जॉर्ज बुश परमाणु करारासाठी आले आणि मनमोहन सिंगांनी आंब्याचाही करार करायला लावला.

आंब्यांचा सिझन चालूये, काय मग खर्रर्र खर्रर्र सांगा किती हाणताय आंबे ?  बिनधास्त खावा.. आपले मोदी शेठ पण खातात आवडीने , आंबा म्हणजे जीव कि प्राण.. आपला म्हणजे भारतीयांचा ..त्यातल्या त्यात महाराष्ट्राचा असो,

आज याच आंब्याबद्दलचे काही खास किस्से सांगणारे मी तुम्हाला ,

२००६च्या मार्च मधली गोष्ट आहे. जॉर्ज बुश आपल्या भारतात आले होते दौऱ्यावर नेमके आंब्याच्या सिझन मध्ये.

त्यांच्या या दौऱ्यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले होते, त्याला कारणही तसेच मोठे होते. कारण या दरम्यान  भारत -अमेरिकेमध्ये परमाणु करार होणार होता. ठरलं तसं झालं, पाहुणे आले , बोलणी झाली आणि करारही झाला. सगळीकडे राष्ट्रीय -अंतराष्ट्रीय मीडियात सगळा वृतांत छापून आला.

या सगळ्या बातम्यात अजून एक बातमी लोकं फार गंमतीने वाचू लागले, ते म्हणजे नव्या दिल्लीत असतांना बुश मीडियासमोर बोलतांना म्हणाले “अमेरिकेला भारतचे आंबे खायची खूप इच्छा आहे”.

आता आंब्याच्या सिझन मध्ये पाहुणे आल्यावर त्यांना बिना रसाळीचं थोडीच जाऊ द्यायचं असतं?

मनमोहन सिंगांनी बुशला आंबे खाऊ घातले आणि गोड बोलून भारतीय कृषी उत्पादनावरील बंधने हटवण्याची विनंती केली.  

राष्ट्रध्यक्ष जॉर्ज बुश हापूस आंबा खाऊन भलतेच खुश झाले.  भारताच्या कृषी उत्पादनांची आयात करण्याची बोलणी झाली, मागे १७ वर्षापासून आंब्याच्या आयातीवर लागलेले प्रतिबंध हटवले गेले आणि त्याच्या पुढील वर्षापासून अमेरिकेला भारताचे आंबे पोहचायला लागले. 

या करारानंतर भारतीयांचा कॉन्फिडन्स आणखीनच वाढला. आमच्याकडे भलेही परमाणु बनवण्यासाठीची टेक्नॉलॉजी नाही पण आमच्याकडे आंबे आहेत, असं फळ ज्याची चव चाखायला सगळ्या जगाला आवडते.

इंग्रजीमध्ये मँगो नाव कदाचित यामुळे ही पडले असेल कि, मल्याळम मध्ये आंब्याला मंगा म्हणले जाते, आणि तमिळ मध्ये मानकाय, असो

जेंव्हा १९४८ मध्ये वास्को दी गामा पहिल्यांदा केरळाच्या मालाबार तटावर पोहचला अन त्याला आंबा हे फळ माहिती झाले

आणि त्याच्याचमुळे भारताचा आंबा युरोपमध्ये हि पोहचला. आणि मल्याळी मंगा तिकडे जाऊन मँगो बनला. 

बरं असंही नाही कि,आंबे फक्त भारतातच मिळतात. ब्रिटन, दक्षिण आफ्रिका,ब्राझील सारख्या देशात ही आंब्यांचे उत्पादन घेतले जाते. अमेरिकेतल्या लोकांनाही आंबा मिळतो जो मैक्सिकोवरून आणला जातो. हे मात्र खरं आहे कि, या सर्व देशांत खूप खूप वर्षाआधी आंबे पोहचण्याचा इतिहासदेखील भारताशी निगडीत आहे.

वर सांगितलेला करार होता २००६ चा परंतु त्याच्या खूप वर्ष आधीही अमेरिका स्वतःच्या देशात आंबे निर्माण करावे म्हणून खूप खूप प्रयत्न करीत होता, त्याची हिस्ट्रीही तितकीच इंटरेस्टिंग आहे.

