१९८३च्या वर्ल्डकप टीमच्या जादूची पुनरावृत्ती यावेळी इंग्लंडमध्ये होईल काय?

क्रिकेटचा महाउरूस म्हणजेच वर्ल्डकप सुरु झालाय. हा उरूस भरलाय क्रिकेटच्या मक्केत म्हणजेच इंग्लंडमध्ये. जगभरातले दिग्गज टीम गोळा झालेत. काल आपल्या भारतीय टीमने पहिली मॅच जिंकली. अनेक जण म्हणतायत की टीम इंडिया ही यंदाची फेव्हरेट आहे.

बरोबर ३६ वर्षापूर्वी आपण इथे वर्ल्ड कप जिंकला होता.तेव्हा कोणालाही अपेक्षा नव्हती की भारत वर्ल्ड कप जिंकेल.

एकदा ग्रेट लीजंड सुनील गावस्करना हा प्रश्न विचारला की तुमच्या मते तेव्हाची टीम आणि आताची टीम यामध्ये फरक काय? तेव्हा गावस्कर म्हणाले,

“१९८३ची टीम जास्त हँडसम होती. त्या टीममध्ये हिरो खूप होते. म्हणजे मी मराठी सिनेमात काम केलोय, संदीप पाटीलने देखील केलंय, के श्रीकांतने तमिळ सिनेमात काम केलंय. कपिलसुद्धा मोठ्या पडद्यावर झळकलाय. यशपाल शर्मा पंजाबी सिनेमामध्ये होता, मोहिंदर अमरनाथ, रवि शास्त्री दिलीप वेंगसरकर यांना सिनेमे ऑफर झाले होते. विकेट किपर सय्यद किरमाणीने देखील एका सिनेमात व्हिलनचा रोल केलाय. आमची टीम फिल्मस्टार्सनी भरलेली होती. तशी सध्याची नाही आहे. “

गावस्कर यांनी गमतीगमतीमध्ये ही कमेंट केली पण खरोखर मैदानात तेव्हाच्या टीमच्या कम्पॅरिजन मध्ये आत्ताची टीम कुठे लागते हे आपल्याला पहाव लागेल.

१. बॅटिंग ऑर्डर-

तेव्हा भारताची बॅटिंगची मदार सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, के श्रीकांत, यशपाल शर्मा, मोहिंदर अमरनाथ यांच्यावर होती. पण त्याकाळात भारतीय बॅटिंग वनडे साठी अजून तयार झाली नव्हती. वनडे जिंकण्यासाठी जो आक्रमकपणा दाखवावा लागतो तो तेव्हाच्या टीमकडे नव्हता. त्यामानाने सध्याची भारतीय टीम जबरदस्त आक्रमक आहे. सुरवात रोहित शर्मा, शिखर धवन, मग कोहली, केएल राहुल, धोनी कार्तिक अशी खूप लांब पर्यंत आणि मजबूत बटिंग लाईनअप आहे. विराट कोहलीचा सध्याचा फॉर्म पाहता भारताविरुद्ध बॉलिंग करायला भलेभले बॉलर घाबरत असतील.

२. बॉलिंग –
पूर्वी भारतीय टीम आपल्या स्पिनरच्या भरवश्यावर खेळायची. १९८३मध्ये कपिल देव सोडला तर भारताकडे क्वालिटी फास्टर बॉलर नव्हता. होते ते बलवीनदर सिंघ संधू, रॉजर बिन्नी, मदनलाल असे मध्यमगती गोलंदाज होते. त्यामानाने या वेळी  मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार ही तगड्या फास्टर बॉलरची फळी आहे, शिवाय कुलदीप यादव, यजुवेन्द्र चहल, जडेजा असे क्वालिटी स्पिनर आहेत. कागदावर पाहिलं तर बॉलिंग मध्येही सध्याची टीम १९८३पेक्षा भारी आहे.

३. फिल्डिंग-
बाकी काहीही असो पण सध्याची टीम फिल्डिंगच्या बाबतीत सर्व श्रेष्ठ आहे. त्यांची फिटनेस लेव्हल अचाट आहे. स्वतः कोहली भारी फिल्डिंग करतो. त्याच्या सिक्स पक अब असणाऱ्या टीम मध्ये एकही खराब फिल्डर नाही. शिवाय सध्याच्या टीम बरोबर एक वेगळा फिल्डिंग कोच फिजिशियन देखील असतो. त्यामुळे डाइव्ह वगैरे मारायला खेळाडू मागे पुढे पाहत नाहीत.

