अबकी बार सोशल मीडिया चुनाव…कोण पुढे ? कोण मागे ?

अबकी बार सोशल मीडिया चुनाव …. होय भारताच्या राजकीय इतिहासात यावेळेस प्रचाराचा नवा प्रकार पाहायला मिळणार आहे. यंदा ना नेत्यांच्या खचा-खच गर्दीच्या सभा होतील, ना रस्त्यांवर रॅली दिसतील.  यावेळी निवडणुकीची लढाई गोंगाटाने नाही तर सोशल मीडियाने जिंकली जाईल. नेते हवाई नव्हे तर डिजिटल दौरा करतील.  यावेळी हे सर्व नेते  स्मार्ट फोन, स्मार्ट टीव्ही आणि लॅपटॉपवर पाहायला मिळणार आहे. पूर्वी नेते लोकं हेलिकॉप्टरने आणि रोड शोने रॅलीच्या ठिकाणी हजर व्हायचे…मात्र आता नेते थेट खोलीत बसलेल्या करोडो लोकांपर्यंत पोहोचतील. कोरोनाच्या काळात प्रचाराची ही एक पूर्णपणे नवीन पद्धत आहे… ज्यामध्ये ना आरडाओरडा, ना गर्दी, ना सायरन.

कोरोना विषाणूची तिसरी लाट आता देशातील राजकीय पक्षांची परीक्षा घेत आहे. अशा परिस्थितीत २०२२ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पक्षांनी डिजिटल ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. १० फेब्रुवारीपासून पाच राज्यांमध्ये सात टप्प्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. पण कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता आयोगाने रॅलींवरील बंदी २२ जानेवारीपर्यंत वाढवली असून केवळ डिजिटल प्रचाराला परवानगी दिली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांनी त्यांच्या प्रचाराची रणनीती बदलली आहे. 

यावेळेस प्रचाराचं रूपच पालटलं जाणार आहे….. खरं तर नेत्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीचा प्रचारावर परिणाम होत असतो, परंतु पक्षांना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावंच लागणार आहे.

आता पक्षांची काय काय तयारी आहे याबाबत बोलायचं तर, भाजप तर काय आधीच तयारीत असेल. कारण डिजिटल कॅम्पेन तर भाजपने २०१४ पासूनच सुरु केलं आहे. त्यामुळे असं थेट म्हणलं जातं कि, डिजिटल प्रचारात भाजपचा हात कुणीच धरू शकत कारण भाजप तितकं स्ट्रॉंग आहे …सोशल मीडियावर !

आत्ताची वेगळी काय तयारी असणारे ते पाहणे इंटरेस्टिंग असणारे. 

भाजप निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यासाठी १०० ऑनलाईन रॅलीचे नियोजन करत आहे. भाजप नेतृत्वाने गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या प्रचारासाठी डिजिटल स्ट्रॅटेजी काय असेल यावर काम करत आहे. सूत्रांनुसार, पक्षाने 3D स्टुडिओ मॅक्स तंत्रज्ञान वापरण्याची योजना आखली आहे ज्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी बसलेल्या नेत्यांना व्हर्च्युअल स्टेजवर दिसू शकेल जिथून ते संमेलनांना संबोधित करतील. भाजपचा सोशल मीडिया सेलही कार्यरत आहेत. भाजपची लखनौमध्ये एक वॉर रूम आहे जिथे त्यांची टीम फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामवर सार्वजनिक समर्थन गोळा करत आहे.

पक्षाचे म्हणणे आहे की त्यांच्या डिजिटल क्षमतेचा कणा म्हणजे जमिनीवर असलेली आयटी स्वयंसेवकांची मोठी फौज. “आमच्याकडे प्रत्येक बूथसाठी किमान पाच स्वयंसेवक आहेत. बहुतेकांकडे लॅपटॉप आहेत, मोबाईल आहेत. तसेच पक्ष आपल्या १४ लाख ऍक्टिव्ह नोंदणीकृत स्वयंसेवकांवर अवलंबून आहे.  जेंव्हा जेंव्हा भाजप नेते भाषण करतील, तेंव्हा त्यांचे भाषण पक्षाच्या ऑफिशियल ट्विटर, फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्राम हँडल इव्हेंट लाईव्ह दाखवले जाणार आहेत..

