जगातली सर्वात श्रीमंत दोन माणसं मॅकडोनाल्डसमध्ये जातात तेव्हा..

खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सातासमुद्रापार एक देश होता, अमेरिका त्याच नाव. लई श्रीमंत लोकांचा तो देश. तर त्या देशात दोन माणसं होती जी जगात सगळ्यात जास्त श्रीमंत होती. एक होता म्हातारा, तर दुसरा होता तरुण. म्हातारा होता तो जगातला सर्वात मोठा स्टॉक मार्केट तज्ञ, गुंतवणूकदार तर तरुण होता तो जगातल्या सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीचा मालक.

सगळ्यात श्रीमंत माणसांच्या यादीत एक नंबर दोन नंबर स्थान यांनी कित्येक वर्षासाठी बुक करून ठेवलेलं. नाव तुम्हाला लक्षात आलं असेल,

“वॉरेन बुफे आणि बिल गेट्स”

friends 600

दोघ पण एकमेकाचे चांगले दोस्त. यात कधी वयातल अंतर, एकमेकांच्यातली स्पर्धा आडवी आली नाही. तसं बघायला गेलं तर वॉरेन बुफे या दोघांच्यातला शहाना. गेट्स पेक्षा जास्त पावसाळे बघितल्याचा परिणाम देखील असेल. वेळोवेळी धंद्यात आपण गंडालोय असं वाटलं तर गेट्स पहिला बुफेला भेटायला जातो.

एकदा काय झालं की वॉरेन बुफे आणि बिल गेट्स दोघेही कसल्या तरी कॉन्फरन्ससाठी की बिझनेस मिटिंगसाठी हॉंगकॉंगला गेले होते. योगायोगाने एकमेकांची भेट झाली. शिळोप्याच्या गप्पा झाल्या. मग बुफे गेट्सला म्हटला,

” दुपारच्या जेवनाच काय नियोजन केलायस? “

गेट्सनं नाही म्हणून मान डोलावली. चायनीज खायचा कंटाळा आला होता. मग दोघ पण लंच साठी बाहेर आले. बिल गेट्सच्या डोक्यात काय खायचं काय खायचं प्रश्न पडला होता. वॉरेन बुफे ड्रायव्हरला म्हणाला मॅकडोनाल्डस मध्ये चल. घरची आठवण दुसर काय?

ही जोडगोळी मॅकडी मध्ये पोहचली. तिथ काय लई जण कोण त्यांना ओळखणारे नव्हते. दोघ ऑर्डर द्यायला ओळीत उभे राहिले. नंबर आल्यावर बर्गर, सॉफ्टड्रिंक कॉम्बो असलेल्या मीलची वगैरे ऑर्डर दिली. भारतात तेव्हा २३ रुपयात आलू टिक्की बर्गर मिळायचा. भारतीय भाषेत म्हटल तर लईत लई २००-३०० रुपयेच्या वर बिल गेलं म्हणजे काटा तुटला. 

मनात आणलं तर पुढच्या सेकंदात अख्खं मॅकडोनाल्डस कंपनी खिशात टाकतील, एवढचं काय जरा पैशाची जुळवाजुळव करून अख्खा हॉंगकॉंग देश विकत घेतील अशी ही जगातला सर्वात श्रीमंत एक नंबर आणि दोन नंबरवाली माणसं बिल कोण देणारं? वरन भांडण करु झाली. बिल गेट्सचा हात खिशा कडे जायला लागला. शेवटी बुफेनं फायनल दम टाकला,

“लई मोठा झालास व्ह्य लेका. ग्ब्ब्स, बिल मी देणारं”

गेट्स बिचारं आकसून माग सरल.  वॉरेन बुफेने डोळ्यावर चष्मा चढवला. सावकाश सगळ बिल परत एकदा नीट चेक केलं. मागची सगळी लोक खोळंबली होती. म्हातारा खिशातन मोठमोठ्या नोटा काढणार किंवा क्रेडीट कार्ड देणारं, आपल्याला जगातल्या सगळ्यात श्रीमंत माणसाचा क्रेडीट कार्ड बघायला मिळणार म्हणून काउंटर वरचा लाल टोपी घातलेला गडी खुश झाला.

अखेर वॉरेन बुफेचं सगळ कॅलक्युलेशन झालं. बिल बरोबर आहे म्हटल्यावर त्यान खिशात हात घातला आणि खिशातन मकडोनाल्डसचे फ्री कुपन बाहेर काढले आणि काउंटरवाल्याला दिली. बिल घेणारा चक्कर येऊन पडलं असेल. बुफे मामा गेट्सला म्हटल,

“महागाई लई वाढल्या राव.”

वॉरेन बुफेच्या चेंगटपणाचे किस्से मध्ये ही गोष्ट अजरामर होऊन गेली. २०१७साली मेलिंडा गेट्स फौंडेशनच्या वतीन वॉरेन बुफेला त्यांनी केलेल्या मदतीबद्दल धन्यवाद द्यायला बिल गेट्सने जे पत्र लिहिले होते त्यात या गंमतीदार प्रसंगाचा उल्लेख केला होता.

बुफे मामा सध्या वय ८८, आजपण ओमाहा इथल्या एका छोट्या अपार्टमेंटमध्ये राहतात. गेली कित्येक वर्ष त्यांचा दिनक्रम ठरलेला आहे. रोज सकाळी उठणे आवरणे, शेव्हिंग करणे. हे सगळ चालल असताना बुफे मामी त्यांचे कपडे तेन काढून ठेवतात आणि विचारतात,

” आज किती “

दाढी करत करत मामा विचार करतात आणि ३.१७, २.९५, २.६१ या पैकी एक आकडा सांगतात. आता ह्यो काही शेअर मार्केटमधला काही सिक्रेट आकडा नाही. हा आकडा आहे मॅकडीमधल्या मिलचा. मामा ऑफिसला डब्बा नेत नाहीत. दुपारी शेजारच्या मॅकडोनाल्डस मध्ये जातात आणि बर्गर हाणून येतात आणि त्यासाठी रोज त्यांची बायको पैसे आधीच कोटच्या खिशात घालून ठेवते. शेअरमार्केट तेजीत असेल तर ३.१७$ नसेल तर २.६१$चं मील असं मामांच जेवनाच गणित असत.

5548e72369bedd9b2df3a0b1 750 562

असे हे आमचे चेंगट बुफे मामा आणि असं त्यांच मॅकडी प्रेम !!  

त्यांच हे प्रेम बघून म्हणे मॅकडीवाल्यांनी त्यांना गोल्ड कार्ड की काय म्हणतात ते दिलंय. त्याचा वापर करून त्यांना जगातल्या कुठल्याही मॅकडोनाल्डसमध्ये फ्री मध्ये हवं ते खायला येत. हेच ते कार्डवालं कुपन मामानी बिल गेट्सला बर्गर खाऊ घालताना बाहेर काढलेलं असं काही जेष्ठ पत्रकारांचं म्हणण आहे.

हे ही वाचा भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.