उद्धव ठाकरे पहिल्यांदा भाषण देण्यासाठी उभा राहिले अन् पाठ केलेलं भाषणच विसरले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेला अवघे काही तासच राहिलेत. बऱ्याच काळानंतर उद्धव ठाकरेंची अशाप्रकारे जाहिर सभा होत असल्या कारणाने शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून व गेल्या दोन चार महिन्यात झालेल्या राजकारणाचा समाचार उद्धव ठाकरे या सभेमार्फत घेतील अस बोललं जातय.

मशिदी व भोंगा, राज ठाकरेंचा हिंदूत्ववाद, भाजपकडून झालेले आरोप, उद्धव ठाकरेंच्या घरापर्यन्त आलेली ED ची कारवाई, राणा दांपत्याचा मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा म्हणण्याचा अयशस्वी प्रयोग अशा अनेक प्रश्नांना खास “टोमणे” मारून उद्धव ठाकरे प्रत्युउत्तर देणार असल्याचं बोललं जातय..

थोडक्यात काय तर उद्धव ठाकरेंच्या आजच्या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे. मात्र एक वेळ अशी होती जेव्हा उद्धव ठाकरे भाषण देण्यासाठी उभा राहिले अन् भाषणच विसरून गेले.

हा किस्सा आहे उद्धव ठाकरेंच्या पहिल्या भाषणाचा…

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत सक्रिय झाल्यानंतर केलेल्या पहिल्या भाषणाचा किस्सा स्वतः सांगितला होता.

उद्धव ठाकरे हे पहिल्या पासूनच शांत अशा स्वभावाचे होते. राज आणि उद्धव या दोघांनीही जवळपास एकाचवेळी राजकारणात पदार्पण केलं होतं. परंतु उद्धव ठाकरे हे पडद्यामागे अधिक प्रमाणात सक्रिय राहिले. त्या मानाने राज ठाकरे हे सुरुवातीपासूनच आघाडीवर लक्षवेधी कामगिरी करत राहिले.

उद्धव ठाकरेंनी राजकारणात उघडपणे सक्रिय होण्याचं ठरवलं ते १९९० नंतर.

त्यांचा पहिला सार्वजनिक कार्यक्रम होता मुंबईच्या पूर्वेकडील उपनगर मुलुंड येथील झोपडपट्टी मधील नळ कोंडाळयाचं उदघाटन. १९९० च्या सुरुवातीला उद्धव यांची प्रतिमा खालमानेने वावरणारे आणि राजकीय डावपेचांची आवड नसलेले व्यक्तिमत्त्व अशी होती. ते शांत स्वभावाचे आणि अत्यंत मृदूभाषी होते.

अशातच त्यांना ९१ साली एक भाषणाची आयती संधी चालून आली होती. 

डिसेंबर १९९१ मध्ये राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इमारतीवर बेरोजगार तरुणांचा एक मोर्चा आयोजित केला होता. त्यावेळी महाराष्ट्राची दुसरी राजधानी नागपूर इथं प्रथेनुसार हिवाळी अधिवेशन सुरू होतं. त्यावेळी सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते. या मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

मोर्चाला पुरेसा प्रतिसाद आणि पाठिंबा मिळवण्यासाठी राज ठाकरे महाराष्ट्रभर फिरले. ज्येष्ठ पत्रकार नारायण आठवले यांनी मोर्चाचे निवेदन लिहून काढले. नागपूर मोर्चा विराट होईल हे स्पष्ट दिसू लागलं होतं. मोर्चाचा आदल्याच दिवशी राज हे नागपूर मध्ये हॉटेल सेंटर पॉईंट मध्ये मुक्कामाला होते.

रात्री त्यांना मातोश्रीवरून फोन आला आणि मोर्चानंतरच्या सार्वजनिक सभेत उद्धवला बोलू द्यावं असं सांगितलं गेलं.

दुसऱ्या दिवशी मोर्चा निघाला तेव्हा एका ट्रकवर बनविलेल्या लाकडी फळ्यांच्या तात्पुरत्या व्यासपीठावर उद्धव ठाकरे बसले होते. सभेला सुरुवात झाली. सर्वांची भाषण झाली. त्यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते असलेल्या मनोहर जोशी यांनी घोषणा केली की आता उद्धव हे भाषण करतील.

मोर्चामध्ये अंदाजे ५० हजाराचा जमाव होता.

या सभेला जाण्याआधी उद्धव ठाकरे यांनी भाषण लिहून ते पाठांतर केलं होतं. जेणेकरून लोकांना कळू नये की, उद्धव ठाकरेंना काही येत नाही. पण जेव्हा ५० हजारांचा तो जमाव बघितला आणि माईकसमोर उभं राहिल्यावर उद्धव यांना भाषणच आठवेना. तेव्हा त्यांना जे सुचलं ते बोलले आणि त्याही भाषणाला त्यांना टाळ्या मिळाल्या…

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.