पुण्याच्या छ. शिवाजी महाराज पुलाच्या बांधकामात एका निरक्षर ठेकेदाराचा सिंहाचा वाटा आहे..

सध्या देशभरात गुजरात मधील मोरबी पुलाच्या दुर्घटनेची चर्चा होत आहे. या दुर्घटनेत आता पर्यंत १३५ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेसाठी ठेकेदाराला दोषी समजलं जात आहे. यानंतर एक चर्चा होत आहे. मोरबी येथील झुलत्या पुलाचे दुरुस्तीचे काम ओरेवा सारख्या कंपनीला देण्यात आले तरीही अशा प्रकारची दुर्घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

तर पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज पुलाची माहिती सांगण्याचे कारण म्हणजे हा पूल निरक्षर ठेकेदाराने बांधून सुद्धा ९९ वर्षांपासून सुस्थितीत आहे.  

पुणे हे इतिहासातल्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. त्यामुळे इथली बरीचं ठिकाणं, इमारती या इतिहासकालीन. सिंहगड किल्ला, लाल किल्ला, शनिवारवाडा, पर्वती अशी बरीच ठिकाणं पुण्यातलं इतिहासकालीन अस्तित्व जपून ठेवतात. यात आणखी एक नाव जोडलं जातं ते म्हणजे ‘छत्रपती शिवाजी महाराज पूल’  

या ऐतिहासिक वास्तूला आधी ‘नवा पूल’ म्हणून ओळखलं जायचं. यानंतर त्याचं नामकरण करून’छत्रपती शिवाजी महाराज पूल’ म्हणून करण्यात आलं.

पुण्यातला छत्रपती शिवाजी रस्त्यावरून शनिवारवाड्याकडे जायचे असेल, तर या छत्रपती शिवाजी महाराज पुलावरून जावं लागतं. या ब्रिटिशकालीन पुलाला सध्या ९८ वर्षे झालीत.

विसाव्या शतकापर्यंत मुठाच्या उजव्या तीरावर पुणे शहर विसावले होतं. 20 व्या शतकाच्या सुरूवातीनंतर हळूहळू इथं गर्दी वाढायला सुरुवात झाली. आता नदीच्या काठावरच वस्ती असल्याने शहराला साथीच्या रोगांनं वेढलं. त्यामुळे शहराचा डाव्या काठावर विस्तार करणे हा संभाव्य उपाय होता.

पण सगळ्या जीवनावश्यक गोष्टी, संसाधने उजव्या काठावर केंद्रित असल्याने हे काम जरा अवघड होतं. त्यामुळे विस्ताराला प्रोत्साहन देण्यासाठी या पुलाचे नियोजन करण्यात आले.

तसं पाहिलं तर १९२० च्या जानेवारी महिन्यातचं या पुलाचे काम सुरू करण्यात आलं होतं. जे १९२३ मध्ये पूर्ण झाल. त्यानंतर १७ सप्टेंबर १९२३ रोजी मुंबई प्रांताचे गव्हर्नर जॉर्ज लॉईड यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. या संबंधित माहिती देणारी संगमरवरी शिला आजही पुलाच्या मध्यभागी पहायला मिळेल.

या पुलाचा नकाशा काढण्यात गणपतराव महादेव केंजळे यांच्याबरोबर इतर अनेक अधिकाऱ्यांचा देखील सामावेश आहे. केंजळे हे त्या काळातले प्रख्यात ठेकेदार होते. त्यांनीच या पुलाचे बांधकाम केलेले आहे. निरक्षर असले तरी केंजळे यांच्या बांधकामातले ज्ञान अभियंत्यापेक्षाही मोठे होते.

१९२० पुर्वी लकडी पुल आणि कसब्यातील कुंभारवाड्या जवळचा धरणवजा पुल या दोनचं मार्गांवरून पूल ओलंडता यायचा. त्यामूळेचं हा पूल बांधण्याचं काम हाती घेतलं गेलं.

या पुलास लॉइड ब्रिज नावानेही ओळखले जायचे.  पुलास मध्यभागी महिरप आणि एकुण आठ कमानी आहेत.

महिरपीप्रमाणे आणखी एक महिरप शेखसल्ला दर्ग्यापाशी असुन ती बुजविली आहे.

विशेष म्हणजे संपुर्ण दगडी बांधकाम असलेला हा पुल आजही सुस्थितीत आहे. शिवाय त्याचे बांधकाम पुण्यातल्या बाकीच्या पूलांना मागे टाकणारं हे नक्कीचं. 

पण या पुलाचे सौंदर्य, स्थापत्यशैली आणि वाहतुकीच्या दृष्टीने असलेला भक्कमपणा आजही कायम आहे. यावरून तेव्हाच्या लोकांच्या दूरदृष्टीचा आणि स्थापत्यातील सौंदर्यदृष्टीचा अंदाज येईल.

समोर ऐतिहासिक शनिवारवाडा, बाजूला पुणे महापालिका आणि खाली पुण्याची सार्वजनिक वाहतूक या सगळ्या गोष्टींचं बॅलन्स ठेवणारा हा पूल. पुलाच्या बाजूला जुना तोफखाना होता. 

पुलावर भरणारा छोटा बाजार पाहून पावलं थोड्यावेळ का होईना तिथे थांबणारचं. पूलावर जाताना आधी विकायला असणाऱ्या वॉकमन, रेडिओचा आवाज कानावर पडायचा. पण आता जमाना बदलल्यानं तिथं मोबाईलच्या अॅक्सेसरीजं मिळतात.

काही वर्षांपूर्वी या पुलाच्या ऐतिहासिकतेला धक्का न लागता डागडुजी करण्यात आली. यानंतर पुलाचे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज पूल’ असे करण्यात आले.   

बैलगाडी, घोडागाडी, हत्तीवरून सफारी, ब्रिटिशांच्या अलिशान गाड्या ते आजच्या हायफाय गाड्या या पूलानं पाहिल्यात.

 

हे ही वाचा भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.