जरी भाजप आतापर्यंतच्या डिजिटल प्रचारात सर्वच पक्षांच्या मानाने पुढे नक्कीच दिसत असेल, पण निवडणूक रॅलींवरील बंदीचाही मोठा परिणाम होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जेपी नड्डा यांसारख्या बड्या नेत्यांच्या रॅलीला अनुपस्थित राहणे भाजपसाठी चिंतेचे कारण बनू शकते. कारण निवडणुकांच्या प्रचाराचा दृष्टिकोन बदलण्यात पीएम मोदी आणि अमित शहा हे सूत्रधार मानले जातात…जर हे मोठे नेते मैदानात दिसत नसतील तर त्याचा काही प्रमाणात भाजपला फटका बसू शकतो.

आता सर्वात जुन्या काँग्रेस पक्षाचं काय स्टेट्स काय आहे ते बघूया… 

यूपीमध्ये निवडणूक जाहीर होण्यापूर्वी प्रियांका गांधी यांनी राज्यात विविध कार्यक्रम करून वातावरणनिर्मिती केली आहे. शिवाय याचसोबत काँग्रेस डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्वत:ला मजबूत करण्याचा प्रयत्न करत होता. तितक्याच, उत्तर प्रदेशच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे त्यांना डिजिटल माध्यमातून प्रचाराला जावे लागेल, याची तयारी देखील त्यांना करायला मिळाली नाही. यूपीमध्ये इतर पक्षांच्या तुलनेत काँग्रेसची संघटना कमकुवत आहे, मात्र काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर संघटना पुढे आली असून कार्यकर्त्यांची टीमही तयार करण्यात आली आहे. प्रियंका गांधी यांनी पक्षाच्या लोकांशी डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.

यूपीमध्ये, लडकी हूं लढ सकती हूँ, या उपक्रमाखाली प्रियांका गांधी महिलांशी संवाद साधत आहेत. काँग्रेसचे उत्तर प्रदेश अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनी तर सांगितलं कि, आम्ही दीड लाख व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे तीन कोटी लोकांना जोडण्याचे काम केले आहे. सदस्यत्व मोहिमेअंतर्गत प्रत्येक विधानसभेत ४०-५० हजार नवीन लोकांची भर पडली आहे. अशा परिस्थितीत आम्ही तयार केलेल्या टीमच्या माध्यमातून निवडणुकीचा प्रचार करणार आहोत.

दरम्यान, पक्षाची राहुल गांधींची डिजिटल रॅली आयोजित करण्याची योजना देखील आहे आणि सोशल मीडिया आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर जास्तीत जास्त प्रोग्रॅम्स घेण्याच्या स्ट्रॅटेजीवर काम करत आहे. तसेच काँग्रेस नेते झूम सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे पक्षातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत आणि पक्षाच्या नेत्यांच्या डिजिटल रॅलीचेही नियोजन केले जात आहे.  व्हर्च्युअल रॅलीचा तपशील पक्ष नेतृत्वाने अद्याप निश्चित केलेला नाहीये पण पक्षांच्या काही ऑनलाईन घडामोडी पाहिल्या तर काही निरीक्षणे बघता येतील ते म्हणजे, अलीकडेच काँग्रेस याबाबत बैठक घेत असल्याचं बातम्यांमधून कळतंच आहे.  

