मासिक पाळीच्या गैरसमजांना १२ व्या शतकात निकालात काढलं ते महात्मा बसवेश्वर यांनी

महात्मा गौतम बुद्ध, संत कबीर, भगवान महावीर आणि सुफी संत परंपरेप्रमाणेच बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी भारताला समता, सहिष्णुता आणि श्रम मूल्यांची देणगी दिली.

बालपणीच लाभलेली प्रचंड बुद्धिमत्ता, जिज्ञासा, रूढी, परंपरेला नाकारण्याची बंडखोरी या प्रवृतीमुळे वयाच्या आठव्या वर्षीपासूनच रूढ धारणांना नाकारण्याचे काम महात्मा बसवेश्वरांनी केले.

आपल्या वचनांमधून त्यांनी लोकांना मोठी शिकवण दिलीय. स्वतःला सर्वश्रेष्ठ समजणारी माणस दुष्काळात दुसऱ्याला पाणी पण का पाजत नाहीत? असे अनेक त्याकाळी न पटणारे प्रश्न त्यांनी विचारले.

याच महात्मा बसवेश्वर महाराजांनी स्त्री पुरुष समता, दलितांना त्यांचा खरा अधिकार देणाऱ्या विचारंची रुजवण भारतात केली. बाराव्या शतकात या माणसाने इतका आधुनिक विचार केला. त्यांचं आणि त्यांच्या वचनांचे चिंतन करणं म्हणूनच महत्त्वाचं ठरतं.

जातिसुतक सुटत नाही, जननसुतक सुटत नाही,
प्रेतसुतक सुटत नाही, रजस्वलेचे सुतक सुटत नाही,
उच्छिष्ट सुतक सुटत नाही, भ्रांती सुतक सुटत नाही,
वर्णसुतक सुटत नाही, मग हे कसले भक्त ? (वचन 777 )

अशा खड्या शब्दांत त्यांनी लोकांना फटकारले आहे.

बसवेश्र्वरांचा उदय होण्यापूर्वी कर्नाटकात हिंदू, जैन, बौद्ध हे धर्म आणि त्यासोबतच कापालिक, कालामुख, शाक्त असे अनेक पंथ होते. पण ही संयुक्त धर्मपरंपरा भ्रष्ट अवस्थेत होती. या पार्श्वभूमीवर बसवेश्वरांनी ‘शिव’ हा एकमेव ईश्वर असल्याची घोषणा करून शिवोपासनेचा पुरस्कार केला.

आज कुठे आधुनिक युगात आपण सगळे जण थोडेफार आंतरजातीय विवाह होताना पाहतो. पण बाराव्या शतकाच्या सुरवातीला मधुवारस ब्राह्मणाची मुलगी कलावती व हरळय्याचा मुलगा रणशिंग यांचे लग्न लावून दिले. लोकांच्या डोक्यातून जातीपातीचे खूळ काढून टाकण्याच्या चळवळीला प्रारंभ केला होता.

आज मोठ्या अभिमनाने आपण स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात अशा गप्पा मारतो. एवढेच काय स्त्री स्वतंत्र आहे, तिला मान आहे अशा अनेक गोष्टी आपण बोलत असतो.

पण एक गोष्ट मात्र आपण आजही विसरत नाही ती म्हणजे “मासिक पाळी”.

आपण ना याविषयी मोकळेपणाने बोलतो ना त्याला सहजपणे स्वीकारतो. 

नैसर्गिक मासिक पळीने विटाळ होतो, सुतक आहे, त्यावेळी तिने पूजा केली तर पाप लागतं आणि असे अनेक समज आपल्यात तसेच आहेत. बऱ्याच जागी ते तसेच पाळलेही जातात.

पण ज्याकाळात आधुनिकता ह्या शब्दाचा मागमूस देखील नव्हता. जेव्हा स्त्रिया सोडाच पण माणसालाच माणूस म्हणून वागवलं जात नव्हतं. अशा काळात एका महात्म्याने मासिक पाळीला विटाळ म्हणण्यास कडकडून विरोध केला होता.

एवढेच नव्हे तर स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार देखील त्यांनीच केला, ते म्हणजे महात्मा बसवेश्वर..!

अजूनही मासिक पाळीला वापरला जाणारा परवलीचा शब्द म्हणजे शिवायचं नाही. हा अस्पृश्यतेचाच एक प्रकार आहे. धर्मात याला सुतक असे नाव आहे. माणसाच्या मृत्यूनंतरही हे सुतक पाळण्यात येतं. अशा रूढींचा त्यांनी समाचार घेतला आहे.

