ॲशेस सिरीज सुरू होण्यामागचं कारण श्रद्धांजलीची बातमी आहे…

तुम्हाला क्रिकेट आवडत असेल, तर लहानपणीची एक आठवण फिक्स असणार. थंडीच्या दिवसात सकाळी सकाळी उठून टीव्हीसमोर बसायचं. आता कधी अभ्यासासाठी न उठणारी पोरं घरच्यांनी आवाज न देता उठण्याची दोनच कारणं होती, क्रिकेट खेळणं आणि क्रिकेट बघणं. आता मॅच भारतात असेल, तर पार शाळेत जायच्या आधी मॅच सुरू व्हायची. पण मॅच ऑस्ट्रेलियात असेल, तर सकाळी उठणं गरजेचं असायचं.

बरं त्या काळात काय आयपीएल नव्हती, त्यामुळं क्रिकेट काय सारखं बघता येत नव्हतं. तेव्हा मॅचेस रंगायच्या टेस्ट क्रिकेटच्या. टेस्ट क्रिकेटमध्ये भारताची टीम फार सॉलिड नव्हती, ते डिपार्टमेंट होतं ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडकडे. हे दोन संघ एकमेकांना भिडणार म्हणल्यावर, सॉलिड लढाई बघायला मिळणार याची गॅरंटी असायची.

बरं, क्रिकेटच्या मैदानात या दोन टीम्समध्ये फार सख्य नव्हतं. त्यांची बॉर्डर एकमेकांना लागत नाही, पण वैर भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅचेसपेक्षाही जास्त आहे. तुम्ही कट्टर क्रिकेट चाहते असाल आणि तुम्हाला टी२० वर्ल्डकपमध्ये काय होतंय हे माहीत नसेल, तरी चालतं. तुम्हाला आयपीएलमध्ये काय होतंय हे माहीत नसेल, तरी चालतंय… पण ॲशेस सिरीजमध्ये काय सुरु आहे हे माहीत पाहिजेच. तेही ॲशेसच्या इतिहासासकट.

आता जाऊयात इतिहासात. अगदी ब्लॅक अँड व्हाईट काळातल्या इतिहासात.

ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधली सुपरपॉवर होण्याआधी तो मान बरीच वर्ष इंग्लंडकडे होता. इंग्लंडला बाहेरच्या देशात हरवणं कठीण होतं, तिथं इंग्लंडमध्ये जाऊन हरवायचं म्हणजे लय हार्ड विषय. इंग्लंडच्या प्लेअर्सपासून चाहत्यांनाही याचा गर्व होता, कारण त्यांना माहीत होतं की आपली टीम अजिंक्य आहे.

पण कसंय, आपण सगळ्यांनी कव्वाली ऐकलिये… चढता सूरज धीरे धीरे, ढलता है ढल जायेगा.

बेक्कार फॉर्ममध्ये असणारी टीम कधीतरी पराभवाचं पाणी चाखणारच की. इंग्लंडचंही तसंच झालं. तारीख होती, २९ ऑगस्ट १८८२. इंग्लंडच्या एकदम स्ट्रॉंग टीमला ऑस्ट्रेलियाची टीम भिडली होती. आपल्या घरच्या मैदानावर खेळताना इंग्लंडला पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाकडून टेस्ट मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला.

झालं, आपल्या टीमला हारताना बघून इंग्लिश फॅन्स चांगलेच चवताळले. या फॅन्समध्ये एक कार्यकर्ता होता, स्पोर्टींग टाईम्सचा पत्रकार रेजिनाल्ड शिरले ब्रूक्स. भावानं या पराभवाबद्दल आपल्या पेपरमध्ये श्रद्धांजलीची बातमी लिहिली.

स्पोर्टींग टाइम्समध्ये आलेली श्रद्धांजलीची बातमी
स्पोर्टींग टाइम्समध्ये आलेली श्रद्धांजलीची बातमी

यात सरळ सरळ लिहिण्यात आलं होतं, २९ ऑगस्ट १८८२ ला ओव्हलवर इंग्लंड क्रिकेटचा मृत्यू झाला. भावपूर्ण श्रद्धांजली. बॉडीचं दफन करण्यात येईल आणि राख ऑस्ट्रेलियाला नेण्यात येईल.

त्याची ही बातमी बेक्कार लोकप्रिय झाली. या सिरीजनंतर इंग्लंडची टीम ऑस्ट्रेलियाला गेली, तेव्हा इंग्लंडमध्ये परत चर्चा सुरू झाली, की आपल्या टीमनं ॲशेस परत आणाव्यात. झालंही तसंच, पहिली टेस्ट हरल्यानंतर इंग्लंडनं पुढच्या दोन्ही टेस्ट जिंकल्या आणि हिशोब चुकता केला.

आता तुम्हाला साहजिक प्रश्न पडला असणार, की मग ॲशेसच्या त्या छोट्याश्या ट्रॉफीमध्ये काय आहे?

ऑस्ट्रेलियातल्या एका महिला मंडळानं इंग्लंडचा कॅप्टन इव्हो ब्लिघला ही छोटीशी ट्रॉफी गिफ्ट केली. यात स्टम्प्सवरच्या बेल्स जाळून त्याची राख टाकल्याचं बोललं जातं. ब्लिघच्या सुनेनं त्यात बेल्सची नाही, तर माझ्या सासूच्या ओढणीची राख आहे असं सांगितलं. तर काही जणांच्या मते, त्यात टेस्ट मॅचेस दरम्यान वापरलेल्या बॉलची राख आहे. आतमध्ये नक्की काय आहे, ते तर आता ट्रॉफी उघडून बघता येणार नाही, कारण ट्रॉफी ठेवण्यात आलिये लॉर्ड्सच्या म्युझियममध्ये.

दर दोन वर्षांनी होणारी इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया ॲशेस मालिका जिंकणाऱ्या संघाला या ट्रॉफीची प्रतिकृती देण्यात येते. आता ॲशेस सिरीजमध्ये प्लेअर्सची भांडणं असतात, शिव्या असतात, डोक्यावर आदळणारे बाऊन्सर्स असतात, भारी बॅटिंग असते आणि भारी बॉलिंगही.

आता ॲशेसच्या मॅचेस भले मोबाईलवर बघता येत असतील, पण सकाळी गोधडी अंगावर घेऊन, आईनी दिलेला गरम चहाचा कप हातात घेऊन ॲशेस सिरीज बघण्याची सर आता येणार नाही…

हे ही वाच भिडू:

English Summary: The replica of the trophy is awarded to the team that wins the Australia Ashes series against England every two years. Now the Ashes series has players arguing, sweating, head bouncers, heavy petting, and heavy bowling.

Web Title: Ashes series history of how the ashes series started

Leave A Reply

Your email address will not be published.