मुख्यमंत्री नाही म्हणत होते पण तरी अधिकाऱ्यांनी जिद्दीने एशियाड बस महाराष्ट्रात आणलीच !

गेल्या वर्षी कोरोनामुळे सगळं जग एका जागी थांबलं होतं. सरकारने लॉकडाऊन हळूहळू उठवला आणि एक दिवस लाल परी एसटी स्टॅन्ड वर अवतरली. या लाल परीला बघून महाराष्ट्राच्या जनतेच्या जीवात जीव आला.

हि लाल परी म्हणजे अख्ख्या राज्याची रक्तवाहिनी असलेली आपण सर्वांची लाडकी एसटी.

१९४८ साली तेव्हाचे मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाई यांनी हिला हिरवा झेंडा दाखवला. नगर पुणे दरम्यानचंदेरी छताची निळी पहिली एसटी धावली. ३० लाकडी बेडफोर्ड बसगाड्या घेऊन महामंडळाचा प्रवास सुरु झाला. त्याकाळी बसची बॉडी लाकडी असायची. नगर पुणे पहिलं तिकीट फक्त ९ पैसे इतकं होतं.

पुढे मॉरिस कमर्शियल या कंपनीच्या गाड्या आल्या. कालौघात लाकडी बॉडीच्या जागी अल्युमिनियम बॉडी झाली. सीटला कुशन आले. नीलकमल, गिर्यारोहणी, रात्रीचा प्रवास करणारी रातराणी अशा गाड्या त्याकाळी होत्या.

पुढे निळी एसटी लाल बनली आणि तीच नाव लालपरी असं पडलं.

महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर राज्यकर्त्यांनी गाव तिथे एसटी पोहचवायचं धोरण राबवलं. खेडोपाडी वाडीवस्तींवर एसटी धावू लागली. बाजारात माल विकायला निघालेल्या शेतकऱ्याची, तालुक्याच्या गावी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, आजारी माणसाच्या दवाखान्याची सोय झाली.

एखाद्या देवदूता प्रमाणे लालपरीच महत्व महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेच्या आयुष्यात निर्माण झालं. मात्र अजूनही नोकरी व्यवसायामुळे स्थिरावलेल्या नव्या उच्च मध्यमवर्गाच्या अपेक्षा पूर्ण करतील अशा चकचकीत आधुनिक बस महामंडळाच्या ताफ्यात नव्हत्या.

गोष्ट आहे १९८२ सालची. भारताला एशियन गेम्सचं यजमानपद मिळालं होतं. संपूर्ण देशासाठी हि अभिमानास्पद गोष्ट होती. इंदिरा गांधींनी नवी दिल्ली येथे जय्यत तयारी केली. 

या पूर्वी १९५१ साली भारतात पहिल्यांदा एशियाड गेम्स झाल्या होत्या. त्यावेळी भारताकडे मोठे पैशांचे पाठबळ नव्हते. स्टेडियम देखील क्रिकेटचे पैसे वापरून बांधण्यात आले होते. लोकांना गेम्स बघता यावे म्हणून रेल्वेचं तिकीट निम्म्यावर आणण्यात आलं होतं. भारतातील हा पहिलाच स्पोर्ट इव्हेन्ट ठीकठाक झाला.

मात्र ८२चे एशियाड गेम्स म्हणजे भारताला आपण गरीब देश उरलो नाही हे सिद्ध करायचं होतं. नुकताच आणिबाणीनंतरच्या पराभवातून सावरून कमबॅक केलेल्या इंदिराजींना आपली लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही हे या निमित्ताने दाखवून द्यायचं होतं.

एशियन गेम्स आयोजित करण्याची जबाबदारी देण्यात आली होती राजीव गांधी यांना.

संजय गांधी यांच्या मृत्यू नंतर अनपेक्षितपणे राजकारणात आलेले राजीव गांधी यांचा हा पहिलाच मोठ्या कार्यक्रमातील सहभाग होता. परदेशात शिकून आलेल्या राजीव गांधींना आपला छाप सोडण्याची हि संधी होती आणि त्यांनी याचा पुरेपूर फायदा उठवला. 

झाडून सगळे अधिकारी कामाला लागले. क्रीडामंत्री बुटासिंग, दिल्लीचे गव्हर्नर जगमोहन यांच्या मदतीने राजीव गांधींनी दिल्लीचे रूप पालटून टाकले. नवी क्रीडानगरी उभारण्यात आली, विविध स्टेडियम उभे केले. रस्ते मोठे करण्यात आले, फ्लायओव्हर्स उभे राहिले. दिल्लीत तब्बल १२०० नवीन टेलिफोन लाईन्स बनवण्यात आली. संपूर्ण भारतात रंगीत टीव्हीचा प्रवेश याच कार्यक्रमाच्या निमित्ताने झाला.