बसवेश्वरांनी कल्याण येथे निर्माण केलेली शिवानुभवमंटप म्हणजेच अनुभवमंटप (मंडप) ही संस्था जगात एखाद्या धर्माने सुरु केलेल्या संस्थेपेक्षा वेगळी ठरेल. वेगवेगळ्या जातींतील व व्यवसायांतील भक्त म्हणजेच शिवशरण या मंडपाखाली एकत्र जमत. विविध विषयांवर चर्चा करत.

बसवेश्र्वरांनी आपला संदेश लोकांना दिला तो या माध्यमातून..! धर्मप्रसारासाठी त्यांनी संन्यास घेतला नाही, कोणतीही भाष्ये लिहिली नाहीत. पण या मंटपातील चर्चेच्या माध्यमातून त्यांनी लोकांमध्ये जागृती केली. येथे परिसंवादाच्या स्वरूपाची चर्चा होत असे त्यातून अनेक चांगल्या गोष्टी समोर येत. याच परंपरेला शरण परंपरा म्हटले जाते. 

तीच कन्नड साहित्यामध्ये वचनसाहित्याच्या रूपाने प्रसिद्ध झाली. 

यातीलच एक विचार म्हणजे,

‘पंचसुतके पाळू नये’

घरात एखादा मृत्यू झाला असल्यास आपण जे सुतक पाळतो ते ही पाळण्याची गरज नाही असे सांगितले आहे. यासंबंधी आपले विचार त्यांनी या वचनातून मांडले आहेत:

लिंग असेल तेथे अस्पृश्यता असेल ?
जंगम असेल तेथे कुळ असेल ?
प्रसाद असेल तेथे उष्टे असेल ?
अपवित्र बोलणा-याचे शब्द हे सुतक, हेच पातक.
निष्कलंक, निजैक्य असलेले त्रिविध निर्णय,
हे कूडलसंगमदेवा, तुमच्या शरणांशिवाय अन्यांना नाही. (वचन 431)  

“जनन झालेल्या घरी सूतक, मरण झालेल्या घरी सूतक, परस्पर भिन्न जातीच्याने शिवल्यास सूतक, मासिक पाळीमुळे स्त्री विटाळशी झाल्यास सूतक, उच्छिष्ट सूतक – वस्तू उष्टे होतात. सोवळे नाश होते.

याला लिंगायत संप्रदायात थारा नाही”

असे महाजगद्गुरू माता महादेवी या प्रसिद्ध लिंगायत गुरु, लेखिका आणि अभ्यासकांनी सांगितलं आहे.

महाजगद्गुरू माता महादेवी यांनी लिंगायत संप्रदायावर वीसहून अधिक पुस्तकांचं लेखन केलं आहे. त्यामुळे त्यांच्या गोष्टी अनेकदा प्रमाण मानून पाळल्या जातात.

गुलबर्गा विद्यापीठातील हुगर निंगाप्पा शिवराया यांनीही आपल्या संशोधनात ही बाब मांडली आहे. आपल्या “बसवेश्वर आणि पेरियार यांचा मानवतावाद: एक तुलनात्मक अभ्यास” या प्रबंधात त्यांनी याविषयी चर्चा केली आहे.

“Basaveshwara also made his reservations clear on impurity of women during menstrual days which had become a heaby yoke on people.”

म्हणजेच लोकांच्या मनावर पगडा असणाऱ्या पाळीतील विटाळासारख्या परंपरांवर त्यांनी आपली मते निर्भयपणे मांडली. त्यांनी लोकांना या रूढींमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

“कोणता धर्म सद्भावाशिवाय टिकू शकतो? माणसाला माणसाचं दुःख कळलं पाहिजे.” अशा अर्थाचं त्यांचं एक वचन आहे. ते उद्धृत करून बसवेश्वरांनी आपल्या काळात किती क्रांतिकारी विचार केला होता याचा प्रत्यय येतो.

असा विचार देणाऱ्या या माणसाची पूजा आज आपल्या देशात कित्येक लोक करतात. पण त्यांचे विचार काय आपल्यला कळाले नाहीत असेच म्हणावे लागेल. खर तर आपण आधुनिक झालो ते फक्त हातात मोबाईल आणि कॉम्प्युटर आले म्हणून. पण या अशा महापुरुषांचे विचार वाचले की आपण किती मागे आहोत, असेच वाटते.

(वचने आणि महाजगद्गुरू माता महादेवी यांच्या विधानांचे कन्नडमधून भाषांतर – मल्लिनाथ ऐनापुरे.)

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.