गुरूजींच्या दाव्यानुसार खरच अमेरिकेने एकादशीला चांद्रयान सोडलं होतं का..? वाचा.

७ सप्टेंबरच्या मध्यरात्री अख्खा भारतदेश जागा होता. फक्त भारताचच नाही तर संपूर्ण जगाची उत्सुकता लागून राहिलेलं  चांद्रयान २ चंद्रावर लँड होणार होत. पण दुर्दैवाने चंद्राच्या भूमीला २.१ किमी एवढ अंतर राहिलं असताना चांद्रयानाच्या विक्रम लँडरचा संपर्क तुटला. या यानाच्या निर्मितीसाठी गेली दहा वर्षे राबणाऱ्या इस्रोच्या संशोधकांबरोबरच करोडो भारतीयांना धक्का बसला.

दुसऱ्या दिवशी अनेकांची उलटसुलट प्रतिक्रिया आली. देशातील प्रत्येक नागरिक या संशोधकांच्या पाठीशी होता पण काही जणानी इस्रोचं काय नेमक चुकलं याबद्दलचा अनाहूत सल्ला देण्याचा चोंबडेपणा केला. कट्ट्यावर बसून गप्पा मारणारे यात  आघाडीवर होते.

याच पार्श्वभूमीवर सोलापूर येथे बोलताना श्रीशिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांनी अजब तर्क मांडला. ते म्हणाले

” 38 वेळा अयशस्वी ठरलेल्या नासाच्या वैज्ञानिकाने भारतीय कालमापन पद्धतीचा अभ्यास केला आणि उपग्रह सोडला तो यशस्वी झाला. अमेरिकेने एकादशी दिवशी उपग्रह सोडला कारण त्या दिवशी ब्रह्मांडातील स्थिती संतुलित असते. त्यामुळे तो प्रयोग यशस्वी झाला.”

इस्रोने देखील एकादशीच्या दिवशी चांद्र यान प्रक्षेपित केले असते तर ते यशस्वी ठरले असते असं गुरुजींना सुचवायचं होतं. त्यांच्या या  विधानामुळे सोशल मिडियावर टीका करण्यात आली. त्यांच्या समर्थकांनी गुरुजींची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांचं म्हणणं आहे कि भिडे गुरुजी स्वतः अॅटॉमिक फिजिक्स या विषयाचे गोल्ड मेडलिस्ट डॉक्टरेट आहेत, स्वतः त्यांनी नासामध्ये काम केलं असल्यामुळे त्यांचं म्हणण बरोबर आहे.

गुरुजींनी खरोखर अॅटॉमिक फिजिक्सची डिग्री घेतली आहे का हे नक्की माहित नाही मात्र त्यांच्या अमेरिकेच्या चंद्र मोहिमेबद्दल केलेल्या दाव्याची खात्री करण्याचा आम्ही बोल भिडूतर्फे प्रयत्न केला.

साधारण पन्नासदशकाच्या शेवटी शेवटी अमेरिका आणि सोव्हियत रशियामध्ये शीतयुद्धाने जोर पकडला होता. हे युद्ध अंतराळात ही लढले जात होते. सर्वात पहिल्यांदा चंद्रावर कोण पोहचेल याची स्पर्धा सुरु होती. दोन्ही देश यासाठी जंग जंग पछाडत होते.

चंद्राच्या दिशेने  पहिलं यान सोडलं अमेरिकेन १७ ऑगस्ट १९५८ रोजी. भारतीय कालगणनेनुसार भाद्रपद शु.तृतीया. हा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला. पाठोपाठ रशियाने सोडलेले यान देखील फेल गेले. या काळात दर महिन्यात एखादे तरी यान चंद्राच्या दिशेने या दोन्ही देशांकडून पाठवले जात होते पण चंद्राच्या कक्षेत पोहचण्याचा पहिला मान मिळवला रशियाने.

