमधील गांधीनगरमध्ये म्हणजेच गिफ्ट सिटीमध्ये सुरू करण्यात आलं. मुंबईचा मान जाणूनबुजून हिरावून घेतला असं महाराष्ट्र शासनाने तेव्हा म्हटलं होतं.

आता परत एकदा महाराष्ट्र गुजरातवर भडकलं आहे, याचं कारण म्हणजे ‘लवाद केंद्र’.

 २०१६ मध्ये मुंबईत आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र सुरू करण्यात आलं होतं. परंतु आता आर्थिक वादावर तात्काळ तोडगा काढण्याच्या उद्देशाने गिफ्ट सिटीमध्ये लवाद केंद्र सुरू करण्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केलीये. इतकंच नाही तर गिफ्ट सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यापीठे, हवामान बदलावरील उपायांवरील आर्थिक केंद्र उभारण्याची घोषणा १ फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

याचा परिणाम म्हणजे गेली पाच वर्षे मुंबईत सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राला गिफ्ट सिटीशी स्पर्धा करावी लागणार आहे. वित्तीय केंद्राला अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार हे मुद्दाम करत असल्याचा आरोप महाराष्ट्र शासनाकडून करण्यात येतोय. या मुद्यावरून आता राजकारण तापू लागले आहे.

गिफ्ट सिटी प्रकल्पाच्या स्थापनेनंतर मुंबईतील अनेक महत्त्वाचे केंद्र गुजरातमध्ये हलवण्यात आले आहेत. अनेक आर्थिक संस्था, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बँकांची कार्यालये आणि अन्य संस्थांनी गिफ्ट सिटीमध्ये कार्यालये स्थापन करून कामकाज सुरू केले आहे.

अनेक जागतिक दर्जाच्या परदेशी विद्यापीठांना मुक्तद्वार देण्यात आलं असून आर्थिक व्यवस्थापन, फिंटेक सायन्स, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित विषयक विविध अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. शिवाय या विद्यापीठांवर गिफ्ट सिटी प्राधिकरणाकडून नियंत्रण ठेवलं जाईल आणि या विद्यापीठांसाठी सोयीसुविधा पुरविल्या जातील, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र देशाची आर्थिक राजधानी मुंबईत उभारण्याची घोषणा तत्कालीन वित्तमंत्री प्रणव मुखर्जी यांनी अर्थसंकल्पात केली होती. पण केंद्रात सत्ताबदल झाल्यावर मुंबईचं महत्त्व कमी झालं. त्यामुळे गिफ्ट सिटीमधील वित्तीय केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर मुंबईत केंद्र उभारण्याचा विचार केला जाईल, असही केंद्र सरकारनं स्पष्ट केलं होतं.

या सर्व  गोष्टींकडे बघून महाराष्ट्रातील राजकारण्यांनी आवाज उठवायला सुरुवात केली आहे. 

मुंबईला ओरबडण्याचा, महत्त्वाचे उद्योग पळवण्याचा हा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. कोणत्याही राज्याचा विकास झाला तर देशाचाच विकास होणार आहे. मात्र ते करण्यासाठी मुंबईचा अपमान करणे हे कितपत योग्य आहे, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

केंद्राने त्यांच्या पैशांनी इतर राज्यांचा विकास करावा. त्यासाठी मुंबईच्या पैशांवर बाजीरावगीरी करू नये, असंही संजय राऊतांनी खडसावलं आहे. 

यासर्व प्रकाराकडे बघता गुजरात आणि महाराष्ट्राचा जुना वाद सर्वांना आठवताना दिसतो आहे. तेव्हाची आग अजूनही गुजरातच्या हृदयात सुप्तपणे सुलगत असल्याचं यावरून बोललं जातंय. तसंच गिफ्ट सिटीमार्फत मुंबईचं वैभव खेचुन घेण्याच्या या प्रकारातून हे सिद्ध होत असल्याच्याही चर्चा आहेत.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.