त्यामानाने १९८३ साली आपली फिल्डिंग सुद्धा खराब होती. संदीप पाटील सारख्या खेळाडूना ग्राउंड वर लपवावे लागायचे. तेव्हा फिल्डिंग कोच वगैरे ची चैन टीमला परवडत नव्हती. शिवाय फिल्डिंग करताना जखम झाली तर टीमच्या बाहेरही बसण्याची टांगती तलवार असायची. तरीही कपिल देव ने उलटा धावत जाऊन घेतलेला कॅच, विकेटमागे सय्यद किरमाणीने पकडलेला कॅच हे त्या वर्ल्डकपचे टर्निंग पॉईण्ट ठरले होते.

४.इंग्लिश कंडीशन-
पूर्वी भारत परदेशी खेळपट्टीवर डगमगायचा. विशेषतः इंग्लिश कंडीशन मध्ये. तिथले कायम ढगाळ वातावरण, हिरवे गवत असलेल्या वेगवान खेळपट्ट्या . मोठमोठाले ग्राउंड यावर गावस्कर सोडला तर बाकीचे खेळाडू उभे सुद्धा राहू शकत नव्हते. शिवाय भारतीय टीमचे दौरे खूप होत नसल्यामुळे तिथे खेळण्याचे एक्स्पोजर सुद्धा नव्हते.

पण सध्याच्या टीम ला इंग्लंडमध्ये खेळण्याचा पुरेपूर अनुभव आहे. शिवाय पूर्वी प्रमाणे तिथल्या खेळपट्ट्या हिरव्यागार असत नाहीत. आजकाल इंग्लिश मैदाने फास्टर बॉलर पेक्षा बॅट्समनला फायद्याची ठरतील अशी बनली आहेत. त्यांचा आकार देखील छोटा केला आहे त्यामुळे बाउन्ड्री सिक्सचं प्रमाण देखील वाढलंय. यामुळे सध्याच्या भारतीय टीमचे जिंकायचे चान्सेस सुद्धा जास्त आहेत.

५.कॅप्टन 
१९८३ साली भारत वर्ल्डकप जिंकला यात सर्वात मोठा वाटा होतं तेव्हाच्या कॅप्टनचा म्हणजेच कपिल देवचा. कपिल तेव्हा सर्वात अजून फक्त २४ वर्षाचा होता. त्याला नुकताच कप्तानी मिळालेली होती. त्याच्या टीममध्ये सगळे खेळाडू त्याच्यापेक्षा सिनियर होते. पण तरीही कपिलने त्यांच्यात जोश फुंकला. स्वतः पुढे राहून भारताला जिंकून दिले,

त्यामानाने तीस वर्षाचा विराट कोहली अनुभवी आहे. त्याने आत्ता पर्यंत तीन वर्ल्डकप पहिले आहेत, यापैकी २०११ साली विजयी वर्ल्डकपचा तो सदस्य देखील होता. त्याला कप्तानी मिळूनही बरेच वर्ष उलटून गेलेत. त्याची टीम त्याच्यासारखीचं आक्रमक आणि प्रोफेशनल आहे. १९८३च्या टीम मध्ये खेळाडू असणारे रवी शास्त्री आपली कोचिंग टीम मैदानाबाहेर विराटच्या मदतीला आहेतचं शिवाय धोनी सारखा अनुभवी कप्तान मैदानात त्याच्या मदतीला आहे.

६.ऑल राउंडर्स-

भारताने १९८३चा वर्ल्ड कप जिंकला तोच कपिल देव, मोहिंदर अमरनाथ यांच्या ऑल राउंड परफोरमन्स मुळे. झिम्बाब्वे विरुद्ध भारत हरायला आला असताना कपिलने ठोकलेल्या १७५ धावा कोणीही विसरू शकलेल नाही आहे.सध्याच्या टीममध्ये देखील हार्दिक पांड्या, केदार जाधव, रविंद्र जडेजा हे ऑल राउंडर आहेत. त्यांच्या कामगिरीवर आपली मदार आहे,

ओव्हरऑल पाहिलं तर सध्याची टीम कागदावर १९८३च्या टीमपेक्षा जास्त तगडी वाटते. वर्ल्डरँकिंग मध्ये सुद्धा आपण पहिल्या दुसऱ्या स्थानावर आहोत. कपिलची टीम त्याकाळी अगदी साधी होती. त्यांच्याकडून कोणालाही अपेक्षा नव्हत्या त्यामुळे ते कोणत्याही दबावाविना खेळले.

पण विराटच्या स्टार टीम कडून सगळ्यांच्या खूप अपेक्षा आहेत. तेच प्रेशर घेऊन त्यांना मैदानात उतरावं लागणार आहे. ते हा प्रेशर कसा हँडल करतात यावरच भारत यंदा वर्ल्ड कप जिंकेल की नाही हे ठरेल.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.