बाळासाहेब विखे पाटलांना चीनमध्ये एका टॅक्सीवाल्याने फसवलं होतं

स्व.बाळासाहेब विखे पाटील यांच्या अनेक आठवणी आज देखील काढल्या जातात त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात सांगितल्याप्रमाणे त्यांनी हाताळलेले विषय, त्यांनी मांडलेले संशोधन इत्यादी गोष्टी आजही वाचल्या जातात, इतरांना सांगितल्या जातात. 

यापैकीच एक म्हणजे त्यांच्या चीन ला दिलेल्या भेटीच्या आठवणी.

चीनमध्ये पर्यटक म्हणून किंवा अन्य कारणासाठी जाणाऱ्या भारतीयांचं प्रमाण पूर्वी अत्यंत कमी होतं, युरोप, अमेरिका, इस्राईल किंवा अन्य पाश्चिमात्य देशांमध्ये जाणाऱ्या भारतीयांची संख्या नेहमीच मोठी असते. तिकडे जाण्यासाठी परवानापत्रही सहज मिळते. चीनबाबत तशी परीस्थिती नव्हती. आणि म्हणूनच बाळासाहेबांनी ठरवलं होतं कि, निमित्त आणि संधी मिळाली, तर आपण चीनला जावं.

तशी संधी त्यांना ऑक्टोबर १९८८ मध्ये बीजिंगमध्ये भरणाऱ्या आशियायी स्तरावरील ग्रामीण आरोग्य परिषदेमुळे मिळाली. तेथील आरोग्य सेवेविषयीची बाळासाहेबांना उत्सुकता होती. विविध देशांतून येणाऱ्या व आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिनिधींशी बोलण्याची चांगली संधी मिळतेय, म्हणून ते या परिषदेसाठी गेले. त्यासाठी ते चार दिवस तरी बिजींगमध्ये थांबले होते.

या परिषदेत त्यांनी “ग्रामीण भारतातील माता आणि बालक यांच्या आरोग्याविषयी शोध निबंध” सादर केला होता. 

बाळासाहेब सांगतात कि, मी काय वैद्यकीय क्षेत्रातला तज्ज्ञ नाही, पण सामान्य माणसांचे आरोग्यविषयक प्रश्न मला चांगले समजतात. प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या कार्याच्या माध्यमातून मी जे अनुभव घेत होतो, पाहत होतो, समाजाकडून ऐकत होतो; त्याचंच प्रतिबिंब या शोधनिबंधामध्ये उतरलं होतं. ‘माता आणि बालक यांचा एकत्रित विचार आरोग्यसेवेत व्हावा, हा माझ्या शोधनिबंधाचा गाभा होता.

 माता-बालकांची काळजी, गरोदरपणाअगोदर, गरोदर असताना, बाळंतपण व नंतरच्या विविध भारतीय उपचारपद्धती यासंबंधी बोलून सर्व स्तरावर प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सेवा पुरवण्याची गरजेचे प्रतिपादन केले. 

जेंव्हा ते बिजींगमध्ये ते विमानातून उतरले, तेंव्हा रात्रीचे साडे दहा वाजले होते. उतरताच टॅक्सीवाल्यांनी त्यांना घेरलं होतं. म्हणजे आपल्याकडे रेल्वेस्टेशन, एस. टी. स्टॅण्ड या ठिकाणी रिक्षा, टॅक्सीवाले आणि मोठ्या देवस्थानांजवळ फुले-हारवाले भक्तांना जसे गांगरून टाकतात, तसाच हा प्रकार तिथे देखील घडत होता.

तेवढ्यात त्या गराड्यात देखील त्यांनी कशी बशी एक टॅक्सी पडकली. 

त्या टॅक्सीवाल्यानं त्यांना त्यांच्यासाठी राखीव असणाऱ्या हॉटेलकडे न नेता भलतीकडेच नेलं. साहजिकच आहे नवीन माणसाला तिथले रस्ते काय कळणार ते नवीनच होते, अन त्यात रात्रीची वेळ असल्यानं ते पुरते फसले होते. आपल्याकडे मीटर भाडं वाढावं, म्हणून नवीन प्रवाशाला जसे काही रिक्षा-टॅक्सीवाले फिरवतात किंवा लांबच्या रस्त्यानं नेतात, तसाच हा अनुभव ठरलेल्या हॉटेलमध्ये रात्री बारा वाजता पोहोचले. तिथे अकरा वाजेपर्यंत पोहचणं अपेक्षित होतं. 

परिषदेच्या आयोजकांनी त्यांना घेण्यासाठी माणसं ठेवली होती, पण टॅक्सीवाल्यांच्या गडबडीत ते त्यांच्या लक्षात आलं नाही. कसं बसं ते परिषदेच्या ठिकाणी पोहचले…

आरोग्य परिषद एकूण चार दिवस चालली होती. तेथे पिण्यासाठी पाणी न देता गरम चायनीज चहा ठेवायचे. त्याला एक स्वाद असायचा, लोकं खूप आवडीनं तो चहा घ्यायचे. विखे पाटलांना देखील तो चहा आवडला. चौकशी करता सांगण्यात आलं, की कोणत्याही परिषदेसाठी चीन चे लोकं त्यांच्या अशा कॉन्फरन्समध्ये पाण्याऐवजी या चहाचीच व्यवस्था करतात. फक्त स्वाद आणि रंग बदलतो. परिषदेसाठी विविध देशांतून आलेल्या ग्रामीण आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिनिधींशी विखे पाटलांची सविस्तर चर्चा झाली.

बिजीगच्या मेयरनी त्यांच्यासाठी आयोजित केलेल्या रात्रीच्या भोजनासाठी परिषदेचे अध्यक्ष, विखे पाटील व अन्य समाजवादी देशांचे निवडक सहा प्रतिनिधी उपस्थित होतो. चीनमध्ये मेयरचं जेवण हे राजकीयदृष्ट्या अतिमहत्त्वाचं व सन्मानाचं मानलं जातं. चीनमध्ये या पदाला अति उच्च स्थान आहे. परिषदेमधे सुरक्षाव्यवस्था कडक होती. मुळातच चोर-गुन्हेगार यांना तेथे दयामाया दाखवत नाहीत. जलदगती न्यायालयात खटला चालवून लगेच निकाल लावतात आणि शिक्षेची अंमलबजावणी करतात. त्यामुळे कायदा मोडण्याची हिम्मत कुणी करीत नाहीत.

एके दिवशी ‘बुफे’ पद्धतीच्या जेवणाची व्यवस्था असणाऱ्या ठिकाणी हे भारतीय पाहुणे गेले. टेबलावर ठेवलेलं अन्न  वाढण्याचं काम मुली करीत होत्या. जेवणासाठी वेळेवरच जावं लागतं. वेळेत आलेल्या पाहुण्यांना त्यांनी जेवण वाढलं. नंतर लगेच त्यांनी स्वतःसाठी ताटं वाढून घेतली. नंतर आलेल्या कुणालाही जेवण वाढलं नाही. उशिरा आलेल्या अधिकाऱ्यांनाही हातानं वाढून घ्यावं लागलं. त्यांनाही त्याचं काही वाटले नाही. तेथे तशीच पद्धत आहे.

परिषदेचं कामकाज संपल्यावर वेळ काढून विखे पाटील आणि इतर भारतीय पाहुणे शहरात फिरत असे….पण त्यानंतर त्यांना कोणत्याही टॅक्सीवाल्याने फसवलं नाही..

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.