थोडक्यात हुकलं, नायतर गिलख्रिस्टला एका सिक्ससाठी ६४ लाख मिळाले असते…
ॲडम गिलख्रिस्ट, पॉन्टिंग आणि वॉच्या खुंखार ऑस्ट्रेलियन टीममधला तुलनेनं शांतीत क्रांती कार्यकर्ता. निळेशार डोळे, ओठांना लावलेली पांढरी क्रीम, विकेटकिपींग आणि बॅटिंगमधली अफाट ताकद ही गिलख्रिस्टची ओळख. विकेटकिपर कार्यकर्ते किती भारी बॅटिंग करू शकतात, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गिलख्रिस्ट होता. विकेटकिपर्सची बॅटिंग लाईनअपमधली भूमिकाच गिलीमुळं बदलली.
आता त्याच्या कारकिर्दीबद्दल आणि स्वभावाबद्दल तसं तुम्हाला माहिती असेलच. नसलं तर, बोल भिडूनं पण लिहून ठेवलंय. त्यामुळं आज तिकडं नको जायला. आज एक भन्नाट किस्सा बघू.
आता आयपीएल आलं आणि क्रिकेट आणि पैशाचं गणितच बदलून गेलं. एखाद्या प्लेअरला काही ठराविक रक्कम मिळाली, तर काही कार्यकर्ते लगेच कॅल्क्युलेटर घेऊन बसतात, की याला आठ करोड मिळालेत म्हणजे याच्या एका बॉलची किंमत एवढी झाली, एका सिक्सची एवढी झाली. हे आकडे बघत असताना, गिलख्रिस्टचा किस्सा आठवला. आताच्या प्लेअर्ससाठी हे लाख आणि कोटीतले आकडे सामान्य वाटत असले, तरी २००२ मध्ये काय असली परिस्थिती नव्हती. तेव्हा कुठल्या प्लेअरला काही लाख रुपये, एका सिक्ससाठी मिळणार म्हणजे लय दुर्मिळ गोष्ट.
तर झालं असं, की ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका अशी मॅच साऊथ आफ्रिकेत सुरू होती. मॅचला जरा आणखी इंटरेस्टिंग करण्यासाठी आणि आपल्या ब्रँडची हवा करण्यासाठी एका जाहिरात कंपनीनं स्कीम आणली. त्यांनी मैदानात एक बोर्ड लावला आणि सांगितलं जो कुणी या बोर्डवर सिक्स मारणार, त्याला १.३ मिलियन रॅण्डस मिळणार, म्हणजे आत्ताच्या रेटनं हिशोब केला, तर ६४ लाख रुपये. विचार करा एका सिक्ससाठी ६४ लाख.
तारीख होती, २३ फेब्रुवारी २००२. ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका टेस्ट मॅच. क्रीझवर ॲडम गिलख्रिस्ट होता. गडी काय खाऊन आलेला माहीत नाय, पण कसलेल्या आफ्रिकन बॉलिंगवर अक्षरश: तुटून पडला. आता त्याच्या आधीच हेडन आणि डॅमियन मार्टिननं सेंच्युरी मारली होती, पण गिलख्रिस्ट क्रीझवर आला आणि थकलेल्या साऊथ आफ्रिकन बॉलिंगला आणखी तोडायला सुरुवात केली.
त्यानं आपली फिफ्टी पूर्ण करायला, ८९ बॉल्स घेतले. सुरुवात अगदी निवांत झाली आणि त्यानंतर पुढची फिफ्टी पूर्ण करायला फक्त ३८ बॉल्स लागले. टेस्ट मॅच आहे, म्हणून शांतीत खेळला असं नाही. सेंच्युरी झाल्यावर तर हाणामारीचा रेट आणखी वाढला.
सगळेच बॉलर मार खात होते, नील मॅकेंझी बॉलिंगला आला. पहिला बॉल गिलख्रिस्टनं डिफेंड केला. दुसऱ्या बॉलवर दोन रन्स काढले, तिसरा बॉल डॉट. चौथ्यावर फोर आणि पाचव्याला डिफेन्स. वातावरण काहीसं निवांत झालं आणि सहाव्या बॉलवर लेग साईडला कडकडीत सिक्स. इतर सिक्सप्रमाणं हा काय साधा सिक्स नव्हता, फक्त गिलख्रिस्ट नाय, तर सगळी साऊथ आफ्रिकन टीम, अंपायर्स सगळे कार्यकर्ते तो सिक्स कुठं जातोय हे बघत होते. कारण गिलख्रिस्ट भाऊंच्या सिक्सनी जाहिरातीच्या बोर्डचा मार्ग पकडला होता.
बॉल त्या बोर्डाच्या अगदी थोडक्यात खाली लागला आणि सगळं स्टेडियम एका सुरात ओरडलं, ‘ohhhhhhh.’
गिलीनं जाऊन अंपायरला विचारलं, बक्षीस मारलं काय? अंपायरनं सांगितलं, ‘नाय गड्या.’ गिलख्रिस्ट हे ऐकून नेहमीच्या स्टाईलनं खळखळून हसला. पुन्हा बॅटिंगला आला आणि साऊथ आफ्रिकन बॉलर्सला चोपायला सुरुवात केली. बक्षिसाची संधी हुकली असली, तरी त्या दिवशी गिलीनं दुसऱ्या एका विक्रमाला गवसणी घातली. त्यानं फक्त २१२ बॉल्समध्ये डबल सेंच्युरी मारली. टेस्ट क्रिकेटमध्ये एवढ्या कमी बॉल्समध्ये डबल सेंच्युरी मारण्याचा पराक्रम तोपर्यंत कुणीच केला नव्हता. गिलख्रिस्टनं टेस्ट मॅचमध्ये फास्टेस्ट डबल सेंच्युरी मारण्याचा विक्रम आपल्या नावावर करुन घेतला.
ऑस्ट्रेलियानं थोडेथिडके नाही, तर ६५२ रन्स मारले.आफ्रिका लय घाण हारली, कुणीच त्या जाहिरातीच्या बोर्डावर सिक्स मारु शकलं नाही. काही दिवसांनंतरच न्यूझीलंडच्या नॅथन ॲस्टलनं फास्टेस्ट डबल सेंच्युरीचा विक्रम मोडला. पण त्याचं एवढं वाईट वाटलं नाही, गिलख्रिस्ट भाऊचा सिक्स थोड्यासाठी हुकला नसता… तर मात्र मजा आली असती.
हे ही वाच भिडू:
- कोण होता शांताराम ज्याला भेटायला गिलख्रिस्ट आणि मिस्टर क्रिकेटनं कॅफे लिओपोल्ड गाठलेलं..
- या दोन इनिंग्समुळं समजतं, एबी डिव्हीलियर्सला एलियन का म्हणतात
- मॅकग्रा इतका खडूस बॉलर होता, की खुद्द सचिननं त्याला शिवी घातली होती…