ब्रेकअप के बाद, गच्ची… एक काळ गाजवलेल्या SAY बॅंडची गोष्ट…

आज मला तीला पाहवेसे वाटते….काय आठवलं का काही? SAY बॅन्ड. मुंबईच्या रुईया कॉलेजच्या कट्ट्यावरून, कट्ट्या कट्ट्यावर पोचलेला से बॅन्ड. या से बँडच्या गाण्यांचं वेड, त्या जमान्यात लागलेलं जेव्हा आपल्या विषयाला मिळवण्याइतकंच या से बँडची गाणी मिळवणं पण कठीण असायचं.

ह्याचं ब्ल्युटुथ त्याचं ब्ल्युटुथ ऑन करा, डोक्याला शॉट लागेपर्यंत डिव्हाइसेस पेअर करा, गाणं सेंड होताना दिसायचं तरी जीवात जीव नसायचा. रिसिव्हड सक्सेसफुली असा मेसेज दिसला की हुश्श वाटायचं आणि कधी एकदा हेडफोन लाऊन गाण्यावर ट्रीपा घेतोय असं व्हायचं. वर्णन करून झालं, इमोशनल होऊन झालं, तर आता मुद्द्याला येऊ. या से बॅन्डची सुरवात कुठून झाली, कशी झाली, आता ही मंडळी कुठेयत, काय करतायत हे बघू.

समीर साप्तीसकर, अभिषेक खाणकर आणि सचिन पाठक या तिघांनी मिळून २००८ साली हा बॅन्ड काढला आणि तरुणाईच्या काळजाला हात घातला.

यातल्या समीरला म्युझिक डीरेक्शनचा नाद होता. त्यावेळी म्हणजे २००८ सालात त्याची संगीत क्षेत्रातच छोटी मोठी कामं चालायची. तो थिएटरही करायचा. दरम्यांन त्याला वन ऍक्ट प्लेसाठीचं काम मिळालं, समीरचा एक मित्र होता ज्याचा शिवाजी पार्कात स्टुडिओ होता.

समीर तेव्हा मित्राची परमिशन घेऊन या स्टुडिओत किंवा रुईया कॉलेजात पडीक असायचा आणि या स्टुडिओतच त्याची भेट झाली अभिषेक खाणकरशी.

आताच्या काळात सांगायचं तर या दोघांचं फूल वाईंबिंग झालं. अभिषेक खाणकर रुईयाचाच स्टुडेंट. रुईयामध्ये तेव्हा अनन्या ही एकांकिका सुरू होती. एकदम हौसेत या दोघांनी आम्ही या एकांकिकेचं म्युझिक करू का असा प्रश्न विचारला, आणि लगेचच त्यांना संधीही मिळाली. दोघांच्या एकत्रित कामाला सुरवात झाली आणि अशाच अजून एका रॅनडम रीहर्सलमध्ये त्यांना सचिन पाठक भेटला. सचिनला सगळे यो म्हणायचे. हा सचिन सुद्धा रुईयाचाच. त्यामुळे रिहर्सलमध्ये प्रोफेशनल गोष्टी कमी आणि कल्लाच जास्त व्हायचा.

या कल्यात कॉलेजची दुनिया ज्या गोष्टीभोवती फिरते आणि जिथे येऊन थांबते त्या ब्रेकअपवर गाणं करायचं या तीन कार्यकर्त्यांचं ठरलं. कोरस ठरलेला होता, पण गाणं शब्दांत आणि चालीत बांधायचं होतं. 

नुकतच मिसरूड फुटलेल्या एका पोराच्या आयुष्यात ब्रेकअप झाल्यामुळे उगीच दु:ख वैगरे आलंय असा साधारण गाण्याचा आशय होता.. हां.. आता या गाण्यात दु:ख कमी आणि सॅरकॅझमच जास्त होता हे आपल्याला दुसऱ्यांदा प्रेमात पडल्यावर कळलं ती वेगळी गोष्ट.

एक माइक आणि एक गिटार घेऊन गाणं रेकॉर्ड झालं. या तिघांपैकी कोणालाच या गाण्याचं आपण पुढे काय करणार आहोत, आपण हे गाणं कुठ टाकणार आहोत. काही काही ठाऊक नव्हतं आणि एक दिवस त्यांनी, त्यांच्या त्यांच्या आनंदापुरतं बनवलेलं हे गाणं एक कल्ट क्लासिक बनलं.

