मुंबई पोलीस ग्रेट का आहेत, एका छोट्या पुराव्यावरून असा शोधलेला खूनी.. 

मुंबई पोलीसांच्या तपासकामांच कायम कौतुक होतं. अलीकडच्या अनेक प्रकरणांमध्ये मुंबई पोलीसांच नाव आल्याने त्यांच्यावर टिका देखील होते. पण एखादा तपास हातात घेणं आणि सुतावरून स्वर्ग गाठण्याचं काम फक्त मुंबई पोलीसच करु शकतात. 

अशीच एक केस, जी मुंबई पोलीसांच्या तपासकामातल्या इतिहासात कोरुन ठेवण्यासारखी आहे. 

ती तारिख होती २ डिसेंबर २०१९..

माहिमच्या किनाऱ्यावर एक सुटकेस वहात आलेली होती. सुटकेसमध्ये मानवी अंग दिसत होते. तिथे असणाऱ्या लोकांनी लगेच पोलीसांना फोन केला. पोलीस घटनास्थळावर पोहचले. सुटकेस उघडण्यात आली. त्या सुटकेसमध्ये एक हाताचा तुकडा आणि एक पायाचा तुकडा होता. सोबतच पुरुषाच्या लिंगाचा तुकडा देखील होता. किळसवाण्या पद्धतीने तुकडे करुन सुटकेसमध्ये ठेवण्यात आले होते.. 

पण पुरावा म्हणून काहीच नव्हतं. पोलीसांनी तात्काळ स्थानिक मच्छिमारांना बोलावून घेतलं. त्यांच्याकडून संपुर्ण परिसर पिंजून काढला. पण समुद्रात अजून काही मिळण्याची शक्यता नव्हती. पुढचे चार दिवस स्थानिक मच्छिमार समुद्रात अजून काही सापडतं का ते शोधत होते पण हाती काहीच सापडलं नाही..

एक सुटकेस, काही मानवी शरीराचे तुकडे इतकंच होतं.. 

आत्ता ही केस क्राईम ब्रॅन्चकडे सोपवण्यात आली. क्राईम ब्रॅन्चने मुंबई पोलीस स्टेशनमध्ये असणाऱ्या मिसिंग लोकांचा डेटा तपासण्यास सुरवात केली. पण संशय यावा अस काहीच हाती लागलं नाही. सुतावरून स्वर्ग गाठण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आली होती. त्यांनी पुन्हा ती सुटकेस पाहीली.

त्यात हातापायाचे तुकडे, मानवी लिंग व त्याचसोबत शर्टचा एक तुकडा… 

पोलीसांना वाटलं पण नव्हतं की हा शर्टचा हा तुकडा त्यांना खून्यापर्यन्त पोहचवू शकतो. या तुकड्यावर छोटासा टॅग होता. पोलीस तपासात हा टॅग मिस झाला होता. यावर एल्मो मेन्स वेअर इतकच लिहण्यात आलं होतं. पण ही गोष्ट देखील खुन्यापर्यन्त घेवून जाण्यासाठी पुरेसी आहे हा ठाम विश्वास पोलीसांना होता. 

पोलीसांनी मुंबईत कुठे एल्मो मेन्स वेअर आहे याची चौकशी सुरू केली. तेव्हा कुर्ला पश्चिम येथील बेलगामी रोडवर एल्मो मेन्स वेअरचं दुकान असल्याची माहिती मिळाली. पोलीस त्या दुकानात गेले. टेलरला कपड्याचा तुकडा दाखवण्यात आला. पण एका तुकड्यावरून तो कोणी शिवून घेतला होता हे सांगण अशक्य होतं… 

इथेच टेलर लोकांच्या एका गोष्टीची मदत झाली.. 

