कुठल्या नेत्याने नाही तर एका IAS ऑफिसरने जॉर्ज फर्नांडिस यांचे मुंबईतील वर्चस्व मोडीत काढलं…

१९६० च्या दशकात मुंबईच्या कामगारांमध्ये डोक्यावर दाट व विखुरलेले केस, शरीरावर खादीचे कपडे, पायात चप्पल व डोळ्यांवर जाड्या फ्रेमचा चष्मा असलेला एक व्यक्ती त्यांच्या संपाच नेतृत्व करायचा. पोलिसांचा काठ्या पडत असताना देखील त्या व्यक्तीने कसलीही तमा न बाळगता त्या व्यक्तीने अनेक आंदोलन आपल्या हिंमतीवर व जिद्दीवर कायम चालू ठेवली.

तो नेता होता जॉर्ज फर्नांडिस! 

राजकारणातला ‘अँग्री यंग मॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व कामगारांच्या समस्या आपल्याच समस्या म्हणून त्यांच्यासाठी लढाणारे जॉर्ज फर्नांडिस त्याकाळात कामगारांचे सर्वात झुंजार आणि प्रभावी नेता होते. व्यवस्थेविषयी असणारी चीड आंदोलनाच्या माध्यमातून ते वेळोवेळी समोरं आणायचे. मुंबईच्या कामगार वर्गावर अनेक वर्ष जॉर्ज यांनी बिनदिक्कतपणे राज्य केले. त्या नंतर त्यांनी बिहारला आपली कर्मभुमी बनवली होती.

पण जॉर्ज यांचं मुंबईमधील हे वर्चस्व मोडून काढलं होतं ते आयएएस अधिकाऱ्याने.

आय.ए.एस. अधिकारी जे. बी. डिसूझा. डिसुझा हे पुढे जावून राज्याचे मुख्य सचिव देखील झाले. पण १९६७-६८ साली ते ‘बेस्ट’चे सरव्यवस्थापक होते. त्यावेळी कामगार नेते म्हणून जॉर्ज फर्नाडिस यांची कामगार संघटनांवर एकहाती पकड होती. ते नुकताच कॉंग्रेसचे दिग्गज नेते स. का. पाटील यांचा पराभव करून लोकसभेवर निवडून गेलेले होते. 

असं म्हंटलं जायचं की कामगारांची संघटना करुन त्यांच्या मागण्यासाठी बंद घडवून आणण्याच्या त्यांच्या धोरणामुळे तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण आणि मुख्यमंत्री वसंतराव नाईक या दोघांनी देखील जॉर्जबाबत नरमाईचे धोरण स्वीकारले होते. जॉर्ज यांनी महापालिका आणि ‘बेस्ट’चे कामगार तसेच टॅक्सीचालकांना संपाचा आदेश दिला तर मुंबईकरांचे बरेच हाल व्हायचे. त्यामुळे हे नेते त्यांना काहीशे घाबरुन असायचे.

मात्र डिसूझा यांनी जॉर्ज यांना धडा शिकवायचे ठरवले. लवकरच त्यांना तशी संधी प्राप्त झाली. 

एका साध्या कारणावरून जॉर्ज यांनी संप पुकारला आणि परिणामी ‘बेस्ट’ सेवा थंडावली. महिन्याच्या २७ किंवा २८ तारखेचा तो दिवस असावा. डिसूझा यांनी कोणालाही पगार देऊ नये, असा आदेश काढला. त्याकाळात एक तारखेच्या पगारावर घरची चूल अवलंबून असायची. कारण शासनासह सगळीकडे रोख पगार देण्यात यायचा.

या आदेशासोबतच डिसूझा यांनी यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांना देखील या मुद्द्यात हस्तक्षेप न करण्याची विनंती केली.

असं म्हणतात की जॉर्जना परस्पर धडा मिळाला तर बरचं होईल, या भावनेतून या दोघांनी पण या प्रकरणातून अंग झटकले आणि जॉर्ज तोंडघशी पडले. दरम्यान ‘बेस्ट’ आगारांमधील स्वस्त धान्य दुकानेही डिसूझा यांनी बंद केली. डिसुझा यांनी अश्या चहूकडून केलेल्या कोंडीमुळे जॉर्ज जेरीस आले. 

दुसरीकडे बेस्ट बंद असल्यामुळे मुंबईकरांचे हाल होत होते. त्यामुळे सगळी वृत्तपत्र पण जॉर्ज यांच्यावर तुटून पडली होती. पगार आणि अन्न धान्य नसल्यामुळे लवकरच कामगारही चलबिचल झाले. तिकडे संप मागे घेतल्याशिवाय कोणतीही चर्चा करण्यास डिसूझा यांनी नकार दिला. एवढेच नव्हे तर जे कामगार परतणार नाहीत त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. हीच शेवटची काडी ठरली.

या इशाऱ्या नंतर आझाद मैदानात सभा घेतली आणि प्रशासनाला धमकी देत जॉर्ज यांनी संप बिनशर्त मागे घेतला. 

त्यावेळी अशा चर्चा होत्या की केवळ वेळ मारुन नेण्यासाठी जॉर्ज यांनी प्रशासनाला थातुरमातुर धमक्या दिल्या होत्या. पण त्यानंतर जॉर्ज यांचा कामगरांमधील विश्वास कमी होत गेल्याचं पाहायला मिळालं. यानंतर मुंबईमधील त्यांचे वर्चस्व संपुष्टात आले. पुढे वर्ष-दोन वर्षात झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि जॉर्ज यांनी बिहारला आपली कर्मभुमी बनवली.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.