बाळासाहेबांचा आदेश आला, नवा बेंच टाकून विद्यार्थ्याला जागा करून देण्यात आली

प्रदीप म्हापसेकर यांच्या ओला कॅनव्हास या पुस्तकातून सदरचा मजकूर परवानगीने घेण्यात आला आहे. मॅजिस्टिक पब्लिकेशनमार्फत ओला कॅनव्हास हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.

यामधील बाळासाहेब ठाकरेंचा किस्सा…

जे.जे. स्कूल ऑफ आर्ट ही देशातील नव्हे, तर जगातली एक प्रख्यात कलावास्तू. याच जे.जे.त एकेकाळी प्रवेश मिळवण्याचं स्वप्न पाहिलं होतं. त्यावेळी गिरगावातल्या एखाद्याने असं स्वप्न पाहावं म्हणजे नवलच. त्यावेळी जे.जे.स्कूल ऑफ आर्ट कुठे आहे, तेसुद्धा ठाऊक नव्हतं मला. दहावीत मार्क्स कमी मिळाले नि हे स्वप्न, स्वप्नचं राहतं की काय असं वाटू लागलं. वेटिंग लिस्टमध्येही नाव लागले नाही.

त्या दिवशी जे.जे.तील यादी पाहून मन सुन्न झालं. आता पुढे काय?

शेवटचा प्रयत्न म्हणून जे.जे.चे डीन हणमंते सरांना भेटायचं ठरवलं.

आठवडाभर त्यांच्या केबिनबाहेर घुटमळायचो. ते सतत कामात. मलाही आत जाण्याचं धाडस होत नव्हतं. केबिनसमोरच्या लाकडी बाकावर माझा मुक्काम असायचा. दोन तास, चार तास, कधीकधी दिवसभर!…

त्यांचा शिपाई पटवर्धन म्हणायचा,

कशाला वेळ घालवतोस?

खर तर माझ्याकडून वेळच वेळ होता. दुसरं काही काम नव्हतं. दुसरा मार्गच नव्हता. एकदा हणमंते सर दुपारी बाहेर आले तेव्हा त्यांना विनंती केली, म्हटलं,

‘ सर प्लीज.. मला ॲडमिशन द्या.. सर प्लीज..हवं तर ही चित्र पाहा..पण माझं काम करा.”

पण हणमंतें सरांनी ढुंकूनही पाहिलं नाही. म्हणाले, ‘सगळं झालंय, तू इथं थांबू नकोस. ‘

त्या वेळी एका छोट्या पेपरात मी पोलिटिकल कार्टून काढायचो. रोज एक व्यंग्यचित्र संध्याकाळी त्यांच्या ऑफिसात नेऊन द्यायचो. त्या दुपारी मी केबिनसमोरच्या त्या बाकड्यावर बसूनच व्यंगचित्र काढत होतो. म्हटलं इथूनच जाऊन देऊ. पटवर्धन म्हणाला,

‘ निघ इथून. साहेब तापलेयत. ‘

मी म्हटलं ,

‘ दहा मिनिटं द्या. हे कार्टून पूर्ण करतो नि निघतो.’

पटवर्धनला त्यावेळी पट्या म्हणत. कार्टून म्हटल्यावर पट्या जवळ आला नि पाहू लागला. म्हणाला, व्यंगचित्रे काढतो?.. हो. मग म्हणाला

तू बाळासाहेबांना का नाही भेटत? त्यांनी फोन केला तर दोन मिनिटांत तुझं काम होईल.’

मला नवल वाटलं. मी म्हटलं, ‘खरचं होईल?’ पट्या म्हणाला, ‘नक्कीच. पण त्यांनी फोन केला तर..!’ असं सांगून पट्या निघून गेला. मी विचारात पडलो, आता बाळासाहेबांना भेटायचं कसं?

दत्ताजी नलावडे आमच्या भागातले सेनेचे नगरसेवक होते. त्यांना भेटायला मग पालिकेच्या ऑफिसात गेलो. त्यांना सगळं सांगितलं. व्यंगचित्रं दाखवली. मग ते म्हणाले,

‘हे बघ. मी तुला त्यांच्याकडे घेऊन जाईन, पण पुढं तू बघ.’

म्हटलं, ठीक आहे.

मग त्यांच्या त्या जुन्या फियाटमधून आम्ही दोनेक दिवसांनी ‘मातोश्री’ वर गेलो.

ते मातोश्रीचं पहिलं दर्शन. मी बाहेर बसलेला. नलावडे आत. दोनेक तासांनी ते बाहेर येतात नि म्हणतात, ‘ आज साहेबांचा मूड ठीक नाहीय. उद्या पुन्हा भेटू.’ इकडे दिवस संपत होते. आता ऑगस्ट सुरू झाला होता.

दुस-या दिवशी पुन्हा मातोश्री. नलावडे साहेबांकडे आत जाऊन विजयी वीरासारखे बाहेर आले. म्हणाले,

साहेबांनी तुला संध्याकाळी सहा वाजता सेनाभवनावर बोलावलंय.

संध्याकाळी पाच वाजताच मी सेनाभवनाखाली असतो. व्यंगचित्राची बॅग सोबत. मला खाली अडवलं जातं. मी व्यंगचित्रं दाखवतो. मला थेट प्रवेश मिळतो!

घड्याळात सहा वाजून गेलेत. आता माझा धीर सुटत जातो.

