अवघ्या १८ तासात २५ किलोमीटर महामार्ग बांधणारे संजय कदम..
सोलापूर-विजापूर महामार्गावर एका लेनवर सलग १८ तासात २५ किलोमीटरचा रस्ता डांबरीकरण करण्यात आला. आयजीएम इंडिया टिम युनिव्हर्सल कडून हा विक्रम घडवण्यात आला असून त्याची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.
रस्ते व वहातुक मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात रस्ते महामार्गाचं काम चालू असून हा विक्रम झाला आहे त्याचे प्रकल्प संचालक आहेत,
संजय कदम…
संजय कदम हे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक आहे. आज त्यांच देशभरातून कौतुक होत आहे. अशा या आपल्या मातीतील माणसाबद्दल विनायक कदम या त्यांच्या चुलत भावानेच लिहलेला लेख खाली देत आहोत.
एका दिवसात देशभरातच नव्हे तर परदेशात पोहोचलेला माणूस. पण या ऐतिहासिक दिवसासाठी त्यो लय रात्री जागलाय. संजय सांगली जिल्यातला तासगाव तालुक्यातल्या लोढे गावचा पोरगा. म्हसरांच्या दुधावर शाळा शिकल्याला.
१९७२ चा दुष्काळ पडला आणि शांताबाई आणि शिवाजीच्या पोटी संजय जलमला. कोण लय खायाला लागला तर माणसं म्हणत्यात आर काय दुष्काळात जलमलायस काय.? दुष्काळात जनावरासनी उसाच पाल घालून माणसं जगवायची तीत हेज पोटाची गत काय ईगळी न्हवती. तीन येकर शिती. आय आणि आण्णा दुष्काळी कामाव. सातू खायाला लागायचं. गावात देवळापशी आज्जी आज्जा आणि मळ्यात उसाच्या पाल्याच छपार. गावात शेजारला ठोंबऱ्याचा वाडा. सुनिल ठोंबरे गड्याचा बालपणाचा दोस्त.
गावातच शाळा सुरू झाली.
बाळाचं पाय पाळण्यात दिसत्यात गावाकडं म्हण हाय. पण ही बाळ लैच सरळमार्गी हुतं. पुस्तकासनी दोस्त केल्याल, पेपर घावलातर वाचून फडशा पाडणार, दुकांदारान घरातल्या सामानाची पुडी बांधून दिल्याली कागद बी त्यो वाचत त्यातली आक्षर टिपायचा. गावात शाळा बरी चाललीवती. दुष्काळ संपून पाऊसपाणी झाला रानात पीक आली. उसाची लागण किली. बा न दोन तीन म्हशी आणल्या. दोन बैल हुती. दूध दुपत सुरू झालं.
चवती झाल्याव संजू आता लोढ्यातन तासगावला चुलता तानाजी कदम कड राह्यला आला. भारतीला शाळत घाटला. शाळा सुरू हुती. संजू ला इजवल आणि अजित बारक भाव. घरात खाणारी तोंड वाढली. काय टायमाव मिळायचं न्हाय नुसती बोंबाबोंब. आठवीत गड्यांन स्कॉलरशिपला जिल्हास्तराव नंबर मारला.
आकरावी, बारावी तासगावलाच झाली. फूड काय..?
बुधगावला वसंतदादा कॉलेजला प्रवेश मिळला. रानात ऊस हुता. त्यामुळं वसंतदादा कारखान्याच शेअर्स. शिक्षणाच्या फी माफीसाठी तेजा उपेग व्हायचा. त्यो बुधगावला गेला आणि खर्च वाढला तशी तेजी बी आणि घराची फेसाटी सुरू झाली. चार दोस्तांसंग वसतिगृहात त्यो कायम मुक्कामी. घरात आय ची मरणाची तारांबळ सुरू झाली.
