जगभरात हवा करणारे दोन धनाढ्य गुजरातचा किंग कोण यावरून तंटा करतायत

सत्ता. हे नाव आलं की लगेच मुकुट आणि सिंहासन आपल्याला आठवतं. आणि ती मिळवण्यासाठी खेळले जाणारे सगळे डावपेच, भांडाभांडी हे सुद्धा आठवतं. सत्ता हा एकमेकांवर शिरजोर होण्याचाच खेळ. ‘मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ कसा’ हे दाखवण्यात जीवाची बाजी लावताना आपण पक्षांना बघतो. ती गोष्ट वेगळी की श्रेष्ठ पेक्षा ‘योग्य कसा’ हे सिद्ध करण्याची इथे गरज असते. असो.

सत्तेचा हा मुद्दा निघण्याचं कारण म्हणजे गुजरातमध्ये सध्या चालू असलेला राडा. भारतातील सगळ्यात मालदार व्यक्तींमध्ये सध्या गुजरातचे कोर्पोरेट किंग बनण्यासाठी ओढाओढ चालू आहे. ते दोन व्यक्ती म्हणजे  मुकेश अंबानी आणि  गौतम अदानी. गुजरातच्या कॉर्पोरेट वर्ल्डवर स्वतःच्या कंपन्यांचा शिक्का लावण्यासाठी हे दोघेही तुटून पडले आहेत. सध्या यामध्ये अंबानी पुढे बसल्याचं दिसत आहे. पण  आगामी काळात अदानी त्यांना मागे टाकू शकतात, अशी सुद्धा चिन्हं आहेत.

अंबानी आणि अदानी या दोन्ही कंपन्यांनी अलीकडच्या काळात गुजरातमध्ये मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे.

मुकेश अंबानींनी काय धोरण अखलंय?

रिलायन्स पुढील १० ते १५ वर्षांत गुजरातमध्ये ग्रीन एनर्जी आणि इतर प्रकल्पांमध्ये ५.९५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनी राज्यात एक लाख मेगावॅट रिन्यूएबल एनर्जी प्लांट आणि ग्रीन हायड्रोजन पर्यावरणाच्या विकासासाठी ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.  याशिवाय, कंपनी सौर फोटोव्होल्टेइक मॉड्यूल्स, हायड्रोजन उत्पादनासाठी इलेक्ट्रोलायझर, ऊर्जा साठवण करणारी बॅटरी आणि इंधन म्हणजेच फ्यूल सेल तयार करण्यासाठी कारखाने उभारणार  आहे. यासाठी  तब्बल ६०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक रिलायन्स करणार आहे.

कंपनीचा प्लॅन याच्याही पुढे आहे. पुढील तीन ते पाच वर्षांत सध्याचे प्रकल्प आणि नवीन उपक्रमांमध्ये २५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाण्याचं कंपनीने सांगितलं आहे. इतकं सगळं करताना रिलायन्स त्यांच्या सगळ्यात यशस्वी मॉडेलला कसं एकटं सोडणार! हे मॉडेल म्हणजे रिलायन्स जिओ. रिलायन्सने जिओचं स्वतःचं टेलिकॉम नेटवर्क 5G  मध्ये रूपांतरित करण्यासाठी येत्या तीन ते पाच वर्षांत ७,५०० कोटी रुपये गुंतवण्याचं ठरवलंय.

पुढील पाच वर्षांत रिलायन्स रिटेलमध्ये ३००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव कंपनीने दिला आहे. यासाठी कंपनीने गुजरात सरकारशी सल्लामसलत करून कच्छ, बनासकांठा आणि धोलेरा इथे १,००,००० मेगावॅट क्षमतेच्या अक्षय ऊर्जा प्रकल्पांसाठी जमीन शोधण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कंपनीने एकट्या कच्छमध्ये ४.५ लाख एकर जमिनीची मागणी केली आहे.

आता बघूया अदानी  यांनी अंबानींना मागे टाकण्यासाठी काय प्लॅन केला आहे?

अदानी समूहाने गुजरातमध्ये एकात्मिक पोलाद प्रकल्प (स्टील प्लांट) उभारण्यासाठी आणि इतर व्यवसायाच्या संधी शोधण्यासाठी दक्षिण कोरियन कंपनी पोस्को (POSCO) सोबत 5 अब्ज डॉलरचा  प्रारंभिक करार केला आहे. यासंदर्भात दोन्ही कंपन्यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. हा एक नॉन-बाइंडिंग म्हणजेच बंधनकारक नसलेला करार आहे आणि एकदा तो प्रत्यक्षात आल्यानंतर, अदानी समूहाला पोलाद क्षेत्रात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

अंबानी आणि अदानी  यांच्या कंपन्या गुजरातमध्ये किती पसरल्या आहेत?

रिलायन्सचे पेट्रोकेमिकल हब  गुजरातच्या जामनगरमध्ये आहे. शिवाय जामनगरमध्ये दोन रिफायनरीसुद्धा आहेत, ज्या कच्च्या तेलाला पेट्रोल आणि डिझेलसारख्या इंधनात रूपांतरीत करतात. यासोबतच इतर अनेक प्रकारची पेट्रोकेमिकल्सही यामध्ये बनवली जातात. तर दुसरीकडे, अदानींचा बहुतांश व्यवसाय गुजरातमध्येच पसरलेला आहे. त्यांचे गुजरातमधील मुंदडा इथे बंदर (पोर्ट) आणि इतर अनेक व्यवसाय आहेत.

यासगळ्या गोष्टींवरून दिसून येतं की, दोन्ही गटांनी गुजरातमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. आणि अजूनही हे गट गुजरातवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अंडरवर्ल्डमध्ये जसे डॉन असतात तसंच गुजरातच्या कॉर्पोरेट वर्ल्डचा डॉन बनण्यासाठी ही लढत आहे. ज्यासाठी या कंपन्यांनी मोठंमोठे प्लॅन्स तर आखले आहेत, पण यातील कोण सगळे प्लॅन कागदावरून जमिनीवर उतरवत मार्केट खाईल, याचीच ही  शर्यत आहे.

या दोन कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्या लोकांचं अंबानी आणि अदानी  यांच्या प्रत्येक चालीवर बारीक लक्ष आहे. कोण कुणावर शिरजोर होतोय हे बघत इन्वेस्टर्स स्वतःचा मार्ग निवडत असतात. फक्त भारतातीलच नाही तर आंतरराष्ट्रीय लोकांचाही यात समावेश आहे. हा मार्केटचा खेळचं असा असतो. इथला नियमचं असतो – ‘जो पुढे, त्याचं समर्थन आणि तोच राजा.’

एक मात्र नक्की, अंबानी आणि अदानी  यांच्या शर्यतीत कोण जिंकणार आणि गुजरात किंग कोण बनणार, हे बघणं मजेदार ठरणार आहे.

हे ही  वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.