संपसम्राट जॉर्ज फर्नांडिसना सुद्धा गुंडाळू शकणारा एकमेव मुख्यमंत्री म्हणजे वसंतराव नाईक

सुप्रसिद्ध कामगार नेते जॉर्ज फर्नाडिस मुंबईत असताना आणि मुंबई महानगरपालिका तसेच बेस्टच्या कामगारांचे नेते असताना कामगारांच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यातच नित्यनियमाने संप ठोकायचे. त्या काळात अशी पद्धत होती की, महापालिका कर्मचाऱ्यांनी किंवा गिरणी कामगारांनी आपापल्या मागण्यांसाठी संप केला की, मागण्यांवर अनेक दिवस चर्चा झडत राहायची.

दोन्ही बाजूंकडील तिसऱ्या व दुसऱ्या फळीतील नेते हे चर्चेचे गुऱ्हाळ लांबवता येईल तेवढे लांबवायचे आणि एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून कधी तरी वाटाघाटी फिसकटवायचे. शेवटी अंतिम वाटाघाटीसाठी एका बाजूने कामगार संघटनेचे सर्वश्रेष्ठ नेते आणि दुसऱ्या बाजूने राज्याचे मुख्यमंत्री एकत्र यायचे. शेवटी तिढा सोडविण्याचे श्रेय अर्थातच मुख्यमंत्र्यांना मिळायचे.

अशाच प्रकारच्या एका वर्षीच्या संपाच्या तिढय़ात महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या बाजूने ‘संपसम्राट’ जॉर्ज फर्नांडिस आणि तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक एकत्र येणार होते. 

आणि विशेष म्हणजे या बैठकीत संपसम्राट जॉर्ज फर्नांडिस यांना मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी गुंडाळल होतं.

त्यावेळी संपाच्या अंतिम वाटाघाटी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रात्री ९ वाजता होतील असं ठरलं होत. त्यामुळे पत्रकार मंडळी रात्री आठ साडेआठ वाजल्यापासूनच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डेरेदाखल झालेली होती. ठरल्याप्रमाणे जॉर्ज फर्नाडिस ९ च्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी येऊन दाखल झाले. मुख्यमंत्र्यांच्या शाही लवाजम्याने त्यांचे आगत-स्वागत केले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. जॉर्ज फर्नांडिस पत्रकारांनाही भेटले.

त्यांच्याबरोबर दोन-चार हास्यविनोद झाले. घडय़ाळाचे काटे पुढे सरकत होते. तास तर कधीच होऊन गेला. हळूहळू दुसरा तासही जाणार अशी चिन्ह दिसायला लागली. उपस्थितांपैकी सगळ्यांतच आणि त्यातही पत्रकारांमध्ये अधिकाधिक अस्वस्थता दिसायला लागली. नाही म्हणायला अधूनमधून मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा अधिकारी लगबगीने यायचा आणि जॉर्ज फर्नांडिस आणि त्यांच्या बरोबरच्या नेत्यांशी हास्यविनोद करायचा. परत माघारी जाताना म्हणायचा,

नाईकसाहेब कामात आहेत, दिल्लीहून काही मंडळी अचानकपणे आलेली आहेत. त्यांच्याबरोबर बोलणे सुरू आहे. ते संपताच आपलीच बोलणी सुरू होतील. 

हे सांगून तो अधिकारी वातावरण हलक-फुलक ठेवण्याचा प्रयत्न करायचा. शेवटी अकरा-सव्वा अकराच्या सुमारास स्वत: नाईकसाहेबच हसतहसत बाहेर आले आणि जॉर्ज फर्नाडिस यांचा हात हातात घेऊन म्हणाले,

माफ करा. मला थोडा उशीर झाला. दिल्लीहून काही माणसे अचानकपणे आली. त्यांच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचे होते. आपणाला कळवण्याइतपतही वेळ मिळाला नाही. मी आपणाला दिलेली वेळ पाळू शकलो नाही, याबद्दल माफ करा.

असं म्हणत म्हणतच नाईक साहेबांनी फर्नांडिस यांच्या हाताला धरून  बैठकीच्या खोलीत घेऊन गेले. वाटाघाटी काय होणार याकडे लक्ष लागलेल्या पत्रकारांनी फोनसाठी धावाधाव सुरू झाली. ज्यांना फोन उपलब्ध झाला त्यांनी वाटाघाटी सुरू झाल्याची बातमी तर दिलीच,  परंतु मधल्या दोन तासांच्या नाटय़ाचीही तिखट मसाला लावून फोडणी दिली.

हळूहळू मिनिट व तासकाटा पुढे-पुढे सरकू लागला. बाराचा ठोका पडला. त्यानंतर एकचा, दोनचा. पत्रकारांनी आपल्या कार्यालयाला फोन करून कळवून टाकलं की, आता काही खूपच महत्त्वाचे घडले तरच फोन करू, एरवी फोनची वाट बघू नका. घडय़ाळाचे काटे पुढे सरकतच होते आणि पत्रकारांपैकी अनेकजण मिळेल ती खुर्ची किंवा टेबल पकडून जमेल तसे अंग ताणून झोपेपासून स्वत:ला वाचवायचा प्रयत्न करीत होते. व या पत्रकारांना झोप आवरणं कठीण झालं होतं.