डुरली चा योक माणूस बुधगाव कॉलेजला आसल्याल्या तालुक्यातल्या पोरांचं जेवणाच डब पोच करायला आसायचा. सकाळी सहा वाजता त्यो पाव वाल्यागत हॉर्न वाजवायचा. जेवाण तयार करून बांधून घरापासन स्टॅण्डवर पोचवोस्तर बोंबाबोंब.
एक दोन दिवस न्हाय तर बुधगाव कॉलेजची चार वर्षे… उन्हाळा, पावसाळा, हिवाळा त्या डबवाल्या बाबाच ६ च टायमिंग कवा चुकलं न्हाय.
उन्हाळच सुट्टीला गावाकडं आलं की गडी इतर पोरांसारखं उंडरत फिरायचं न्हाय. ती पुस्तक आणि त्यातल्या शब्दांवरच तेज प्रेम जडल्याल आसायचं. छपरात चार पदरी वाकळ उस दयाय मेड बगून टाकायची. पसा दोन पसा शेंगा आणि याक पुस्तक. येक येक शेंग फुडुन तोंडात टाकत आब्यास चालू. तवा बुध्याच्या हिरीसन प्याला पाणी आणाय लागायचं.
ह्यो आयसंग सायकलींन पाणी आणाय गेला. सायकलीला दोन कळशा बांधून पाणी आणलं. त्येज्या कळशीतलं पाणी आयन जरा जास्त वतल म्हणून गडी रुसला. माज पाणी लय वतलस मी आता मरतो म्हणून जळान फोडायची कुराड उराव घिऊन दिवसभर झोपला. लय शिस्तीचा गडी. फावल्या येळात कदमांच्यातल्या माणसांची तर तरची टोपण नाव तेंन पाडल्यात. दंगा केल्याल तेला खपायच न्हाय.
बा, न आता दूध घ्याला चालू करत खव्याची भट्टी टाकली. छपरात कडयत वापा निगुसतर दूध शिजून खवा व्हायचा. त्यो खवा ईटा आणि आवदुंबरला जायाचा.
बुधगाव कॉलेजला इंजिनियरिंगच शिक्षण सुरू असताना रेल्वेच्या इतिहासातील कठीण आशा कोकण रेल्वेमार्गाचं काम सुरू हुतं. तिथं तेंचा दौरा झाला. बुधगाव नंतर पुण्याला आणि फुढ सोलापूरला चुलते संभाजी कदम हेंच्या मार्गदर्शनाखाली नुकरीसाठी प्रयत्न सुरू झालं. १९९५ ला अक्कलकोटला पी डब्लू डी ला नुकरी लागली ती गड्यांन माग बगीटलं न्हाय. जाईल तिथं शंभर टक्के देत त्यानं कामाची छाप पाडली.
राष्ट्रीय विकास प्राधिकारणाचा प्रकल्प संचालक म्हणून गुरुवारी त्येज्या नेतृत्वाखाली टीमनं सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्गावर १८तासात २५.५४किलोमीटर रस्ता बांधून जागतिक विक्रम केला. लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मधे त्याची आता नोंद हुईल. सकाळी सहा वाजता सुरू झाल्याल काम रात्री बारा पर्यंत सुरू हुतं. हायवेला येका म्हयण्यात ५ किलोमीटर करायचं टार्गेट आसतंय पण कोरोना मूळ वर्ष वाया गेलं.
केंद्रीय नितीन गडकरींनी सांगितलं संजय मला कामाची गती पायजे. पण गती वाढवताना तेजा दर्जा पायजे. गडी टीमचं नियोजन लावून झपाटून कामाला लागला.
आय जे एम कंपनी ची ५०० माणसं, २५ अभियंते, यांनी गुरुवारी सकाळी ६ वाजता सुरवात झाली. माणसांसंग सोबतीला ५ पेव्हर मशीन, २० रोलर,१० लायटिंग जंगसेट,५ विटमनी ब्राऊसर,१०० डंपर, आणि १५ हजार टन डांबर मिश्रीत खडी.
