आजही कित्येक घरांमधली सकाळ बाबा महाराज सातारकरांच्या हरिपाठानं होते

आजही महाराष्ट्रातील कित्येक घरात सकाळी सकाळी हरिपाठ लावून कामं पुर्ण केली जातात. त्यातही हरिपाठ असतो तो म्हणजे बाबा महाराज सातारकर यांचा, महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेतील आघाडीचं नाव म्हणजे बाबा महाराज सातारकर. पण, आज वारकरी परंपरेतील हे मोठं नाव काळाच्या पडद्याआड गेल आहे.

 

बाबा महाराज सातारकर यांच नवी मुंबईतल्या नेरूळ येथे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झालं. आपल्या किर्तन, प्रवचन आणि हरिपाठाने संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिध्द असलेल्या बाबा महाराज सातारकर यांच्या विषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

 

नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे सातारकर म्हणजेच बाबा महाराज सातारकर यांचा जन्म ५ फेब्रुवारी, १९३६ रोजी सातार्‍याच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात झाला. त्यांचे वडील ज्ञानेश्वर आणि आई लक्ष्मीबाई या वारकरी परंपरेतल्या होत्या. लहानपणी बाबा महाराजांना घोडेस्वारी, क्रिकेट, बोटिंग, ट्रेकिंग, शुटींग, स्विमींग या सर्वात रस होता. फोटोग्राफी हा त्यांचा आवडता छंद. या सगळ्या बरोबर बाबा महाराजांना अभ्यास करण्यातही प्रचंड रस होता. ते अभ्यासात हुशार होते व शाळेत असताना टॉपरही असायचे.

 

सातारकर घरण्यात तीन पिढ्यांपासून किर्तनाची व प्रवचनाची परंपरा चालत आलेली आहे. त्यामुळे वयाच्या ८ व्या वर्षापासून त्यांच्यावर हे संस्कार सुरू झाले होते. चुलते आप्पा महाराज आणि आण्णा महाराज यांचे ते शिष्य होते. पुढे त्यांनी आपलं वकिलीचं पदवी पर्यंतच शिक्षण घेतलं. २४ मार्च १९५४ ला देशमुख दिंडीचे वीणेकरी श्री पांडुरंग जाधव यांची नात दुर्गा हीच्या बरोबर लग्न करून संसार थाटला..

 

घरात कित्येक वर्षाची परंपरा पुढे सुरू ठेवण्यासाठी बाबा महाराज सातारकर यांनी प्रवचन आणि किर्तन करायला सुरूवात केली. बाबा महाराजांचा गोड आवाज सर्व श्रोत्यांना किर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून भुरळ घालायचा.

 

बाबा महाराज सातारकरांनी आषाढी वारी करायला सुरूवात केली. हजारो वारकऱ्यांना घेऊन ते वर्षानुवर्ष त्यांनी दिंडी यशस्वी केली. त्यांच्या वारीचे आणि दिंडीचे अनेक वैशिष्टे आहेत. बाबा महाराजांनी सुरू केलेली परंपरेची, आळंदी ते पंढरपूर वारी, चैतन्यधाम श्रीक्षेत्र दुधिवरे ते आळंदी या पालखीमुळे ती अधिकच मोठी आणि परंपरेची झाली.

 

बाबा महाराजांचा वारकरी फड हा प्रसिध्द झाला तो याच पायी दिडींमुळे. माऊलीच्या पालखीत असणारा सर्वात मोठा फड हा बाबा महाराज सातारकरांचा असतो. ज्यामध्ये सर्व जाती धर्माचे आणि सुशिक्षित वारकरी यामध्ये असतात. या दिंडीच्या माध्यमातून अनेक वारकाऱ्यांना वारीच्या वेळी सोयी सुविधाही पुरवल्या जात असतात. हे सगळं बाबा महाराज यांच्या देखरेखीत वर्षानुवर्ष चालायचं.

 

बाबा महाराज सातारकर यांच किर्तन आणि हरीपाठ म्हणलं की, काही शब्द आजही कानाभोवती फिरतात ते म्हणजे, महाराजांच्या वेगवेगळ्या रागदारीतील रामकृष्ण हरी हरी, विठोबा रुक्माई, राम श्रीराम जय जय राम आणि ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, हे भजन भाविकांमध्ये प्रसिद्ध आहेत.

नाचु किर्तनाच्या रंगी, ज्ञानदिप लावू जगी या नामदेव महाराजांच्या अभंगाप्रमाणे, त्यांनी किर्तन व प्रवचनाची सेवा महाराष्ट्रातील खेडोपाडी जावून केली आहे.

 

महाराष्ट्रातच नाही तर त्यांनी भारतातील इतर राज्यातही त्यांनी आपली किर्तन व प्रवचन सेवा केली आहे. ज्यात आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश या राज्यातही प्रसार केला आहे. तर देशाच्या बाहेर  इंग्लड, अमेरिकेमध्ये केलेले कीर्तनही त्या ठिकाणच्या लोकांना आवडलेले आहेत. बाबा महाराज मराठी भाषेबरोबर हिंदी, इंग्रजी, या तिन्ही भाषेत किर्तन व प्रवचन करायचे.