१२ सप्टेंबर १९५९ रोजी (भाद्रपद शु, दशमी) ला लॉंच झालेले लूना हे यान त्याच्या दुसऱ्याच दिवशी १३ तारखेला चंद्रावर जाऊन आदळले. इकडे अमेरिकेला मात्र काही केल्या यश मिळत नव्हतं. त्यांच्या अनेक मोहिमा समुद्रार्पण झाल्या. राजकारणाने प्रवेश केला असल्या मुळे नासाच्या वैज्ञानिकांवर सरकारचा खूप मोठा दबाव होता. 

अखेर २८ जुलै १९६४ रोजी(श्रावण कृ ४) अमेरिकेतून निघालेले नासाचे रेंजर यान तीन दिवसात चंद्राच्या कक्षेत पोहचले. अमेरिकेचे हे पहिले यशस्वी यान.

त्यांच्या सर्वेयर या यानाने पहिल्यांदा यशस्वीरित्या चंद्रावर ठरवून लँड केले. हे यान ३० मे १९६६ रोजी म्हणजे जेष्ठ शु एकादशीला निघाले होते मात्र त्या नंतर अवघ्या एका महिन्यात म्हणजे १ जुलै १९६६ ला सोडलेले एक्सप्लोरर हे यान एकादशीला गेले नाही आणि ते अयशस्वी झाले.

अशी अनेक अंतराळयाने अमेरिकेने व रशियाने चंद्राच्या दिशेने सोडली मात्र यात ठरवून एकादशीला यान पाठवले आहे असे कोठेही दिसून येत नाही.

विशेष म्हणजे चांद्रयान मोहिमेचा जगातील सर्वात महत्वाकांक्षी असलेला प्रयोग अपोलो-११ यान १६ जुलै १९६९ रोजी निघाले. तेव्हा भारतीय कालगणनेनुसार आषाढ शु. द्वितीया होती. चार दिवसांनी ते यान चंद्रावर लँड झाले आणि नील आर्मस्ट्रॉन्गने चंद्रावर पहिले पाउल ठेवले. चंद्रावर उतरणारा जगातला तो पहिला मानव ठरला. ही क्रांतिकारी घटना होती.

पण गुरुजींच्या दाव्याप्रमाणे एकादशीचा काहीही संबंध नाही.

चंद्राच्या दिशेने जाणारे यान असेल तर चांद्रकालगणना विचारात घेणे आवश्यक आहे. मात्र कोणत्याही देशाने यासाठी कोणताही दिवस विशेषतः एकादशी ठरवलेले नाही. यान चंद्रावर कोणत्या ठिकाणी उतरणार आहे, किती दिवस आहे राहणार आहे ती मोहीम कोणत्या कारणाने आहे. या सगळ्याचा विचार करून कमीत कमी वेळात पोचेल अशी तारीख पकडून चंद्र यान पाठवले जाते.

अमेरिकेची गेल्या काही वर्षात चंद्राकडे गेलेले यान आणि त्याची भारतीय कालगणनेनुसार तारीख (हे सर्व यान यशस्वीपणे चंद्रावर पोहचलेले आहेत)

TESS- १८ एप्रिल २०१८ अक्षय तृतीया

LADEE- ७ सप्टेंबर २०१३ भाद्रपद शु. २

FLOW- १० सप्टेंबर २०११ भाद्रपद शु. १३

LCROSS- १८ जून २००९ जेष्ठ कृ. १०

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. R. B. Fuge says

    भारतीय लोकशाही संघराज्य व्यवस्थेला ब्राह्मणीकरणाची कीड पुरातन काळापासून लागलेली आहेच त्यात आता वर्तमान राजकीय व्यवस्थेचे ही पद्धतशीरपणे ब्राह्मणीकरण सुरू आहे. मग काय अशा व्यवस्थेमध्ये छत्रपती शिवाजीमहाराजांच्या प्रेमाचा खोटा , बुरखा पांघरलेल्या तथाकथीत संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी नावाच्या अस्सल मनुवादी पुणेरी भामट्याच्या विचारांचा सुळसुळाट होणारच होता त्या अनुषंगाने विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही तो आपल्या अकलेचे दिवे कर्मकांडांचे महत्त्व वाढावे यासाठी पाजळीत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.