मुंबई बॉम्बस्फोटावेळी अंधेरी ते वरळी पायी चालत जावून बातमी देणारे प्रदीप भिडे होते..

 

नमस्कार ,मी प्रदीप भिडे …आजच्या प्रादेशिक बातम्या देत आहे.

बास्स अजून काय पाहिजे जिंदगीत. प्रदीप भिडेंचा आवाज अस लिहलं तरी तूमच्या कानात तो आवाज घुमू लागतो. शांत संयमीत बातम्या देणारा हा आवाज. अर्ध्या तासाचा आवाज तासन् तास ऐकला जावू शकतो तसा तो आवाज असायचा.

आजच्याच दिवशी प्रदीप भिडे यांच निधन झालं आणि संयमीत शांतपणे फक्त बातमी सांगणाऱ्या शेवटचा धागा देखील निसटला..

घरातला एखादा पोक्त माणूस चार समजवण्याच्या स्वरात काहीतरी महत्वाचं सांगत आहे आणि कळण्याची अक्कल असो किंवा नसो आपण ते ऐकायला हवं असा हा माणूस.

प्रदिप भिडे हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातले व्यक्ती. आई शुभलक्ष्मी आणि जगन्नाथ हे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत नोकरी करत असत. त्यामुळे ग्रामीण भागात जिथे रयतच्या संस्था अशा संस्थांच्या ठिकाणी प्रदीप भिडे यांच शालेय शिक्षण झालं.

पुढे अकरावी पास झाल्यानंतर ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आले. विज्ञान शाखेची पदवी घेवून पुण्यातील ‘रानडे’ मधून पत्रकारतेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. आई वडिलं दोघेही संस्कृत, मराठी आणि हिंदी भाषेचे शिक्षक. त्यामुळे वाचन आणि उच्चार यांच्यावर लहानपणापासून आईवडिलांच्या शिक्षकी पेक्षाचा परिणाम होत गेला. भगवद्गितेतील अध्याय हा घरात रोज मोठ्याने म्हणायला हवा, हा दंडक पाळला जात असे.

रानडे मध्ये पत्रकारतेच शिक्षण घेत असताना मुंबई दूरदर्शन केंद्रावर उपसंचालक असलेले ल.गो. भागवत त्यांना दूरदर्शन हा विषय शिकवण्यासाठी येत असत. यावेळीच भागवतांनी दूरदर्शन केंद्रावर काम करण्याची इच्छा असेल तर मला येवून भेटावं अस सांगितलं. ठरल्याप्रमाणे शिक्षण पूर्ण होताच ते भागवत यांना भेटायला गेले आणि प्रशिक्षणार्थी निर्मीती सहाय्यक म्हणून दूरदर्शनमध्ये रुजू झाले.

काम सुरूच असतानाच मुंबई केंद्राचे तत्कालिन संचालक शास्री यांनी प्रदीप भिडेंचा आवाज ऐकून तू बातम्या का वाचत नाहीस? अशी विचारणा केली. भिडेंनी रितसर वृत्तनिवेदक पदासाठी ऑडिशन दिली आणि त्यांची निवड देखील झाली. 

मुंबई दूरदर्शन केंद्रावर ते १९७२ साली निवडले गेले आणि १९७४ च्या डिसेंबर मध्ये त्यांनी वृत्तनिवेदक म्हणून बातम्या वाचण्यास सुरवात केली. १९७४ साली बातम्या वाचण्याचा सुरू झालेला हा प्रवास २०१६ पर्यन्त चालूच राहिला.

प्रदीप भिडे यांना वृत्तनिवेदन, सूत्र संचालन यांचा ३५ वर्षांपासूनच दिर्घ अनुभव. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी दूरदर्शनच्या वृत्तविभागात सुरवात केली. मुंबईच्या वृत्तविभागामध्ये अनुवादक, प्रौढ साक्षरता मालिकांमधून अभिनय निर्मिती सहाय्यक, दूरदर्शनचे वृत्त निवेदक, योग विषयक मालिकांची निर्मीती, ई मर्क या जर्मन कंपनीत जनसंपर्क अधिकारी, हिंदूस्थान लिव्हर्सचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी पुढे प्रियंका स्टुडिओची स्थापना, कॉर्पोरेट फिल्मस्, शॉर्ट फिल्मस् ची निर्मीती अशा अनेक मुलखात प्रदिप भिडे मनसोक्त रेंगाळले आणि रेंगाळत आहेत.

 

मध्यंतरी त्यांच्या मृत्यूची अफवा उठवण्यात आली,

आयुष्यभर ज्यांनी खऱ्या बातम्या लोकांपर्यन्त पोहचवण्याचं काम केलं त्यांच्याच नशिबात फेक न्यूज यावी हे खरंतर आजच्या डिजीटल मिडीयाचं अपयशच म्हणावं लागेल. 

राजीव गांधी यांची हत्या झाली तेव्हा वृत्त संपादिका विजया जोशी यांनी प्रदीप भिडे यांना असशील तसा त्वरित निघून ये असा निरोप पाठवला. तोपर्यन्त ही बातमी मुंबईत पसरली होती. संपूर्ण मुंबई शांत झाली होती. वाहतुकीची कोणतीही सोय नव्हती तेव्हा पोलीसांच्या जीपने भिडे दूरदर्शन केंद्रावर आले. सकाळी साडेसहाच्या बातम्यांमध्ये राजीव गांधींच्या मृत्यूची बातमी त्यांनी वाचली.

आजही राजीव गांधी जाण्याची आठवण जून्या लोकांना विचारली तर ते प्रदीप भिडे यांच्या आवाजातील त्या बातमीचा उल्लेख करतात.

अशीच बातमी होती मुंबईच्या बॉम्बस्फोटांची. १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांची बातमी देण्याची जबाबदारी प्रदीप भिडे यांच्याकडे आली. प्रसंग ओळखून ते घरातून दूपारीच निघाले. अंधेरी ते वरळी असा पायी प्रवास करून ते ऑफिसमध्ये पोहचले आणि बातमी दिली. संध्याकाळी साडेसातला दिलेल्या त्या बातमीचा देखील आज उल्लेख केला जातो.

लोकांच्या स्मरणात जशा घटना आहेत तशा प्रदीप भिडे यांनी दिलेल्या बातम्या आहेत. आज आम्ही ॲंकर लोक किती कष्ट घेतो, तासन् तास उभा राहतो म्हणून क्रेडिट घेण्याचा नवा प्रकार जन्माला आला आहे. अशा काळात भाषेवर काम करणारे, कधीही न चुकणारे, उच्चारांवर काम करणारे आणि शब्दांच गांभीर्य ओळखून बातम्या देणाऱ्या प्रदिप भिडेंचा आवाज आठवल्याशिवाय रहात नाही.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.