बाळे ते हतूर, हतूर ते नांदणी, नांदणी ते होर्ती, होर्ती ते तिडगुंदी, तिडगुंदी ते विजापूर अशा पाच ठिकाणी एका वेळेस काम सुरू हुतं. कामाच्या झपाट्यान गड्यांन घरच्यांचं पण फोन उचललं न्हायत.
गेली दोन तीन दिवस फोन करणारी माणस म्हणत्यात आर ह्यो फोन का उचलत न्हाय. त्यो का फोन उचलत न्हवता आख्या देशाला शुक्रवारी कळाल. कोरोनामुळ रेंगाळलेला सोलापूर विजापूर ११० किलोमीटरचा प्रोजेक्ट येत्या सहा सात महिन्यात पूर्ण होऊन नवं किर्तीमान रचलं आस तेंनी सांगितलं.
विजापूर गुहागर महामार्गाच्या कडेच तोडलं जाणार ४५० वर्षांपूर्वीच झाड आख्या देशात चर्चेला आलं. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महाराष्ट्रातील पर्यावरण प्रेमी, सर्वपक्षीय आमदार ,खासदार यांनी मंत्री गडकरींना झाड वाचवा म्हणून साकडं घातलं. महाराष्ट्रासह देशात विषय चर्चेला आला.
गडकरींनी संजय ला विषय संपवाय सांगितलं. पाटच सोलापुरातन निगून सकाळी सात वाजता मिरज तालुक्यातल्या भोसेत येत गावकरी व संबंधितांची भेट घेतली. तेंच्या शंकांचं निरसन करून तिथूनच थेट मंत्री गडकरींना फोन करून विषय संपल्याच सांगितलं.
हायवे वाली नुसती झाड तोडत्यात लावत न्हायत आसा माझा गैरसमज हुता. पण सोलापुरात रस्त्यासाठी तोडल्याली ३ हजार झाड उपडून दुसरीकडीक लावली आणि त्यातली आज६० % जिवंत हायत तेंन दाकवल.
राष्ट्रीय महामार्गाचा प्रकल्प संचालक म्हणून मंत्री गडकरी नंतरच थेट अधिकार गड्याला..
पण अधिकाराच्या बळाव तेंन कुणाला चिरडल न्हाय. कुणीही आसला तर तेज पयला ऐकून घेणार. प्रचंड नम्रता आणि सहनशीलता. परिस्थितीची जाणीव तेला हाय. मी कोणतर येगळा हाय आस कदी दावायचा प्रयत्न तेंन केला न्हाय.
मीपणा हा शब्द त्येज्या शब्दकोशात न्हाय. १९९८ ला संसार सुरू झाला. गाडीच दुसरं चाक बी सोनाली वयनी इंजिनियर हाय. दोगं मिळून आता स्वकर्तुत्वान संसाराची बैलगाडी पळवत्यात. पण पळवताना पाय मातीत हायत. कधी कधी वाटत पोरांनी इतिहासातील माणसं चाळण्यापेक्षा वर्तमानात इतिहास निर्माण करणारी ही जिवंत माणसं वाचावीत.
रस्त्यांना देशाच्या विकासाचा महामार्ग म्हणत्यात पण हितं…. संजयची जिंदगीच आता…
महामार्ग झालीय…….
विनायक कदम : 9665656723
हे ही वाच भिडू
- लालबहादूर शास्त्रींनी नियमात बदल केले आणि कोकणातले रस्ते काँक्रीटचे झाले
- मुख्यमंत्री नाही म्हणत होते पण तरी अधिकाऱ्यांनी जिद्दीने एशियाड बस महाराष्ट्रात आणलीच !
- जळगावची केळी खरेदी करण्यासाठी रशियात पहाटे ५ वाजल्यापासून रांगा लागल्या होत्या.