मायावतींनी ठरवलंय ‘बाहुबली’ नेत्यांना येत्या विधानसभा निवडणुकीची तिकिटे देणार नाही…

बहुजन समाज पक्ष बसपाने आगामी विधानसभा निवडणुकीत बाहुबली नेत्यांना तिकीट देणार नसल्याचे जाहीर केले आहे.

म्हणजेच गुन्हेगारांना आणि माफियाशी संबंधित लोकांना विधानसभा निवडणुकीची तिकिटे देणार नाही असं मायावती यांनी जाहीर करत त्यांनी मऊ मतदारसंघातून बाहुबली आमदार मुख्तार अन्सारी यांना तिकीट न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या जागी पक्षाध्यक्ष भीम राजभर निवडणूक लढवणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

मायावतींनी मुख्तार अन्सारी यांच्या जागी भीम राजभर यांना मऊ विधानसभा मतदारसंघाचे नवे उमेदवार म्हणून नियुक्त केले आहे. त्यांच्या ट्विटमध्ये मायावती म्हणाल्या,

बसपामध्ये गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या किंवा माफियांशी संबंध असलेल्या कोणालाही आगामी विधानसभा निवडणुकीत तिकीट दिलं जाणार नाही.

बसपाचा सद्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला कि, ‘कायद्याने कायद्याचे राज्य’ बरोबरच यूपीची प्रतिमा आता बदलायचे आहे. जेणेकरून केवळ राज्य आणि देशच नाही तर प्रत्येक मुल म्हणेल की जर सरकार असेल तर बेहेनजीचं असावं, ‘सर्वजन हिताय आणि सर्वजन सुखाय’ आणि बसपा जे बोलते ते करून दाखवते, हीच सुद्धा पक्षाची खरी ओळख असणार हाच संकल्प असणार आहे. त्यामुळे आता युपी मधले बाहुबली राज्य आता आम्ही संपवणार आहोत.

मायावतींच्या या घोषणेमुळे उत्तर प्रदेशमधील बाहुबली राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

युपीमधील बाहुबली राजकारण म्हणजे काय ?

आपल्या देशाच्या राजकारणात, गुन्हेगारी जग फार मोठा प्रभाव टाकते. देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशची परिस्थितीही अशीच आहे. युपीच्या निवडणुका जवळ येतात तसं राजकारण आणि गुन्हेगारी दुनिया चर्चेत येत असते हे संपूर्ण देशालाच माहिती आहे. खास युपीच बोलायला गेलं तर युपीच्या गुन्हेगारी जगतातून कितीतरी नेते उदयास आले आहेत. गुन्हेगारांनी राजकारणावर प्रभाव पडला गेला असा एकमेव किल्ला म्हणजे युपीला मानलं जातं.

असे अनेक नेते आहेत जे गुन्हेगारीच्या जगाचे राजे आहेत, प्रथम गुन्हेगारीच्या जगात स्वत: चे नाव कमावले आणि आता नेता बनून राजकारण करत आहेत.
अपहरण, खून ते दरोडा, बलात्कार असे गुन्हे केलेल्या गुन्हेगारांनी आता राज्याच्या राजकारणावर आपला ठसा उमटवत आहेत. युपी मध्ये असेच काही नेते आहेत जे गुन्हेगारीचे जग सोडू शकले नाहीत, पण त्यापलीकडे जाऊन त्यांनी राजकारणाच्या जगात प्रवेश केला आहे.

मुख्तार अन्सारी यांना देखील बाहुबली म्हणलं जातं.

मुख्तार अन्सारी नाव ओळखत नाही असं शक्य नाही. माफिया-डॉन असण्याव्यतिरिक्त, ते उत्तर प्रदेशचे एक मोठे राजकारणी नेते देखील आहेत. त्यांना राज्याचे बाहुबली नेते म्हटले जाते. वर्चस्वाच्या आणि पॉवर पॉलीटिक्सच्या बाबतीत त्यांना कुनही स्पर्धा करू शकत नाही.

पण मायावतींनी त्यांचे यावेळेस तिकीट कापले आहे.

त्यांनी मऊ विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा आमदारकीची निवडणूक जिंकली आहे. २०१० मध्ये, बहुजन समाज पक्षाने त्यांना गुन्हेगारी कारवायांमुळे पक्षातून काढून टाकले होते, परंतु पुन्हा त्यांना पक्षात घेण्यात आले होते.  कृष्णमंद राय यांच्या हत्येचाही त्यांच्यावर आरोप होता, परंतु पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

मुख्तार अन्सारी यांनी त्यांच्या पैसा, पॉवर आणि दहशतीच्या जोरावर  ठेकेदारी, खाणकाम रेल्वे कंत्राट यासारख्या क्षेत्रात आपली मजबूत पकड ठेवली आहे.

यूपीचे असे बरेच बाहुबली नेते आहेत ज्यांचे नाणे आजही राजकारणात खणखणीत आहे, पण आत्ता मायावतींच्या या नव्या भूमिकेमुळे असं प्रतीत होत आहे कि, युपीच्या राजकारणातलं बाहुबली नेत्यांचं राजकारण आणि दहशत आता संपुष्टात येत आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.