धर्मनिरपेक्ष राज्यात मुख्यमंत्र्यांनी पूजा करू नये म्हणून बाबा आढावांनी आंदोलन उभारलेलं..

बाबा आढाव म्हणजे चळवळीतला माणूस. कायमच काहींना काही आंदोलनाच्या निमित्ताने ते माध्यमामध्ये चर्चेत असतात. त्यांच्याबाबत अनेकांना वर्तमानपत्रांतील बातम्यांतून माहिती मिळते.
त्यांची अनेकानेक आंदोलनं, सतत एकामागोमाग एक सुरू असलेल्या चळवळी, झोपडपट्ट्या हलवल्या जाऊ नयेत यासाठी आंदोलन, मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं यासाठी झालेली चळवळ, एक गाव – एक पाणवठा चळवळ, धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाची चळवळ आणि अगदी अलीकडे पुण्यातील रिक्षा आंदोलन…दरवाढीच्या बाबतीत झालेले रिक्षाचालकांच्या आंदोलनामुळे बाबा आढाव यांची प्रतिमा जनमानसातून थोडी उतरलेलीच.
बाबांबद्दल कौतुकाची लाट आली होती ते १९७०-७१ च्या सुमारास….
त्या वेळी त्यांनी दोन गोष्टींविरुद्ध आंदोलन छेडलं होतं.
पंढरपूरच्या विठ्ठलाच्या शासकीय महापूजेविरुद्ध त्यांनी आंदोलन छेडलं होतं. आणि दुसरं म्हणजे संस्कृत भाषा आणि वेदविद्यापारंगत विद्वानांच्या शासनातर्फे केल्या जाणाऱ्या सत्काराला बाबांनी विरोध केला होता. अशा तात्त्विक भूमिकांमुळे आणि त्यासाठी केलेल्या प्रत्यक्ष आंदोलनांमुळे बाबांबद्दल कौतुकाची लाट आलेली.
पण यातलं पंढरपूरच्या विठ्ठलाच्या शासकीय महापूजेविरुद्धचं त्यांचं आंदोलन जास्त गाजलं…
प्रतिवर्षी आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री सपत्नीक श्री विठ्ठल-रखुमाईची महापूजा करत असतात. आषाढी एकादशीला पूजा करण्याच्या या प्रथा परंपरेची पाळेमुळे शोधायला गेलं तर काही लोकं छत्रपती शिवरायांपासुनचे दाखले देतात. मात्र पंढरपुरचा सामावेश आदिलशाहीत येत असल्याने त्याबद्दल इतिहासकारचे दुमत आहे. त्याचबरोबर १८४० च्या दरम्यान विठ्ठलपुजेचा मान सातारा गादीकडे असल्याचे संदर्भ देखील मिळतात.
ब्रिटीश काळातले मामलेदार, कलेक्टर, प्रांत, असे सेवाजेष्ठतेनुसार विठ्ठलाची पूजा होत असल्याचे संदर्भ आहेत. नंतरच्या काळात पेशवाई आल्यानंतर थोरले बाजीराव पेशवे यांनी विठ्ठलाची देवस्थान समिती नियुक्त केली. या समितीमार्फत पूजा केली जात असायची.
संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी महापूजा केली होती का याचे संदर्भ मिळत नाहीत मात्र दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांना आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये पूजेचा मान मिळाल्याचे उल्लेख विठ्ठल मंदिर समितीमधे आहेत.
१९६५ साली महसुलमंत्री म्हणून राजारामबापूंनी विठ्ठलपूजा केली.बाळासाहेब देसाई,कल्याणराव पाटील यांच्यासारख्या मंत्र्यांनी या महापूजा केल्या. त्यानंतर विठ्ठलाची पूजा मंत्र्यांच्या हस्ते करण्याची प्रथा चालू झाली.
पण सन १९७० साली समाजवादी लोकांनी, धर्मनिरपेक्ष राज्यात सरकारने पूजाअर्चा करणे योग्य नाही म्हणून आंदोलन केलं होतं. आणि असं म्हणतात कि,
या आंदोलनाच्या अग्रभागी बाबा आढाव होते. या आंदोलनात मुख्यमंत्र्यांनी करत असलेल्या शासकीय पूजेला तीव्र विरोध झालेला.
शासन हे धर्मनिरपेक्ष आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही धर्माच्या विधीत शासनाचा प्रतिनिधी म्हणून भाग घेता कामा नये, अशी बाबांची भूमिका होती.
त्यांच्या या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय पूजेच्या भूमिकेला बुद्धिवंतांचा पाठिंबा मिळाला होता. शेवटी वातावरण तापत चाललं होतं आणि मग यावर उपाय म्हणून १९७१ साली मंत्र्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली नाही. पण बाबांच्या या आंदोलनाचा फारसा प्रभाव टिकला नाही.
योगायोग म्हणजे यानंतरच्या पुढच्याच वर्षी राज्याला दुष्काळाचा सामना करावा लागला होता. १९७२ साली मुख्यमंत्री असणाऱ्या वसंतराव नाईक यांना भेटण्यासाठी शिष्टमंडळ गेले होते. विठ्ठलाची पूजा बंद झाली त्यामुळेच दुष्काळ पडला म्हणून पुन्हा पूजा चालू करावी अशी मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात आली.
१९७३ साली महाराष्ट्र शासनाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर शासनाच्या ताब्यात घेतले आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी १९७३ साली विशेष असा कायदा पास केला आणि मंदिराचा कारभार हा कायद्यानुसार सुरू झाला.
१९७३, ७४, ७५ ला देवस्थानचे पंच यांच्यावतीने पुजा झाली…त्यानंतर खऱ्या अर्थाने विठ्ठलाची शासकिय पूजा करण्याचा मान मुख्यमंत्र्यांकडे आला. आणि आषाढी एकादशीला शासकिय पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची प्रथा सुरु करण्यात आली. १९७६ ला मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते महापूजा झाली होती.
त्यानंतर वसंतदादा पाटील. त्या दरम्यान दादांनी पंढरपुर बरोबरच देहू आणि आळंदीचा यात्रा कर रद्द केला होता. त्यानंतर शरद पवार यांनी देखील हि शासकिय पूजा चुकवली नाही. ए.आर. अंतुलेच्या रुपात राज्यास मुस्लीम मुख्यमंत्री लाभले त्यामुळे त्यांच्या ऐवजी महसुलमंत्री शालिनीताई पाटील यांनी दोन वेळेस शासकिय पूजा केली.
याच काळात मुंबईत रमाबाई आंबेडकरनगरमध्ये गोळीबार झाला होता. दलित संघटनांनी मुख्यमंत्र्यांनी आषाढी पूजा करू नये म्हणून विरोध केला.
त्यामुळे १९९६ सालची पूजा मुख्यमंत्र्यांना करता आली नव्हती.
हे हि वाच भिडू :
- नमाजाच्या ठिकाणी गोवर्धन पूजा केली..अन म्हणे हाच ‘खरा’ स्वातंत्र्याचा लढा आहे.
- सत्यशोधक बाबा आढाव यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त बोल भिडूने घेतलेली मुलाखत
- दाभोलकरांच्या पाठीशी ते भक्कमपणे उभे राहिले आणि अंनिसची चळवळ खेडोपाडी पसरली.