प्रत्येक टेलर कपडे शिवायला घेतल्यानंतर त्या कापडाचा एक तुकडा बिलाला स्टेपल करुन ठेवतो. इथलाही टेलर तेच करायचा. असंख्य बील शोधण्यात आली. यातून हवा असलेला तो कपडाचा तुकडा मिळाला. दोन्ही तुकडे मॅच होत होते. बिलावर नाव होतं बेनेट रिबेलो… 

पत्ता नाही की फोन नंबर नाही, फक्त बेनेट रिबेलो.. 

गिऱ्हाईक नेहमीचं नव्हतं. त्यातही बील जूनं होतं. टेलरला अधिकची माहिती, वर्णन काहीच सांगता आलं नाही. तपास फक्त नावापर्यन्त येवून थांबला होता. आत्ता पुढे काय. तेव्हा पोलीसांनी एक खडा मारला.

नाव वेगळं असल्यानं या नावाची जास्त माणसं मिळणं म्हणावं तितकं सोप्प नव्हतं. फेसबुकवर बेनेट रिबेलो नावाच्या प्रत्येक माणसाची प्रोफाईल पाहण्यास सुरवात करण्यात आली. मुंबईत असणारा बेनेट रिबेलो हा पसंतीक्रम होता. यातून ५० नावं शॉर्टलिस्ट करण्यात आली. त्यांच्या प्रोफाईल चाळण्यात येवू लागल्या… 

तेव्हा एक बेनेटो रिबेलो मिळाला. फेसबुकवरच्या फोटोत बेनेटो रिबेलोकडे पण तसाच शर्ट होता. हाच तुकडा असावा असा अंदाज बांधून फेसबुकवर त्यांची माहिती पोलीस शोधू लागले.. 

एका फोटोत बेनेटो रिबेलोचं आयडी कार्ड मिळालं. त्यावर पत्ता आणि फोन नंबर होता. फोन बंद लागत होता. पोलीस त्या पत्त्यावर पोहचले तर दरवाजा बंद. आजूबाजूला चौकशी करण्यात आली. तेव्हा पोलीसांना सांगण्यात आली की बेनेटो आणि त्याची मुलगी इथे रहात होती. पण काही महिन्यापासून दोघेही दिसले नाहीत. पोलीसांनी घराचा दरवाजा तोडला.

आतमधल्या प्रत्येक गोष्टीची तपासणी केली. यात एक वही पोलीसांच्या हाती लागली. त्यात लिहलं होतं… 

डॅड आय एम रियली सॉरी.. आय एम बॅड गर्ल… जिसने मुझे घरपे रहने दिया उसीको मेने मार दिया.. जिसने परवरीश कि उसी को मेने मार दिया… 

पोलीसांना घटनेचा उलगडा झाला होता. आत्ता बेनेट रिबेलोच्या मुलीला शोधणं हा टास्क होता. सोबत डोक्यात अनेक प्रश्न. पोलीसांनी आजूबाजूला चौकशी केली. तेव्हा त्यांना कळालं ही रिया ही बेनेटोची सख्खी मुलगी नव्हती. त्याने रस्त्यावर असणाऱ्या एका अनाथ मुलीला दत्तक घेतलं होतं. संपुर्ण कायदेशीर मार्गाने त्याने या मुलीला दत्तक घेतलं होतं. लहानपणापासून संभाळलेली मुलगी. रस्त्यावर अनाथ म्हणून भिक मागणारी एक लहान मुलगी. त्याने दत्तक घेवून संभाळली होती. अशा मुलीने त्याचाच खून करावा? तो ही इतक्या क्रुरपणे.. 

पोलीस आत्ता रियाला शोधू लागले. तिच्या फोनवरून तिचं लोकेशन मिळालं.

घाटकोपरच्या एका प्लॅटमध्ये ती रहात असल्याची माहिती मिळाली. पोलीस तिच्या घरी गेले तेव्हा तिनेच दरवाजा उघडला. समोर पोलीसांना पाहून भितीने ती थरथरू लागली. पोलीसांनी बेनेटो कुठे आहेत अशी विचारणा केली तेव्हा ती ते परदेशात गेले आहेत म्हणून सांगू लागली. 