देशोदेशीचे जवळपास ४५०० खेळाडू या स्पर्धांमध्ये सहभागी होणार होते. या खेळाडूंना दिल्लीच्या  निवासस्थानातून  क्रीडानगरीत पोहचवण्यासाठी अद्यावत बसेसची आवश्यकता होती. या बसेस बांधण्यात आल्या महाराष्ट्राच्या दापोडी आणि औरंगाबाद आगारा मध्ये.

 १९ नोव्हेम्बर १९८२ रोजी एशियाड गेम्सचं उदघाटन झालं आणि ४ डिसेंबर रोजी सांगता. संपूर्ण जगभरात भारताने आयोजित केलेल्या या गेम्सचं तिथल्या सोईसुविधांचे कौतुक झाले.

या गेम्स संपल्यावर खेळाडूंची ने आण करण्यासाठी वापरलेल्या बसेसचं काय करायचं हा प्रश्न उभा राहिला. फक्त दिल्लीला एवढ्या बसेस लागणार नव्हत्या.

महाराष्ट्राच्या आगारात या बस बनवल्या गेल्या होत्या त्यामुळे सर्वप्रथम महाराष्ट्राला याबद्दल विचारणा करण्यात आली. या बसेस महाग होत्या, त्यांचा मेंटेनन्स चा खर्च सुद्धा भरपूर होता. आपल्याला तो परवडेल का हि शंका होती. शिवाय या निम आरामी बसेस मधून भलं मोठं तिकीटकाढू शकतील असे प्रवासी कुठून आणायचे हा देखील प्रश्न होता. महाराष्ट्रात याबद्दल चर्चा सुरु झाली.

तेव्हाचे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले हे देखील या बसेस घेण्यासाठी उत्सुक नव्हते.

आंध्र प्रदेश सरकारची नजर या बसवर होतीच. जर महाराष्ट्र सरकार नाकारणार असेल तर त्या बस पण आम्हालाच द्या असा पाठपुरावा त्यांनी दिल्ली दरबारात सुरु केला होता.

आपण बांधलेले इतक्या चांगल्या दर्जाचे बस परत करावे लागणे हे एसटी महामंडळाच्या जीवावर आले होते. अखेरीस एक अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले. त्यांनी या बसची आपल्याला आवश्यकता आहे हे त्यांना समजावून सांगीतले. पण चर्चा एकाच मुद्यावर अडकत होती .या खरेदीसाठी पैसे आणावे कसे ?

दूरदृष्टी असलेल्या त्या अधिकार्‍यांनी सरकारला एक योजना सांगीतली आणि पैशाची परतफेड एका वर्षात होईल खात्री दिली.

या योजनेनुसार येणार्‍या सर्व नविन बसेस फक्त पुणे -मुंबई -पुणे अशा डेडीकेटेड बस म्हणून धावतील असा निर्णय घेण्यात आला.

अखेर मुख्यमंत्र्यानी या बसेस विकत घेण्यास परवानगी दिली. एशियन गेम्सची आठवण म्हणून या बसेसना एशियाड हे नाव देण्यात आले.

दादरच्या कोहिनुर मिलजवळ  एशियाड हे बसस्थानक १४ एप्रिल, १९८३ साली अस्तित्वात आले. 

मुंबई पुण्याच्या नोकरदार वर्गाला डेक्कन क्वीनच्या पाठोपाठ हा नवा खात्रीशीर पर्याय उपलब्ध झाला. थोडेसे महाग तिकीट असले तरी या पांढऱ्या हिरव्या एशियाडनेच प्रवास करणारे प्रवासी बहुसंख्य होते. मुंबई-पुणे प्रवास सुखकर व सुरक्षित झाला. पुढे पुढे महाराष्ट्राच्या इतर मार्गावर देखील या एशियाड बसेस धावू लागल्या.

या बसचे नवे नामकरण हिरकणी असे झाले. लाल डबा म्हणून हिणवलेल्या एसटीचा हिरकणी अभिमान बनली.

गेल्या काही वर्षात महाराष्ट्र परिवहन महामंडळ अत्याधुनिक झाले आहे. शिवनेरी, शिवशाही या नव्या लक्झरी बसेस ताफ्यात जमा झाल्या आहेत.परवा परवा पर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसणाऱ्या एशियाड हिरकणीची जागा आता या बसेस घेत आहेत. पण हिरकणीमध्ये असलेली सुरक्षिततेची ऊब, त्यात असलेली आपलेपणाची माया या लक्झरी बसेस मध्ये सापडत नाही हे नक्की.

हे हि वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.