स्वतःला स्वीट आतंकवादी म्हणवणारे केजरीवाल खलिस्तानचं समर्थन करतायेत का ?

उत्तर प्रदेशच्या निवडणुका आल्या कि, जिन्ना हा वादग्रस्त टॉपिक बिळातून उंदीर बाहेर निघावा तसंच काहीसं आता पंजाबच्या निवडणुकांमध्ये मध्ये झालं आहे…आत्ता पंजाब मध्ये खलिस्तानचा मुद्दा प्रचंड प्रमाणात गाजतोय ..आणि यात तशी अनेक नाव घेता येतील जी या मुद्दयावरून चर्चेत आहेत. त्यातली काही म्हणजे कवी आणि आम आदमी पक्षाचे माजी नेते कुमार विश्वास आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल. 

तर विषय असा आहे कि, निवडणुका जवळ आल्या कि, नेत्यांचे एकमेकांवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू होतात. कुमार विश्वास यांचा एक व्हिडिओ समोर आला आणि ‘आप’ बॅकफूटवर आली होती, कुमार विश्वास यांनी केजरीवाल यांच्यावर आरोप केले कि, अरविंद केजरीवाल फुटिरतावाद्यांचे समर्थक होते. एक तर पंजाबचा मुख्यमंत्री बनेन किंवा एक स्वतंत्र खलिस्तान राष्ट्राचा पंतप्रधान बनेन, असे अरविंद केजरीवाल आपल्याला एकदा बोलले होते, असे कुमार विश्वास म्हणाले.  त्यांच्या या वक्तव्यानं पंजाबच्या राजकारणात मोठी खळबळ माजली होती. 

यानंतर अरविंद केजरीवाल देखील समोर आले आणि त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर उत्तर दिलं. तसेच कुमार विश्वास यांच्या या वक्तव्यामुळे आम आदमी पक्षाने त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

‘आप’च्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने व्हिडिओच्या प्रसारणावर बंदी घातली होती. मात्र तासाभरानंतरच ती बंदी काढण्यात आली होती. राज्याच्या अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी एका पत्रात राजकीय पक्षांना व्हिडिओ प्रसारित करू नये असे सांगितले होते. मात्र काही तासांनंतर हा आदेश मागे घेण्यात आला…पण यामुळे 

कुमार विश्वास यांचे केजरीवाल यांच्यावर काय आरोप आहेत ? 

कुमार विश्वास म्हणाले, “सत्तेत राहण्यासाठी केजरीवाल काहीही करू शकतात. मी २०१७ च्या पंजाब निवडणुकीदरम्यान केजरीवाल यांना म्हणलो होतो कि, फुटिरतावादी आणि खलिस्तानवादी संघटनांसोबत असलेल्या लोकांना सोबत घेऊ नका. तेंव्हा केजरीवाल मला म्हणाले होते की, असं काही होणार नाही, तू चिंता करू नको.. ‘ मुख्यमंत्री कसे बनणार, याचा फॉर्म्युलाही अरविंद केजरीवाल यांनी सांगितल्याचे कुमार विश्वास म्हणाले. भगवंत कौर यांना निवडणूक लढवायला लावणार आणि मी तिथे पोहोचेन, असा फॉर्म्युला त्यांनी सांगितला होता. आजही अरविंद केजरीवाल त्याच मार्गावर आहेत. कुणी मान्य करो अथवा न करो, ते एखादा बाहुला बसवतील आणि काहीही करतील… त्यांनी माझ्याशी एवढ्या भयंकर गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या पंजाबमधल्या बहुतांश जनतेला माहिती आहेत.”

कुमार विश्वास यांनी असाही गौप्यस्फोट केलेला कि, 

‘ एक दिवस अरविंद केजरीवाल मला म्हणाले, तू चिंता नको करू. मी एक तर पंजाब सुभ्याचा मुख्यमंत्री बनेन. मी म्हणालो, हा अलगाव वाद २०२० चा रेफरंडम येतोय, सगळं आयएसआयपासून सगळे फुटिरतावादी याला फंडिंग करत आहेत. तर ते मला म्हणाले तर मग काय होईल, मी स्वतंत्र देशाचा पहिला पंतप्रधान बनेन. या माणसाच्या विचार प्रक्रियेतच खूप फुटिरतावाद भरला आहे. मला सत्ता मिळाली पाहिजे, अशीच त्यांची इच्छा आहे,’ असे आरोप कुमार विश्वास यांनी केले.

त्यानंतर या वादात काँग्रेस नेते राहुल गांधींनी देखील उडी मारली..तसं आधी देखील राहुल गांधींनी केजरीवाल यांच्यावर असेच आरोप केलेले. पंजाबामधील एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले होते, पंजाबमध्ये एक स्थिर सरकार आले पाहिजे. कोणत्याही दहशतवाद्याच्या घरी काँग्रेस नेता सापडणार नाहीत. मात्र झाडूचे सर्वात मोठे नेते (अरविंद केजरीवाल) तेथे असतात. पंजाबला खूप मोठा धोका आहे”.