परड्यू यूनिवर्सिटीने सेंटर फॉर न्यू क्रॉप्स एंड प्लांटेशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९व्या शतकात अमेरिकेचे आंब्याचे उत्पादन घेण्याचे प्रयत्न चालू होते. १८३३ सालामध्ये डॉ हेनरी पेरिन यांनी मैक्सिकोमधून आणलेल्या आंब्याची छोटे छोटे रोपं त्यांनी त्यांच्या घराच्या बागेत लावली. परंतु त्याचं काही दिवसांच्या नंतर शेजारी लोकांकडून पेरीन यांची हत्या झाली आणि नंतर त्या रोपांचीही काळजी घ्यायला कुणी नसल्यामुळे ती रोपं सुकून गेली.

दुसरा प्रयत्न १८५० दशकात झाला. वेस्टइंडीजवरून आंब्याची रोपं आणली गेली, ती झाड मोठेही झाले परंतु १८८६ मध्ये तेथील थंडी सहन न झाल्यामुळे मेली. त्यानंतर पुन्हा देशाने मुंबई वरून आंब्याची झाडाची ६ कलमे मागवली. यातील सगळी कलमे वाचू शकली नाही शिवाय एक मात्र वाचलं. नऊ वर्षानंतर याला फुल आणि फळ ही आलेत. मलगोआ असं याला नाव दिलं गेलं. त्यानंतर बऱ्याचदा भारताशिवाय वेस्टइंडीज आणि फिलीपींसवरूनही रोपं मागवण्यात आले होते.

परड्यू यूनिवर्सिटीने सांगितल्यानुसार, १८९९ ते १९३७ या काळात ५२८ वेळेस आंब्याचे रोपं लावण्यास प्रयत्न झाला होता.

त्यानंतर अमेरिकेत आता आंब्याचे उत्पादन घेणे सुरु झाले परंतु तरीही अमेरिकी लोकांना भारतीय आंबेच फार आवडतात. त्याचे कारण असे कि, अमेरिकी आंब्यापेक्षा भारतीय आंबे जास्त रसदार आणि गर असतो, आणि भारतीय आंबा फार काळ टिकतो.

अमेरिकेत आंब्याचे आगमन फार आता-आता झाले असले तरी आशियातील इतर देशांमध्ये भारतीय आंब्याचे आगमन चौथ्या ते पाचव्या शतकांदरम्यानच झाले होते. ‘रोमान्स ऑफ मँगो’ या पुस्तकात कुसुम बधवर लिहितात की, धर्माच्या विस्ताराबरोबरच आंबेही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोचवले गेले.  त्याची सुरुवात बौद्ध धर्मापासून झाली, मग इस्लामने ती पुढे नेली आणि शेवटी ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या माध्यमातून ते प्रथम फिलिपाईन्सला पोहोचले. येथून मेक्सिकोत पोहचले.

सुमारे १५० वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियातील क्विन्सलँड या प्रांतातून भारतात घोडे पाठवण्यात आले होते. घोडे उतरवून परतणाऱ्या जहाजांमध्ये भारताने आंब्याची झाडे क्वीन्सलँडमध्ये पाठवली. परड्यू यूनिवर्सिटीच्या कागदपत्रांनुसार, १८७५ मध्ये क्वीन्सलँडमध्ये भारतीय आंब्याचे ४० प्रकार लावण्यात आले. अशा प्रकारे भारतीय आंबा ऑस्ट्रेलियात पोहोचला.

ऐतिहासिक दस्ताऐवजावरून हे स्पष्ट होते की आंब्याचा जनक हा भारत देश आहे. थोडक्यात आंब्याची मातृभूमी ही भारत आहे.

सध्या जगातील सुमारे एक तृतीयांश आंब्याचे उत्पन्न  भारतात घेतले जाते.

पण गेल्या काही वर्षांत भारतीय आंब्यावर अमेरिकेपासून युरोप आणि ऑस्ट्रेलियापर्यंत बंदी घालण्यात आली होती.

भारतीय आंब्यावर कीटकनाशकांची फवारणी केली जाते, असे या देशांचे म्हणणे होते.  मात्र, आता सर्वत्र भारतीय आंब्याची निर्यात सुरू झाली आहे. भारतातून संपूर्ण जगात आंबा पसरला आहे, पण जॉर्ज बुश यांच्याच बोलण्यातून बघा ना, लोकं अजूनही आंब्याच्या खऱ्या चवीसाठी भारताकडेच पाहतात.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.