 

बाबा महाराज सातारकरांना किर्तन, प्रवचन आणि आध्यात्माची प्रचंड आवड होती. जगभर किर्तन आणि प्रवचनासाठी लोक त्यांना बोलवत होते. पण, तेही लोकांना आपण आयोजित केलेल्या कार्यक्रमाला बोलावायचे. यासाठी बाबा महाराज अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करायचे. सप्ताह आयोजित करताना त्याचे नियोजन व्यवस्थित करायचे, कारण या सप्ताहमध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील लोकांनाही त्यामध्ये सहभागी होता येईल याची काळजी घ्यायचे.

 

महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थान असलेल्या पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर, नेवासा, सासवड, देहू, भंडारा, पैठण, तेरढोकी, मंगळवेढा या ठिकाणी ते आयोजन करायचे. या कार्यक्रमात बाबा महाराज सातारकर यांचा सकाळचा हरीपाठ ऐकण्यासाठी लाखो भाविक सकाळी गर्दी करायचे.. बाबा महाराज सातारकर यांच्या हरिपाठाच्या कॅसेट आजही महाराष्ट्रातील घराघरात आहेत.. आणि आजही त्या ऐकल्या जातात.

 

बाबा महाराजांची ज्या पध्दतीने वारकरी धर्माची सेवा करायचे, तसेच ते समाजकार्यही खुप मोठ्या प्रमाणात करायचे. आपल्या किर्तनाच्या माध्यमातून ते व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन सारखे संदेश द्यायचे. नुसते संदेशच न देता त्यासाठी व्यसनमुक्ती शिबीरही राबवायचे, आपल्या चैतन्यधाम या ठिकाणी दररोज ते अन्नदान करायचे, आपल्या वारकरी पंरपरेत सांगितलेल्या कृती त्यांनी प्रत्यक्षात करण्यावर त्यांचा अधिक भर होता. या सर्व प्रकारे समाजाच्या हिताची सदैव जपणूक करत भक्तिप्रेमाने महाराजांची जीवनाची वाटचाल आजपर्यंत सुरू होती.

 

 

बाबा महाराज सातारकर यांनी केलेली वारकरी परंपरेची सेवा आणि समाजकार्य बघता त्यांना अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले होते. महाराष्ट्र शासनातर्फे व्यसनमुक्ती पुरस्कार, कार्यगौरव पुरस्कार, श्री देवदेवेश्वर संस्थान, सारसबाग, पुणे. पुणे विद्यापीठ नामदेव अध्यासनतर्फे पुरस्कार, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती टस्ट, तिसरी जागतिक मराठी परिषद नवी दिल्ली.

 

याशिवाय मुंबई, पुणे, पिंपरी, चिंचवड, सासवड, पैठण, अक्कलकोट, नागपूर, सोलापूर या नगरपालिकेतर्फे आणि महानगरपालिकांतर्फे त्यांना नागरी सत्कार देऊन पुरस्कृत करण्यात आले होते. संगीताच्या जगात एक विक्रमी कीर्तन कॅसेट विक्री बाबत राज्यपालांच्या हस्ते प्लॅटिनम डिस्क देऊन सरगम कॅसेटच्या वतीने गौरविलेले पहिले एकमेव कीर्तनकार महाराजच होते.

 

बाबा महाराज सातारकरांनी आपल्या या कार्याच्या माध्यमातून दोन संस्थाही उभ्या केल्या आहेत. १९८३ ला श्री चैतन्य आध्यत्मिक ज्ञान प्रसार संस्था आणि १९९० ला श्री बाबामहाराज सातारकर ज्ञानपीठ प्रतिष्ठान या दोन संस्थेचे ते अध्यक्ष होते.

 

बाबा महाराज सातारकर यांनी आपलं आयुष्य अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी अर्पण केलं. रोखठोक वाणी आणि शुद्ध विचार हे बाबा महाराज सातारकर यांचं व्रत होतं. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचं प्रबोधन केलं. दरम्यान, यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रूक्मिणी सातारकर ऊर्फ माई सातारकर यांचं निधन झालं होतं.

 

त्यानंतर आठच महिन्यानंतर बाबा महाराज सातारकर यांचीही प्राणज्योत मालवली. आज त्यांच्या निधनाने महाराष्ट्रील वारकरी संप्रदाय शोकसागरात बुडालाय..

 

बाबा महाराज यांना बोल भिडू कडून भावपुर्ण श्रध्दांजली…

हे ही वाच भिडू:

ज्यू लोकांनी मराठी कीर्तन मंडळ स्थापन केलं होत आणि ते पार कराची पर्यंत फेमस होतं

संतविद्यापीठाची चर्चा होते पण बुवांनी १०० वर्षांपूर्वी वारकरी महाविद्यालय स्थापन केलेलं..

संत नामदेव दूर पंजाब पर्यंत जाऊन “बाबा नामदेव” कसे झाले..?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.