दूसऱ्या क्षणाला पोलीसांनी तिनेच लिहलेली वहिच्या पानावरची वाक्य तिला दाखवली. तशी ती जोरजोरात रडू लागली… 

त्यानंतर सांगितलेली गोष्ट पोलीसांच्या अंगावर देखील काटा आणणारी होती. रिया ही १९ वर्षांची होती. ती १६ वर्षाच्या एका मुलाच्या प्रेमात पडली. दोघे भेटू लागले. त्यानंतर एक दिवस त्या मुलाजवळ आपल्या खाजगी गोष्टी रियाने शेअर केल्या. तीने सांगितलं की तिचे वडिल हे तिचे सख्खे वडील नाहीत. तिला दत्तक घेण्यात आलं आहे. पण फक्त इतकीच गोष्ट नव्हती. तर बेनेटो हा तिचं यौन शोषण करत होता. तिच्यासोबत संबंध ठेवत होता.. 

ही गोष्ट त्या मुलाला समजली तेव्हा तो रागाने लालबुंद झाला. काहीही करुन अशा माणसाला संपवून टाकलं पाहीजे अस त्यानं रियाला सांगितलं आणि दोघांनी मिळून बेनेटोला संपवण्याचा प्लॅन केला. 

२६ नोव्हेंबर या दिवशी बेनेटो घरी येण्यापूर्वीच १६ वर्षीय तो मुलगा बेनेटोच्या घरात येवून लपून बसला. त्यानंतर बेनेटो घरी आला. घरात रिया होतीच. बेनेटो आल्यानंतर रियाने त्याला विचारलं, 

मला दत्तक घेतलं एक वडिल म्हणून मी तुझ्याकडे बघायचे आणि तू माझचं शौषण केलंस.. 

हे ऐकल्या ऐकल्या बेनेटोच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ही मुलगी आत्ता बंड करुन उठेल म्हणून हातातलं गिटार घेवूनच तो तिला मारण्यासाठी पुढे गेला. तोच एका काठीने रियाने बेनेटोवर हल्ला करण्यात आला. तो मुलगा समोर आला आणि दोघांनी मिळून बेनेटोवर वार करण्यास सुरवात केली.. 

रक्तबंबाळ झालेला बेनेटो बेशुद्ध झाला. त्यानंतरही त्याचा श्वास सुरूच होता. घरातलं मच्छर मारण्याचा स्प्रे या दोघांनी त्याच्या तोंडावर मारण्यास सुरवात केली. संपुर्ण स्प्रे रिकामा केला. त्यानंतर त्याची बॉडी त्यांनी सरकवत सरकवत बाथरूममध्ये नेली. तिथे रात्रभर शरीरातलं रक्त वाहून दिलं. शरिरातलं संपुर्ण रक्त रिकामं झालं. 

बॉडी तशीच ठेवून दोघं मार्केटमध्ये गेले. तिथे तीन चार सुटकेस घेतल्या. आठदहा पॉलिथिनच्या बॅग घेण्यात आल्या. व चार धारधार चाकू घेतले. घरात येवून चाकूने बॉडीचे तुकडे करण्यास सुरवात केली. पण बॉडीचे तुकडे होत नव्हते.

तेव्हा या दोघांनी मिळून चाकू तापवून गरम करुन तुकडे कऱण्यास सुरवात केली. हाडांचा हातोड्यांनी चुरा करण्यात आला. त्यानंतर पुन्हा रक्त वाहून दिलं.. 

संपुर्ण शरीर सुकल्यानंतर त्यांनी तुकडे बॅगमध्ये भरले. व मिठी नदीच्या खाडीत वेगवेगळ्या भागात या सुटकेस टाकल्या. पण एका सुटकेसमध्ये रक्त शोषण्यासाठी ठेवलेला शर्ट तसाच राहिला होता. नेमकी तीच सुटकेस किनाऱ्यावर वाहत आली अन् पोलीसांना सापडली. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.