आत जाणा-या दरवाजातून जाणारे लोक दुस-या शेजारच्या दरवाजातून बाहेर पडत होते. मी चटकन बाहेर पडण्याचा दरवाजा गाठतो. तिथे एक रखवालदारा सारखा माणूस मला अडवतो . मी म्हणतो,

साहेबांनी मला सहा वाजता बोलावलंय. हवं तर ही कार्टून्स बघा.

कार्टून्स बघून तो घाबरतो. उगाच नंतर लफडं नको म्हणून मला आत सोडतो. अन… मला बाळासाहेबांचं दर्शन होतं!

एखाद्याला गर्दीत थेट परमेश्वर दिसावा तसं. बाळासाहेब एका मोठ्या टेबलामागे बसलेत. मागे दोघे – तिघे उभे. समोर के.टी.थापा मान खाली घालून उभा. मग मागचा रखवालदार म्हणतो, पटकन साहेबांसमोर जा आणि थोडासा ढकलतो.

मी किंचितसा धडपडत साहेबांसमोर उभा राहतो. खरं तर पाय लटपटत असतात. आवाजबिवाज सगळं बंद झाल्यागत. ते बसायला सांगतात. मी नलावडेंचा विषय काढतो. सकाळी मातोश्रीवर होतो, याची आठवण करून देतो. ते म्हणतात,

दाखव तुझी कार्टून्स.

मी थरथरत्या हातानं पाच- सहा चित्रं पुढं करतो. बाळासाहेब कार्टून्स पाहतात आणि म्हणतात,

बरी आहे लाईन. ए हणमंतेंना फोन लावा.

हणमंतेंना फोन लावला जातो. फोन रिसिव्हर बाळासाहेबांकडे दिला जातो. बाळासाहेब प्रथम थोडी चौकशी करतात, मग माझा विषय निघतो. बाळासाहेब हणमंतेंना म्हणतात,

सकाळी त्याला पाठवतो. काम करून टाका.

मला ते एक चिठ्ठी देतात. छोटासा तुकडा, त्यावर दोन वाक्यं नि खाली झोकदार सही. बाळ ठाकरे!

एखाद्या हजाराच्या नोटेसारखी मीही बॅगेत ठेवतो. ‘ जा सकाळी भेट त्यांना.’ तरीही माझा विश्वास बसत नाही. नुसत्या फोनवरच्या त्या चार वाक्यांनी मला प्रवेश मिळेल?
दुसरा दिवस सकाळी १० वाजता जे.जे.स्कूल ऑफ आर्ट. डीन हणमंतें सरांच्या केबिनसमोरील बाकडा.

मी बसलोय, हणमंतें सरांची वाट बघत. १०-१२ मिनिटांत ते येतात. नेहमीप्रमाणे घाईघाईत असतात. मला पाहताच जरा उभे राहतात. मग पाठोपाठ आत येण्याची खूण करतात. पटवर्धनला दोन चहा सांगतात. मला वाटतं, अजून कुणी आत असावं. बहुधा चहा त्यांच्यासाठी असावा. हणमंते सर म्हणतात,

‘बस.. खुर्चीवर. तू तिकडे कशाला गेलास?’

म्हटलं, ‘काय सर. दुसरा पर्याय नव्हता. ‘

इतक्यात चहा येतो. एक चहा माझ्यासमोर. मला गरमागरम चटका बसतो. चहा अन् मला? कसं शक्य आहे? हणमंते सर म्हणतात,

‘चल लवकर चहा पी. आपल्याला वर्गावर जायचंय.’

दरम्यान मी ती चिठ्ठी बाहेर काढतो. त्यांच्यासमोर ठेवतो. ते ती पाहून ड्रॉवरमध्ये ठेवतात. खरं तर मला ती चिठ्ठी कायमस्वरूपी हवी होती. बाळासाहेबांची झोकदार सही होती त्यावर. असो.

आम्ही केबिनबाहेर येतो. हणमंते सर घाईघाईत एका वर्गावर येतात. तिथे असलेल्या शिपायांना ते एक बेंच आणायला सांगतात. आम्ही एका वर्गात शिरतो. आत कुणी तरी लेक्चर घेत असतो. आमचा लवाजमा आत येतो.

पुढे हणमंते सर, मागे मी. मग बेंच घेतलेले दोन शिपाई.

हणमंते सर एका रांगेतले बेंच पुढेपुढे सरकवायला सांगतात. सगळ्या मुलांना उठावं लागतं. शेवटी तळाला छोटी जागा होते. त्यात नवा बेंच कोंबतात. अन् मग हणमंते सर मला त्यावर बसायला सांगतात. म्हणतात,

फी वगैरे उद्या ऑफिसात जमा कर.

निघून जातात. अशा त-हेने माझा जे.जे.त प्रवेश होतो!

ॲडमिशननंतर बाळासाहेबांचे सतत आभार मानायचे विचार डोक्यात येतात, पण त्यांच्याकडे परत कसं जायचं?

मी दोनेक दिवसांनी दत्ताजी नलावडेंना भेटतो. त्यांना सगळं सांगतो. त्यांना म्हणतो साहेबांचे आभार मानायला हवेत. ते म्हणतात, नंतर पुढे आपण जाऊ कधी तरी. पण तो दिवस काही आला नाही. महिने गेले, वर्ष गेली. एक चुटपुट राहून गेलेली. बाळासाहेबांचे उपकार मी मनात जपून ठेवले कायमचे.

पुस्तक विकत घेण्यासाठीhttps://www.majesticreaders.com

Leave A Reply

Your email address will not be published.