गाणं बनवल्यावर कोणीतरी ते चोरेल या भीतीपोटी या कार्यकर्त्यांनी एक टॅग ठरवला. समीरचा S अभिषेकचा A आणि सचिनला यो म्हणायचे म्हणून त्याचा Y असा मिळून से बॅन्ड जन्माला आला.

गाणं बनलं तसं पोरांनी आपल्या कॉलेजच्या मित्र मैत्रिणींना जाऊन हे गाणं ऐकवलं. आता एरवी मापं काढणारे मित्र आश्चर्याने, मन लाऊन गाणं ऐकायला लागले, एकाने तर ब्ल्युटुथ ने गाणं स्वताच्या फोनवर घ्यायचे कष्ट घेतले म्हणल्यावर या तिघांना लक्षात आलं, गाने मे दम है बॉस.. 

गाणं होतं, अर्थातच ब्रेक अप के बाद…

नंतर साधारण तीन एक महिन्यांनंतर गाणं गाजायला लागलं, जिथे तिथे वाजायला लागलं. गाण्याला अफाट प्रसिद्धी मिळाली. लोकांच्यात या गाण्याची क्रेझ तर इतकी वाढली की एकाने फेसबूकवर ब्रेक अप के बाद नावाचं पेज काढलं. 

बऱ्यापैकी फोलोवर्स मिळाल्यावर त्याने हे पेज या तिघांना भेट म्हणून दिलं, हँड ओव्हर केलं आणि आजही या पेजला ३० हजार फॉलोवर्स आहेत..

ब्रेक अप के बाद तर हिट ठरलच पण सोबतच या अल्बममध्ये रोमिओ जुलेट गाणं होतं, समस्त जेवलीस का परिवाराला रीलेट होईल असं भाव दे गाणं होतं, बिड्या ओढत लिहिलेलं अँटीस्मोकिंग गाणं होतं. आणि ही सगळी गाणी एका आठवड्यात बनली.

त्यातल्या ब्रेकअप के बादचा तर व्हिडीओसुद्धा बनला आणि हा मराठीतला पहिला म्यूजिकल विडियो होता ज्याला यू ट्यूबवर सगळ्यात जास्त व्ह्यू मिळाले. 

अनिकेत विश्वासराव आणि पल्लवी पाटील या कलाकारांनी या म्यूझिकल व्हिडिओत काम केलं. तुम्ही आजही या व्हिडीओवरच्या कमेंट्स बघा. लोकं आजही व्हीडियोवर येऊन आपण कसे आजही हे गाणं ऐकून नॉस्टॅल्जीक होतोय अशा कॉमेंट्स पोस्ट करतात.

या अल्बमच्या यशानंतर त्यांनी पुन्हा एक गाणं केलं, गच्ची.. गच्ची हे गाणं आलं तेव्हा आपण पहिल्यांदा Cozy शब्दाचा अर्थ डिक्शनरीत शोधला. गालात हसायचेच ते दिवस होते. पण मेसेज आणि फोनवर बोलून नाही तर से बॅन्डची गाणी ऐकूनच त्या काळात जास्त गुदगुल्या झाल्यायत.

ब्रेक अप के बादच्या यशानंतर या पोरांनी काय केलं? 

तर संजय जाधव यांच्या दुनियादारी पिक्चर मधलं जिंदगी हे गाणं केलं. म्हणजे सुट्टीच नाय आणि नंतरही हे तिघं एकत्र काम करत राहिले पण SAY Band च्या नावाखाली नाही तर वैयक्तीक… SAY Band ला त्यांनी कल्ट क्लासिकच राहू दिलं.

आज हे तिघंही आपापल्या क्षेत्रात लय मोठे झालेत. समीर पिक्चर्सची गाणी करतो, सिरियल्सची टाइटल सॉंग्स संगीतबद्ध करतो, गाण्याचं अरेंजिंग आणि मास्टरींग करतो. 

अभिषेक लिखाणाच्या क्षेत्रात काम करतो, टाइटल्स गाणं लिहितो तर सचिन आता डिरेक्शन मध्ये घुसलाय. या पोरांनी ब्ल्युटुथचा जमाना गाजवला आणि आपल्याला प्रेमाचा नाद लावला.

झाली आता त्या काळात या गाण्यावर ट्रीप करणाऱ्या लोकांची लग्न झाली त्यांना पोरं झाली, संसार घडले काही बिघडले पण तेव्हाची अख्खी पिढी आजही ब्रेक अप के बाद असं कोणी म्हणलं, कुठे वाजताना ऐकलं तरी आपल्या पहिल्या प्रेमालाच आठवते.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.