पंजाब प्रचार समितीच्या बैठकीत विधानसभेच्या प्रचारासाठी विधानसभा निवडणुकीसाठी आपला नारा निश्चित करताना, घोषणांच्या यादीतून निवडण्यात आलेली घोषणा म्हणजे ‘पंजाब दी चर्दकला, काँग्रेस मांगे सरबत दा भला’ काँग्रेस सर्वांचे कल्याण करण्यासाठी पंजाब काँग्रेस उत्साहात आहे, असा काहीसा त्याचा अर्थ होतो. “सरबत दा भला’ वरील जिंगल्स आणि गाण्यांमध्ये हे घोषवाक्य वापरले जाईल. चरणजित सिंग चन्नी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील शासनाच्या पुढाकारावर प्रकाश टाकण्याची मोहीम ‘सरबत दा भला’ या थीमवरही केंद्रित होती, असे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले.

तसेच पक्षाची पंजाबमध्ये सोशल मीडिया टीम राज्यात ऍक्टिव्ह असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. पंजाब काँग्रेसने सकारात्मक हॅशटॅग वापरत चन्नी यांचा प्रचार करायला सुरुवात केली आहे. त्यांच्या १११ दिवसांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांवर प्रकाश टाकण्यात येतोय. आहे. त्यातल्या त्यात पंजाबमध्ये आधीच काँग्रेस स्ट्रॉंग आहे…अन सोशल मीडियाचा आणखी त्यात हातभारच लागणार आहे. शिवाय पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी व्हर्च्युअल प्रचारावर फोकस करण्याची सुरुवात देखील केली आहे, जेंव्हा निवडणूक आयोगाचा डिजिटल प्रचार करण्याचा निर्णय आलेला तेंव्हा त्याचे सिद्धू यांनी स्वागत केले होते.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काँग्रेसने भाजपला पिछाडीवर टाकले आहे अशी चर्चा आहे.  काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख रोहन गुप्ता म्हणतात, “आम्ही व्हर्च्युअल रॅलीसाठी एक टेम्पलेट तयार केले आहे जे पक्षाच्या नेत्यांच्या कार्यक्रमांसाठी वापरले जाणार आहे. काँग्रेसकडचे फोन नंबर आणि सोशल मीडिया हँडलचा डेटाबेस आणि फाइल तयार आहे. फिल्डवर प्रत्येक कामगाराचे मॅप आधीच केले गेले आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये आपला डिजिटल निवडणूक प्रचारात, ‘प्रियांका के साथ लाइव्ह’, हे फेसबुक लाइव्ह सत्र आयोजित केले जातेय. तसेच पक्षाने मोठं-मोठ्या ऑफलाईन रॅली न घेता, छोट्या सभा घेण्याचा आणि घरोघरी जाऊन प्रचार करून जनतेला आपल्या बाजूने वळवण्याची जुनीच पण प्रभावशाली रणनीतीही पक्षाकडून तयार करण्यात येत आहे.

आप काय करतंय ?

आम आदमी पक्षाने सोशल मीडियावर कधीच प्रचार सुरु केला आहे.  राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी अलीकडेच वाराणसीच्या आठ जागांसाठी सामाजिक मेळाव्याच्या पहिल्या डिजिटल रॅलीला संबोधित केले ज्या ठिकाणी त्यांनी युवकांसाठीच्या नोकऱ्या, बेरोजगारी भत्ता, महिलांसाठी आर्थिक मदत, आणि इतर अनेक मुद्द्यांवर भाषण केलं. तसेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यूपीच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या आश्वासनांवर प्रकाश टाकत सिंह म्हणाले, “राज्यातील प्रत्येक मुलीला एका महिन्यासाठी भत्ता म्हणून १,००० रुपये मिळतील.”  या डिजिटल रॅलीला जिल्ह्यातील आठही सभा विभागांमध्ये मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते असं पक्षाच्या वतीने सांगितलं जात आहे. 

समाजवादी पक्षाची काय तयारी आहे ?

आत्तापर्यंत समाजवादी पक्षाने प्रचारात ताकद दाखवली असून अखिलेश यादव यांच्या विजय रथयात्रेत ज्या प्रकारे गर्दी जमवली होती. त्यामुळे यूपीमध्ये सपाच्या बाजूने वातावरण तयार केले जात होते, मात्र रॅलीत तशी हवा निर्माण होणार नाही. एवढेच नाही तर अखिलेश यादव यांनी ज्या लहान पक्षांसोबत युती केली आहे, त्यांची चिंता नक्कीच आहे. कारण येथील छोट्या प्रादेशिक पक्षांची स्थिती तितकी चांगली दिसून येत नाही. कारण आता नियमानुसार समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेशही व्हर्च्युअल रॅलीचे नियोजन करत आहेत. 