यापूर्वी, शीख फॉर जस्टिसचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत होते, ज्यात दावा केला होता की शीख फॉर जस्टिसने पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला सत्ता आणण्यासाठी पाठिंबा दिला आहे. यासोबतच भगवंत मान यांना ‘आप’चा मुख्यमंत्री बनवण्यासाठी संघटनेनेही पाठिंबा दिल्याचा दावा केला जात आहे. 

होणाऱ्या आरोपानंतर केजरीवाल यांनी मौन सोडलं अन पत्रकार परिषद घेऊन आरोपांना उत्तरं दिली..

ते म्हणाले की कुमार विश्वास हे एक हास्यकवी आहेत, ते काहीही बोलू शकतात. पण पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांनी त्यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेतलीये.

तसेच पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांनी ट्विट केले की मी आदरणीय नरेंद्र मोदींना विनंती करतो की त्यांनी डॉ. कुमार विश्वास यांच्या व्हिडिओ प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचे आदेश द्यावेत. या प्रकरणात राजकारण होता कामा नये. पंजाबमधील जनतेने फुटीरतावादाशी लढताना मोठी किंमत मोजली आहे. माननीय पंतप्रधानांनी प्रत्येक पंजाबीच्या चिंतेकडे लक्ष देण्याची गरज आहे….

अरविंद केजरीवाल म्हणाले, ‘मोदीजी, प्रियंका गांधी, राहुल गांधी हे सगळेच म्हणत आहेत की, गेल्या १० वर्षांपासून केजरीवाल देशाचे दोन तुकडे करण्याचा विचार करत आहेत आणि त्यांना एका तुकड्याचे पंतप्रधान व्हायचे आहे. हे असं खरंच असू शकते का ? हा मोठा विनोद आहे, याचा अर्थ मी मोठा दहशतवादी झालो आहे. १० वर्षात ३ वर्षे कॉंग्रेसचे सरकार होतं, ७ वर्षे भाजपचे सरकार होतं. इतक्या वर्षांत त्यांनी मला अटक का केली नाही? त्यांची सुरक्षा एजन्सी काय करत होती आणि हे लोक झोपले होते का?  याचा एक क्रम आहे, आधी राहुल गांधी म्हणाले मग पंतप्रधान, प्रियंका गांधी, सुखबीर बादल. पंतप्रधानही राहुल गांधींची नक्कल करतील, असे वाटले नव्हतं. 

याचा अर्थ कदाचित मी जगातील पहिला सर्वात गोड दहशतवादी आहेजो लोकांसाठी शाळा, रस्ते, रुग्णालये बांधतो आणि मोफत वीज देतो. पण आम्हाला विरोध करण्यासाठी सगळे भ्रष्टाचारी एकत्र आलेत. इंग्रज देखील भगतसिंगांना घाबरायचे. त्यामुळे त्यांना दहशतवादी म्हटले गेले. मी भगतसिंग यांचा शिष्य आहे.

‘पंजाब विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. ७० वर्षांपासून सर्वच पक्षांनी पंजाबला लुटले, मुलांना बेरोजगार केले. तसेच पंजाबवर ३ लाख कोटींचे कर्ज असल्याचंही त्यांनी सांगितलं.  या पैशानं शाळा बांधली नाही, दवाखाना बांधला नाही, कॉलेज बनवले नाही, काम केले नाही मग हा पैसा गेला कुठे?

दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले, ‘पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत यावेळी आम आदमी पार्टी (आप) आली आहे. या भीतीने सर्व भ्रष्टाचारी जमा झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून आम आदमी पार्टीचा पराभव करण्यासाठी काँग्रेस, भाजप, अकाली दल या सर्वांनी एकत्र येऊन काम सुरू केले आहे. सगळे एकच भाषा बोलत आहेत. 

केजरीवाल म्हणाले, ‘गेले काही दिवस सर मोदीजी, राहुल गांधी, कॅप्टन अमरिंदर सिंग. चरणजित सिंग चन्नी आणि सुखबीर सिंग बादल हे सगळे जमले आहेत. त्यांना भगवंत मान यांना मुख्यमंत्री होण्यापासून रोखायचे आहे. ते पुढे म्हणाले, ‘असे दिसते की प्रत्येकजण रात्री बसतो आणि कॉन्फरन्स कॉल करतो की फक्त एकच भाषा बोलली पाहिजे. हे लोक एकमेकांविरुद्ध बोलत नाहीत, फक्त शिव्या देतात.

अशा प्रकारे हे सगळे आरोप करत त्यांनी लागलीच आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली, ते म्हणाले कि,  संपूर्ण यंत्रणा आपल्या विरोधात उभी आहे पण आम्ही दिल्लीप्रमाणे पंजाबमध्ये काम करू असाही ते म्हणाले पण त्यांच्यावर होत असलेले आरोपांचा अर्थ काय ? कुमार विश्वास यांच्या आरोपांनंतर प्रत्येक राजकीय पक्ष नेते केजरीवाल यांच्यावर टीका करतांना दिसतायेत. त्यामुळे याचे काय परिणाम होतील ते  निवडणुकांच्या निकालांमध्ये दिसतीलच…

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.