नेटवरची ओवैसी भावांची भाषणं ऐकून भडकलेल्या पोरांनी त्यांच्यावर गोळ्या चालवल्या…

ऑल इंडिया मजलिस-ए-मत्तेहादुल मुस्लिमीन. हा शब्द ऐकून बिथरून जाऊ नका भिडू. विषय आहे तो ‘एआयएमआयएम’चा (AIMIM). माहितीसाठी म्हणून या शब्दाचा फुलफॉर्म वरती दिलाय. तर एआयएमआयएमचे अध्यक्ष म्हणजेच असदुद्दीन ओवैसी. ओवैसी नेहमी त्यांचे स्टेटमेंट्स आणि त्यांनी घेतलेल्या स्टॅंडवरुन चर्चेत असतात. यामुळे त्यांचे समर्थक जसे आहेत तसेच त्यांना विरोध करणारे ही भरपूर आहे आणि असे विरोधी आहेत त्यामुळे त्यांच्या जीवावर बेतणारी घटना घडलीये.

गुरुवारी ३ फेब्रुवारीला ओवैसींच्या गाडीवर गोळीबार झालाय. ही घटना घडलीये उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यात. ओवैसी एका निवडणूक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी युपीला गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर दिल्लीकडे ते निघाले होते. दरम्यान त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. हा हल्ला होत असताना ओवैसी त्यांच्या गाडीमध्ये उपस्थित होते.

हल्ल्याबद्दल ओवैसींनी स्वतः त्यांच्या ट्विटरवरून माहिती दिली. हल्ल्याच्या काही वेळानंतर त्यांनी ट्विट केलं,

“काही वेळापूर्वी मेरठ जिल्ह्याच्या जवळील छिजारसी टोल गेटजवळ माझ्या गाडीवर हल्ला झाला. चार राऊंड फायर केले गेले. तीन ते चार लोक होते आणि सगळे पळून गेले. मात्र त्यांची हत्यारं त्यांनी तिथेच सोडली. आता माझी गाडी पंचर झाली आहे आणि मी दुसऱ्या गाडीत बसून तिथून निघालो आहे. सुखरूप आहे.”

थोड्याच वेळात सोशल ओवैसींच्या गाडीचा फोटो प्रचंड व्हायरल झाला, ज्यामध्ये त्यांच्या पांढर्‍या कारवर दोन गोळ्यांचे निशान दिसतायेत.

आता ओवैसी यांच्यावर हल्ला म्हणजे देशात खळबळ माजवणारी घटना. तेव्हा घटनेच्या काही वेळातच पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले आणि या घटनेचा जोरदार तपास सुरू केला. सर्चींग प्रोसेसच्या काही घंट्यांतच हल्लेखोर पकडले गेले आहेत.

पोलिसांनी जेव्हा टोलचे सीसीटीव्ही चेक केले तेव्हा त्यामध्ये एक व्यक्ती गोळ्या मारताना दिसला. तेव्हा त्याची ओळख पटवून पोलिसांनी एकाला अटक केली. तर दुसर्‍या आरोपीने गाजियाबाद पोलीस स्टेशनमध्ये स्वतः सरेंडर केलंय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील एकाचं नाव सचिन आहे. तर दुसऱ्याचं शुभम. सचिन बादलपुरचा राहणारा असून शुभम सहारनपुरचा आहे. दोघेही आरोपी लॉ ग्रज्युएट आहेत आणि पक्के मित्र आहेत. त्यांच्याजवळ नऊ एमएमची पिस्तूल भेटली असून या कंट्री मेड पिस्तूल आहेत. सचिन याने हल्ला करण्यासाठीच काही दिवसांपूर्वी पिस्तूल खरेदी केल्या होत्या आणि आता पोलीस पिस्तूल विकणाऱ्याचा शोध घेतायेत.

दरम्यान मोठा प्रश्न हा आहे की नेमकं या आरोपींनी ओवैसींवर हल्ला का केला?

पोलिसांनी विचारपूस केल्यावर आरोपींनी यामागचं कारण सांगितलं आहे. ओवैसी आणि त्यांच्या भावाची सगळीच भाषणं ते ऐकत होते आणि या दोघांवरही ते प्रचंड नाराज होते. त्यांना वाटतं की, ओवैसी भावंडं त्यांच्या आस्थेसोबत खेळत आहेत म्हणून त्यांनी ओवैसींना मारण्याचा प्लॅन केला.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दोघे प्रचंड कट्टर विचारसरणीचे आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते ओवैसींच्या मागावर होते. त्यांच्या प्रत्येक सभांमध्ये ते उपस्थित राहत होते. इतकंच नाही तर हल्ल्याच्या दिवशीही ते मेराठच्या सभेत उपस्थित होते. त्यांनी हल्ल्याचा संपूर्ण प्लॅन केला होता आणि हल्ल्यानंतर ते स्वतः सरेंडर देखील करणार होते.

आपल्याला माहीतच आहे की, ओवैसी त्यांच्या भाषण शैलीमुळे भारतभर प्रसिद्ध आहेत. ज्या भाषण शैलीमुळे त्यांना वाखाणण्यात येतं, तेच अनेकदा कॉन्ट्रोव्हर्सी होताना आपण पाहिलं आहे. पण आता तर त्यांची भाषणंच त्यांच्या जीवावर बेतली आहेत.

एकंदरीत पाहता यावरून एक उदाहरण भेटतंय, की आपली कौशल्य आपल्या स्किल्सच कधीकधी आपल्यासाठी हानिकारक ठरू शकतात भावांनो!

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.