त्यावेळी वर्गात दोन गट होते, एक पेपरक्वीनवाल्यांचा आणि दुसरा चायना पेनवाल्यांचा..

शाळेत असताना पण एक वर्गवारी होती. खरं तर पेनवारी म्हटल तरी चालेल. आम्ही सर्वसामान्य घरातली मूलं साधे टीकटॉक करणारे २-३ रुपयाचे पेन वापरायचो. आमची जास्तीत जास्त मध्यमवर्गीय झेप रेनोल्ड्सचा पांढराशर्ट आणि निळी टोपी असणाऱ्या पेन पर्यंत जायची. एखादा घराणेशाहीचा वारसदार भावी आमदार खासदाराचा एकुलता एक लेक पार्करचा महागडा पेन आणायचा. त्याच्या शाही कंपासमध्ये शोभिवंत असा पेन बघायला आम्ही नंबर लावायचो.

हे सोडून पहिल्या बेंचवर बसणारी चष्मीश सुंदर हस्ताक्षरवाली मुलं होती, त्यांच्याकडे असायचे फाउंटन पेन उर्फ आमच्या भाषेत शाईचे पेन. एकदम नक्षीदार नाजूक निब असणारे शाईचे बेताने वापरणारी ही पोरं स्कॉलरबॅचवाली असायची. बारीक निरीक्षण केलं तर यांचे पालक शिक्षक या जमातीतले असायचे. त्यातही मुख्याध्यापक वगैरे असणाऱ्यांची मुलं चायना पेन घेऊन येत होते. म्हणजे त्यातपण पेपरक़्विनचा शाईपेन विरुद्ध हिरो चायना पेन अशी पोटजात होती.

पार्करचा पेन हा आपला घास नाही आम्हाला माहित होतं.

पण सुबक नाजूक देखण्या दिसणाऱ्या गोल्डन झाकणाच्या चायना पेनवर आमचा डोळा होता. घरच्यांची कितीतरी मनधरणी केली पण आमचा गबाळा स्वभाव बघता ४५ रुपयाचा पेन घेऊन देणे त्यांच्या खिशाला परवडणारे नव्हते. एकदा फादर म्हणाले,

“जर दहावीत बोर्डात आलास तर चायना पेन घेऊन देतो.”

आता बाकीचे पालक पोरांना बोर्डात येण्यासाठी स्कुटीच वगैरे लालूच दाखवत होते आणि आमची गाडी चायना पेनवर अडकली होती. शाईच्या पेनमुळे अक्षर किती सुंदर येतात व त्यामुळेच चायना पेनची कशी आवश्यकता आहे आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला. पण आमच्या फादरना ठाऊक होतं स्वतः ब्रम्हदेव जरी आला तरी आमच अक्षर वाचू शकणार नाही आणि खरोखर बोर्डात येण्याच स्वप्न बघयला ते दुधखुळे नव्हते. तरी निवडणुकीपूर्वीच्य आश्वासनाप्रमाणे गाजर आम्हाला दाखवल गेल.

असो विषयांतर नको.

शाळेत एकदा इंग्लिशच्या मास्तरनी कम्पल्सरी शाईचा पेन आणायला लावल्यावर आमच्या घरच्यांनी एफडी मोडत असल्याचा भाव करून एक शाईचा पेन आणि एक कॅमलची निळ्या शाईची बाटली आणून दिली. वर एक मोठ लेक्चर दिल. त्यात शाई भरणे हा सोहळाच होता. एक पम्प घेऊन शाई भरणे सोबत अंग आणि पेन राड करणे वगैरे प्रकार आनंदाने केले गेले.

खूप खुशीत तो पेन घेऊन शाळेत आलो पण पहिल्याच तासाला खाली पडून त्या पेनाची निब तुटली. परत त्या वाटेला गेलो नाही.

आयुष्यात अनेक पेन येऊन गेले. सगळे बॉलपेन. पुढे इंजिनियरिंगला असाईनमेंट् लिहिताना दोन रुपयाचे डझनावर मिळणारे पेनच नशिबात होते. फाऊंनटन पेनच्या शाईने बोटं कधी रंगलीच नाहीत. चायना पेन, तो पेन वापरणारी सुबक ठेंगणी हे एक स्वप्नच उरल. आता तर काय कॉम्प्यूटरवर मेल लिहिणे आणि मोबाईल व्हाॅटसअप वर बोटं चालवणे हेच आयुष्य आहे.

आता कितीजण फाउंटन पेन वापरतात माहित नाही. मात्र उंचेलोग उंची पसंद वाले मात्र हे पेन खिशाला हमखास अडकवतात आणि फक्त कधी वेळ पडली तर फराटेदार सही करण्यासाठीच तीच झाकण काढतात.

तुम्हीपण शाईच्या पेनाचे भक्त असाल,

तुमच्यापण या पेनाशी जोडलेल्या, अंगावर सांडलेल्या शाईच्या काही आठवणी असतील तर २९ सप्टेंबरपासून ते १ ऑक्टोबर पर्यंत पुण्यात आपटे रोडवर स्वप्नशिल्प-श्रेयस बँक्वेट्‌स येथे एक प्रदर्शन भरतंय तिकड जा. हे आहे फक्त फाउंटन पेनच प्रदर्शन. तिथे तुम्हाला शंभर रुपयापासून दोन लाख रुपयाचे पाहायला मिळतील.  शाईचा पेनाचा इतिहास, भूगोल, विज्ञान तुम्हाला तिथे अनुभवायला मिळेल.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Mandar Rajmane says

    माझ्या पण आठवणी अशाच काहीतरी आहेत.. मोठ्या बहिणीकडे होता शाईचा पेन. स्कॉलरशिप ला नंबर काढ मग माझा पेन तुला असं तिने सांगितलं होतं.. माझ्या खिशाला पण लागेल कधीतरी सोनेरी झाकण अशी स्वप्ने बघत होतो.. पण आयुष्य use and throw पेन मध्ये कधी घुटमळत गेलं ते कळलं नाही..!

Leave A Reply

Your email address will not be published.