मराठी सिनेमात तो ‘कॉमेडियन’ म्हणून अडकला, पण तो त्याहून भारी आहे.
अख्खा महाराष्ट्र त्याला सिद्ध्या म्हणूनच ओळखतो. पूर्ण नाव सिद्धार्थ रामचंद्र जाधव. तो पिक्चरमध्ये असला तर त्याचा धुमाकूळ असणार याची ग्यारंटी.
मराठी सिनेमामध्ये अशोक सराफ आणि लक्ष्यान कॉमेडीला अच्छे दिन आणले. भरत जाधव, मकरंद अनसापुरे, संजय नार्वेकर यांनी ही परंपरा पुढे नेली. केदार शिंदेच्या “अग बाई अरेच्चा ने” तर इतिहास घडवला. यात अनेक बड्या बड्या सितारयांच्या गर्दीत सिद्ध्या पण होता. अगदी छोट्या रोलमध्ये. तो संजय नार्वेकरचा चाळीतला मित्र असतो. दारू पिउन दोघे घरी येतात आणि सिद्ध्याच्या बापाला सापडतात. मध्यरात्री जॉगिंगला निघालोय म्हणून सांगून सिद्ध्या तिथून सटकतो. काही सेकंदाच्याच त्या सीनमध्ये सिद्ध्या भाव खाऊन गेला.
आपल्या दोस्तांच्या गँगमध्ये कायम एक पोरगा असतो ज्याला आपण नेहमी वेड्यात काढत असतो, त्याला पण त्याच काही वाटत नसत. कधी माकडचाळ्यांनी तर कधी निरागस वागण्यानं अडचणीत येणारा पण कायम सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणनारा दोस्त म्हणजे सिद्धार्थ जाधव.
सिद्ध्याने पडद्यावर खूप प्रकारच्या भूमिका केल्या आहेत पण “जत्रा” या पिक्चरपासून त्याच्या प्रत्येक रोलमध्ये दोस्तीचा फॅक्टर कायम असतो.
सिद्ध्या जन्मला मुंबईत. त्याचं कुटुंब बापाच्या नोकरीसाठी कोकणातून मुंबईला आलेलं. शिवडीच्या भोईवाडा परिसरात एका झोपडीत वाढलेल्या सिद्ध्याला चुकून सुद्धा आपण फिल्ममध्ये जाऊन हिरोचा रोल करेन असं वाटलं नव्हत. घरातला फुटका आरसा सुद्धा त्याला सांगू शकत होता की आपण हिरो मटेरीअल नाही.
बापाकडून नाटकात अभिनयाचा किडा सिद्ध्याकडे वारश्याने आला होता. आवड म्हणून कॉलेजात नाटकात काम करायचं आणि मोठा झाल्यावर इन्स्पेक्टर व्हायचं हे त्याच ध्येय. नाटकासाठी फेमस असलेल्या रुईया कॉलेजमध्ये प्रवेश त्याला मिळालं नाही. म्हणून रुपारेल कॉलेजला तो गेला. ते एका अर्थी त्याच्या पत्थ्यावर पडलं .
सुरवात बॅकग्राउंडच्या गर्दीतून केली पण तिथन प्रगती करत करत शेवटच्या वर्षापर्यंत तो रुपारेलचा सुपरस्टार झाला. त्यावर्षीची एकांकिका स्पर्धांची सगळी बक्षिस सिद्ध्याने कॉलेजसाठी खिशात घातली होती. व्यावसायिक रंगभूमीकडून विचारणा झाली आणि अभिनय हेच करीयर करायचं त्यान नक्की केलं. डीडी मेट्रो चॅनलने घेतलेल्या टॅलंट हंट स्पर्धेत तो उपविजेता ठरला.
तुमचा मुलगा काय करतो वगैरे नाटकात काम केल्यावर पॅडी कांबळेशी त्याची दोस्ती झाली. त्यानेच सिद्ध्याला केदार शिंदेशी गाठ घालून दिली आणि तोच त्याच्या आयुष्यातला टर्निंग पाँइंट ठरला. केदारच्या “लोच्या झाला रे” नाटकात एकहि संवाद नसलेल्या आदिमानवाच्या रोलमुळे सिद्धार्थ जाधव हे नाव मुंबई बाहेरच्या नाट्यरसिकांपर्यंत पोहचले.
केदार शिंदेच्याच जत्रा मध्ये पहिल्यांदा त्याला महत्वाची भूमिका मिळाली. डबल रोल असलेल्या भरत जाधवबरोबर सिद्ध्याने अख्ख्या पिक्चर भर घातलेला गोंधळ अविस्मरणीय होता.
भरत जाधव आणि केदार शिंदेबरोबरची त्याची जोडी विशेष जमली. केदार शिंदेने बकुळा नामदेव घोटाळे पिक्चरसाठी त्याला हिरोचा रोल दिला. सिद्ध्यासाठी तो ४४० व्होल्टचा शॉक होता. तिथून मागे वळून त्याने पाहिलं नाही.
दे धक्का मधला “क्रिप्टोमेनियाक” धनाजीमामा सगळ्यांचाच लाडका बनला. तिथून त्याचे सूर महेश मांजरेकरबरोबर कनेक्ट झाले. मी शिवाजी राजे भोसले बोलतोय मधला उस्मान पारकर, शिक्षणाच्या आईचा घो मधला प्रेमळ डॉन इब्राहिम भाई. महेश मांजरेकरच्या प्रत्येक पिक्चर मध्ये तो असतोच. त्याचाच ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या “लालबाग परळ” मधला स्पिडब्रेकरचा रोल हा सिद्ध्याचा आत्तापर्यंतचा सगळ्यात बेस्ट रोल समजला जातो.
सिद्धार्थ जाधव बरोबर जो कोणी एकदा काम करतो त्याच्या पुढच्या प्रत्येक पिक्च्चरमध्ये सिद्धया असतोच.
हिंदी मध्ये रोहित शेट्टीचा सुद्धा तो आवडता कलाकार आहे. गोलमाल सिरीजनंतर “सिम्बा” पिक्चरमध्ये तो रणवीर सिंग बरोबर महत्वाच्या भूमिकेत दिसला. फक्त मराठी आणि हिंदी पिक्चरच नाही तर इंग्लिश पिक्चरमध्ये सुद्धा त्यानं काम केलंय. रियालिटी शो मध्ये स्टँड अप कॉमेडी करताना सुद्धा तो दिसतो.
त्याच्या कॉमेडी टायमिंग मूळ त्याच्यामधला वर्साटाईल नट मागे पडलाय. कॉमेडीयनचा शिक्का बसलेला सिद्धार्थने त्याची इमेज बदलायचा खूप प्रयत्न केला. पण टाईम प्लीज मधल्या हिम्मतराव सारख्या गडबड्या दोस्ताच्या भूमिकेतच लोकांना तो हवा असतो. फक्त पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यात सुद्धा सिद्धार्थ जाधव असाच जीवाला जीव देणारा दोस्त आहे .
हे ही वाच भिडू
- बनवाबनवी अजरामर करणारा हात.
- पुलं देशपांडेनी राम राम गंगाराम फेकून द्यायला सांगितला होता !
- गदिमांनी दो आंखे बारह हाथ बनवून औंधच्या राजाचे पांग फेडले !
- हे आठ पिक्चर आले आणि बाबूजी संस्कारक्षम पोरींचे पिताश्री झाले !