जेंव्हा मुंडे आपल्याच पक्षात एकटे पडले तेव्हा त्यांना सावरलं ते बाळासाहेब ठाकरेंनी…

१८ नोव्हेंबर २०१२ चा सामनाचा अंक. सामनाच्या या अंकात बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी लेख लिहले होते. यातलाच एक लेख लिहला होता गोपीनाथ मुंडे यांनी. या लेखाची सुरवात करतानाचा गोपीनाथ मुंडे लिहतात,

काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये माझा वैयक्तिक संघर्ष सुरू होता..

मन:स्थिती ढासळली होती.. काय करावे सुचत नव्हते. याच वेळी मी मातोश्रीवर गेलो. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांची माझी भेट झाली. या भेटीनंतर ते मला त्यांच्या वैयक्तिक रुममध्ये घेवून गेले. प्रथम त्यांनी मला तेथील गणपतीला नमस्कार करायला लावला. यानंतर भगवा टिळा माझ्या डोक्यावर लावल्यानंतर ते म्हणाले,

भगवा आयुष्यभर सोडू नकोस. माझा गणपती आणि माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहतील.

या त्यांच्या बोलण्याने माझे सैरभैर झालेले मन पूर्णपणे शांत झाले. 

बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांचे नाते वेगळे होते. काल औरंगाबाद शहरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सभा झाली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले. मुंडे मातोश्रीवर आले व त्यांनी बाळासाहेबांकडे औरंगाबादच्या महापौरपदाची मागणी केली. बाळासाहेब कागद घेवून आकडेमोड करत बसले नाहीत. त्यांनी भाजपकडे महापौरपद दिलं. त्यामुळेच भागवत कराड महापौर झाले.

दूसरीकडे कालच भाजपकडून विधानपरिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. भाजपकडून पंकजा मुंडे यांना संधी देण्यात येईल अशा चर्चा होत्या मात्र भाजपकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळेच भाजपमध्ये पंकजा मुंडेंना डाववलं जात असल्याच्या चर्चा बळ मिळालं…

अशा वेळी पंकजा मुंडेंनी भाजप सोडून शिवसेनेचा रस्ता धराला असाही एक प्रवाह सुरू झाला. त्यासाठी बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडेच्या संबंधाचा दाखला देण्यात येवू लागला.

त्यामुळेच बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांचे संबध कसे होते हे पाहणं गरजेचं ठरतं.

१९८३-८४ ची गोष्ट असेल. गोपीनाथ मुंडे त्यावेळी राजकारणात नवीन होते. शिवसेना आणि मुंबईबद्दल त्यांच्या मनात एक वेगळे आकर्षण होते. त्यावेळी अजून शिवसेना आणि भाजपची युती व्हायची होती. प्रमोद महाजन हे गोपीनाथरावांचे मित्र राष्ट्रीय राजकारणात चमकू लागले होते. 

महाजनांनीच शिवसेनेबरोबर भाजपची युती साकार करण्यास मोलाची भूमिका बजावली होती. बाळासाहेबांनी देखील अटल बिहारी वाजपेयी यांचे नेतृत्व मला आवडते असे सांगत या युतीला होकारभरला होता. विशेष म्हणजे मनोहर जोशी, सुधीर जोशी या आपल्या नेत्यांना त्यांनी कमळ चिन्हावर निवडणुकीसाठी उभे करण्याचा निर्णय घेतला.

स्वतःचा पक्ष असतानाही त्यांना एखादी गोष्ट भावली की त्यासाठी काहीही करायची त्यांची तयारी असायची. …….

अशावेळी पक्षबिक्ष ते बाजूला ठेवायचे !

१९९० सालच्या विधानसभा निवडणुकांवेळी त्यांनी महाराष्ट्राचा दौरा करताना तब्बल शंभर सभा घेतल्या. गोपीनाथ मुंडेंची इच्छा होती की बाळासाहेबांनी परळी येथे सभा घ्यावी. बाळासाहेब अहमदपूरला सभा घेण्यासाठी आले होते.

थोड्याशा अस्वस्थ झालेल्या गोपीनाथरावांनी थेट अहमदपूर गाठून त्यांना माझ्या मतदारसंघात सभा घ्या अशी विनंती केली.

खरे तर गंगाखेड कंधार येथे शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारसभा होत्या. बाळासाहेबांना तिकडे जायचे होते. तरी ते मुंडेंना म्हणाले,

संध्याकाळी ५ वाजता सभा लाव, मी येतो.

बाळासाहेबांनी होकार देताच मुंडे थोडे गांगरून गेले. त्यांना अपेक्षाच नव्हती की बाळासाहेब होकार देतील. शिवाय एवढ्या कमी वेळात माणसे येतील का ? अशी भीती मनात होती. पण तब्बल ३० हजार लोक एवढ्या कमी वेळेत तेथे आले.

५ वाजताची वेळ उलटून गेली. सात वाजले. अजून शिवसेनाप्रमुख पोहचले नव्हते. गोपीनाथरावांना देखील पुढच्या प्रचारासाठी जायचं होतं. बाळासाहेबांची सभा होईल की नाही याची खात्री कोणाला नव्हती. तेवढ्यात त्यांचा मुंडेंना निरोप आला.

उशीर होईल पण मी येतोय. तू प्रास्ताविक कर आणि पुढे प्रचारासाठी निघून जा.

आणि खरंच दिलेल्या शब्दाला जागत बाळासाहेब आले. त्यांची वाट बघत बसलेली जनता जागची हलली नव्हती. मुंडे साहेब सांगतात,

“ते साडेआठ वाजता सभेला आले आणि त्यांनी मैदान मारून माझ्या विजयाचा मार्ग मोकळा केला. दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी झटणारा असा दुसरा नेता माझ्या तरी पाहण्यात नाही !”

पुढे १९९५ मध्ये जेव्हा युतीची सत्ता आली तेव्हा मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे आणि उपमुख्यमंत्रीपद भाजपकडे अशी वाटणी करण्यात आली होती.

मनोहर जोशी मुख्यमंत्री तर मुंडे उपमुख्यमंत्री झाले. गोपीनाथरावांना त्यासोबत महसूलमंत्रीपद हवे होते. युतीतील जागा वाटपानुसार महसूल भाजपकडे जाणार होते.

पण बाळासाहेबांनी जागावाटपात चक्क बदल केला. त्यांनी आपल्या वाट्याला आलेले गृहमंत्रीपद गोपीनाथ मुंडेंना दिले आणि सेनेच्या सुधीर जोशी यांच्यावर महसूलमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली. तेव्हा त्यांनी गोपीनाथ मुंडेंना बजावून सांगतलं,

“गृहमंत्रीपदावर तुझ्यासारखा आक्रमक व कणखर माणूस हवा. मुंबईतील गुन्हेगारीशी मुकाबला करायचा असेल तर तूच त्या जागी पाहिजे.”

बाळासाहेब दिलेल्या शब्दाला जागणारे होते. आपल्या पक्षाच्या फायद्या तोट्याची गणिते न करता त्यांनी मराठी माणसाचा फायदा कशात आहे याचाच विचार केला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.