त्यांच्या झोपेन त्यांच्यावर असा काही ताबा घेतला की, त्यांच्या घोरण्याचा आवाज तेवढा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोरच्या त्या शांत वातावरणाचा जमेल तसा भंग करत होता. 

अधूनमधून किती वाजले हे समजण्यासाठी काही जण अर्धवट झोपेत डोळे किलकिले करून घडय़ाळाकडे हताशपणे पाहण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांची झोप त्यांना पुन्हा एकदा स्वत:च्या मिठीत सामावून घेत होती. हे असं किती वाजेपर्यंत चाललं हे कोणत्याही पत्रकाराच्या नक्की लक्षात नाही.

काहीजण सांगतात की पहाटे साडेचारच्या सुमारास मुख्यमंत्री आणि जॉर्ज फर्नाडिस बैठकीच्या खोलीतून बाहेर येत आले. त्या क्षणाला एकजात सर्व पत्रकार झोपेच्या मिठीतून स्वत:ची सुटका करून घेऊन, जमेल तेवढय़ा ताकदीने आणि जागृतपणे डोळे उघडण्याचा प्रयत्न करून स्वत:ला सावरून बसले. काही क्षणांतच मुख्यमंत्री व जॉर्ज फर्नाडिस थोडेसे हसतहसतच बाहेरच्या व्हरांडय़ात आले. तेवढ्यात सर्वच पत्रकारांनी त्यांना गाठलं. पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.

वाटाघाटी यशस्वी झाल्या का? संप मिटला का? काय ठरले?

वसंतराव नाईकांनी जॉर्ज फर्नांडिसांकडे बोट दाखवलं व हसत हसत म्हणाले, साहेबांना विचारा.. काय झालं ते!’

त्यानंतर पत्रकारांनी आपल्या प्रश्नांचा मोर्चा जॉर्जसाहेबांकडे वळवला. प्रश्न तेच. पण त्यात फारसा जीव नव्हता. परंतु काही तरी कळावे अशी ओढ होती. जॉर्ज फर्नाडिस हसतहसत म्हणाले,

आम्ही संपावर बोललोच नाही!

जॉर्जच्या यांच्या या उत्तराने सर्वच पत्रकार एकदमच थंड पडले. परंतु अंगातील रग आणि शिल्लक ऊब स्वस्थ बसायला देईना. काही ज्येष्ठ पत्रकारांनी थोडय़ाशा चढय़ा आवाजातच प्रश्न केला, 

मग रात्री ११ ते पहाटे ५.३० पर्यंत आपण केलंत तरी काय?

जॉर्ज फर्नाडिस म्हणाले, महाराष्ट्राची व देशाचीही लोकसंख्या भरमसाट वेगाने वाढते आहे. या वाढत्या लोकसंख्येला दोन वेळचे अन्न पुरवायचे तर शेतीत हायब्रिड वापरल्याशिवाय पर्याय नाही, हे नाईकसाहेब मला पटवून देत होते. मला हा विषय तसा नवीनच असल्यामुळे मी आस्थेवाईकपणे त्यांचे म्हणणे ऐकत बसलो होतो. त्यांनी हा विषय मला मुळातूनच म्हणजे हायब्रिड म्हणजे काय इथपासून समजावून सांगितला. मध्यंतरी दोन वेळा चहा झाला आणि थोडे खाणेही!

‘आणि संपाचं काय?’ पत्रकारांनी हसत हसत एकच गिल्ला केला.

संपाबद्दल बोलण्यासाठी आम्ही सकाळी ९ वाजता भेटण्याचे ठरविले आहे! या जॉर्ज यांच्या म्हणण्याला मुख्यमंत्र्यांनी मान हलवत होकार दिला आणि ते जॉर्जचा निरोप घेऊन बंगल्याचा आतल्या बाजूला निघूनही गेले. त्यानंतर दोन-चार हास्यविनोद करून जॉर्जही निघून गेले.

या अफलातून घटनेवर पुढे कित्येक दिवस गप्पा रंगत होत्या. काही ज्येष्ठ आणि त्या घटनेच्या वेळी प्रत्यक्ष उपस्थित असलेले तीच तीच घटना परंतु प्रत्येक वेळी अतिशय खुलवून सांगत. अशी घटना दुसऱ्या कोणा मुख्यमंत्र्याच्या आणि कामगार पुढाऱ्याच्या आयुष्यात घडली असेल नसावी. या दृष्टीने वसंतराव नाईक धन्यच म्हटले पाहिजेत आणि कामगारांसाठी सदान्कदा भांडणारे तसेच शिरा ताणून भाषणे ठोकणारे जॉर्ज फर्नाडिस त्याहीपेक्षा सव्वापटीने धन्य म्हटले पाहिजेत.

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.