एक काळ असाही होता, जेव्हा ओमानचा सुलतान भारताच्या राष्ट्रपतींचा ड्रायव्हर बनला होता..

भाजपच्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैंगबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि वाद इंटरनॅशनल झाला. अरब देशातून मोठ्या प्रमाणात या गोष्टीचा निषेध होवू लागला आणि अरब देशातल्या कचराकुंड्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावण्यात आले.

असे फोटोच कॉंग्रेसचे नेते सुरेंद्र राजपूत यांनी ट्विट केले. मोदींना कितीही विरोध असला तरी ते देशांतर्गत आहेत. मात्र जागतिक पातळीवर कोणत्याही देशात भारतीय पंतप्रधानांचा अपमान होत असेल तर प्रत्येकाने या गोष्टींचा विरोध करायला हवा अस त्यांनी म्हणलं आहे…

पण हे वातावरण पहिल्यापासून होतं का, तर नाही..

इतिहासात अरब देश आणि भारताचे खूप चांगले संबंध असल्याचं दिसून येतं. उदाहरण द्यायचं झालं तर खालील स्टोरी पाहू शकता.

कधीकाळी भारताचा रुपया अरब देशाचं अधिकृत चलन होतं.

असच एक उदाहरण म्हणजे ओमानचे सुलतान सर्व प्रोटोकॉल तोडून भारताच्या राष्ट्रपतींचे ड्रायव्हर झाले होते तो किस्सा..

ती तारीख होती ३ ऑक्टोबर १९९६.

भारताचे राष्ट्रपती एका खास दौऱ्यासाठी ओमानची राजधानी मस्कतला पोहचले. त्यांचं एअर इंडियाचं विमान तिथल्या विमानतळावर लँड झालं, ते विमानातून खाली उतरले तेव्हा त्यांना धक्का बसला.

ओमानचा सुलतान त्यांचं शाही स्वागत करण्यासाठी स्वतः विमानतळावर आला होता.

खरं तर पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी सुलतानाने विमानतळावर जाणे हा काही शिष्टाचाराचा भाग नाही. तरीही प्रोटोकॉल मोडून ओमानचा सुलतान काबुस विमानतळावर आला.

इतकंच नाही तर शंकर दयाळ शर्मा व त्यांच्या पत्नी विमला शर्मा हे ओमानच्या राष्ट्रपतींच्या कार मध्ये बसले तेव्हा काबुस यांनी ड्रायव्हरला उतरण्यास सांगितले.

ड्रायव्हर सीटवर स्वतः बसून कार हाकत भारतीय राष्ट्रपतींना आपल्या राजवाड्यात आणलं.

ओमानचे अनेक वरिष्ठ अधिकारी, मंत्री तिथे हजर होते. त्यांना सर्वांना या गोष्टींचं आश्चर्य वाटत होतं. असं स्वागत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचे होणार नाही ते भारतीय राष्ट्रपतींचे का होत आहे हा प्रश्न अनेकांना पडला होता.

त्यांना काही पत्रकारांनी देखील हा प्रश्न विचारला तेव्हा काबुस यांनी सांगितलं की,

“मी एअरपोर्टवर त्यांना आणायला गेलो याच कारण ते फक्त भारतीय राष्ट्रपती आहेत हे नाही. मी जेव्हा काही काळ भारतात शिकायला होतो तेव्हा शर्मा यांनी मला शिकवलं आहे. ते माझे शिक्षक आहेत. गुरूंचा सन्मान करण्यासाठी मी हे सगळ केलं.”

आजही अनेकदा हे ऐकलं की अनेकांना अविश्वास वाटतो. तेलाचे राजकारण करणारे बक्कळ पैसे असलेले अरब सुलतान आपल्याच मस्तीत जगतात. ते आपल्या गुरूंचा सन्मान करण्यासाठी अस करतील हे कित्येकांना पटत नाही पण अनेक पुस्तकात, न्यू इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्रात देखील हा किस्सा सांगितला आहे.

काबुस बिन सैदचा जन्म ओमानच्या सलालाह शहरात झाला.

त्याचे वडील सुलतान सैद बिन तैमुर हे आधुनिक शिक्षणाच्या बाबतीत जागरूक होते. त्यांचं स्वतःच शिक्षण भारताच्या राजकुमारांच्या मेयो कॉलेजमध्ये झालं होतं. इंग्रजी येणारे ते पहिले सुलतान होते. त्यांच्या आग्रहामुळे काबुस यांना देखील भारतात यावं लागलं.

पूर्वेच ऑक्सफर्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात ओमानचा हा राजकुमार शिकत होता. एकेकाळी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेले शंकर दयाळ शर्मा काही काळ पुण्यात शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कडून काबुसने काही धडे गिरवले.

अस म्हणतात की शाळा कॉलेजच्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही.

तेच काबुसच्या बाबतीत झालं. पुण्यातील ते वास्तव्य, भारतीय संस्कृती, इथलं शिक्षण, खुले विचार याचा त्याच्यावर प्रचंड प्रभाव पडला.

इंग्लंडमध्ये लष्करी शिक्षण घेऊन तो ओमानला परत गेला सत्ता आपल्या हाती घेतली. जवळपास पन्नास वर्षे त्याने ओमानवर राज्य केलं.

ओमानला आधुनिक बनवण्यात सर्वाधिक वाटा सुलतान काबुस बिन सैद याचा मानला जातो.

एकेकाळी मैलोनमैल वाळवंट पसरलेल्या उंटावरून फिरणाऱ्या अरबांच्या देशात त्यानी अनेक उद्योगधंदे आणले, पाणी आणलं. वाळवंटात हिरवळ फुलवली.

भारताचा तर तो सर्वात जवळचा मित्र होता. ओमानच्या परराष्ट्र धोरणात याची झलक कायम दिसायची. इतर अरब देश यांच्या विरोधात जाऊन त्याने प्रत्येकवेळी भारताला सपोर्ट केले.

शंकर दयाळ शर्मा यांचा हा विद्यार्थी आयुष्यभर भारताचे उपकार कधी विसरला नाही.

जेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ओमानच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा त्याने असेच धडाक्यात स्वागत केले होते. मस्कत मधील २५० वर्षे जुन्या शिव मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. अनेक करारावर सह्या झाल्या. ओमानच्या तुरुंगात असलेल्या सर्व भारतीय कैद्यांची सुटका केली. ही मैत्री दोन्ही बाजूनी होती. भारताच्या सर्व सरकारांनी त्यांचा आदर राखला.

त्यांना जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

जेव्हा जानेवारी २०२० मध्ये ओमानचे सुलतान काबुस बिन सैद यांचे निधन झाले तेव्हा भारतात राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवून शासकीय दुखवटा पाळण्यात आला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.