२०१२ च्या निवडणुकीत अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षाने प्रचारात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा प्रभावीपणे वापर केला होता. त्यांच्या पक्षाकडे मोठ्या संख्येने प्रदेश, जिल्हा आणि ब्लॉक-स्तरीय व्हॉट्सअॅप ग्रुप्स आहेत ज्यांचा वापर संदेश, व्हिडिओ लिंक्स आणि इतर प्रचार सामग्री प्रसारित करण्यासाठी केला जातो…त्याचाच वापर आत्ताच्या निवडणुकीत होणार आहे. अलीकडेच, जेव्हा अखिलेश यादव यांनी त्यांची विकास रथयात्रा काढली, तेव्हा पक्षाच्या स्वयंसेवकांनी चालवलेले हजारो सोशल मीडिया हँडल लाइव्ह झाले, त्यांची भाषणे आणि लोकांशी संवाद साधला.

पण या सोशल मीडिया वॉरमध्ये कोण जिंकणार हा प्रश्न आहे. डिजिटल प्रचारात भाजप पक्ष सपा, बसपा आणि काँग्रेसला मागे टाकणार का? कारण अखिलेश यांनी आधीच डिजिटल रॅलीवर आपली शंका व्यक्त केली आहे. ज्यांच्याकडे साधनं नाहीत ते डिजिटल रॅली कशी करणार, असे सांगण्यात आले. 

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी आपला विरोध व्यक्त केला आणि सांगितले की नीती आयोगाच्या अहवालात असे दिसून आले आहे की यूपीमध्ये प्रत्येक १०० लोकांपैकी फक्त ३९ लोकांकडे इंटरनेट आहे. एनएसएसच्या अहवालाचाही संदर्भ देत ओवेसी म्हणाले की, केवळ चार टक्के घरांमध्ये संगणक सुविधा आहे. यूपीमधील ५० टक्के महिलांनी कधीही इंटरनेटचा वापर केला नाही, असा दावाही यात करण्यात आला आहे. याशिवाय, एआयएमआयएम प्रमुखांनी यावर जोर दिला की केवळ मर्यादित लोकांकडेच मोबाइलचा ऍक्सेस आहे, त्यामुळे डिजिटल प्रमोशन एक मोठं आव्हान असल्याचं त्यांनी सांगितलं.

उत्तर प्रदेशातील बसपा आणि इतर छोट्या पक्षांबद्दल बोलायचे झाले तर… 

उत्तर प्रदेशातील बसपा आणि इतर छोट्या पक्षांबद्दल बोलायचे झाले तर ते डिजिटल माध्यमातून प्रचार करण्यात खूपच मागे आहेत. त्यामागची करणे म्हणजे, त्यांच्याकडे संसाधनांची कमतरता आहे. विशेषत: बसपाबद्दल बोलायचे तर सतीशचंद्र मिश्रा २-३ महिने प्रचारात व्यस्त होते, ब्राह्मण महासभा करत होते. पण बसपा प्रमुख मायावती १५ जानेवारीला त्यांच्या वाढदिवसाला प्रचाराची सुरुवात करणार होत्या असं बोललं जात होतं.

पण तेवढ्यात निवडणूक आयोगाने कोरोनामुळे रॅलींवर बंदी घातली. अशा स्थितीत त्यांच्या पक्षात निराशा दिसून येत आहे. छोट्या पक्षांकडे संसाधने नसतात आणि ते डिजिटल प्लॅटफॉर्मवर लोकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत.

पण एक मात्र खरे की, डिजिटल व्यासपीठावर भाजपचे पारडे इतर पक्षांपेक्षा जड आहे.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.