द्रविडनंच पहिल्यांदा ओळखलं होत पुजारा आपला वारसदार होणार !

आजच्या ऑस्ट्रेलियामधल्या फायनल कसोटीमध्ये शुभमन गिल आणि रिषभ पंत यांनी ठोकलेल्या जोरदार ९१ आणि ८९ धावांमुळे आपला ऐतिहासिक विजय साकार होऊ शकला. मात्र त्यांच्या या डॅशिंग इनिंग सोबतच एका बाजूला पुजारा नांगर टाकून उभा होता, त्याने २११ बॉलमध्ये काढलेल्या ५६ धावांचे महत्व देखील तितकेच आहे. 

गिल आणि पंत यांचं तुफान कौतुक होईल पण पुजाराची हि इनिंग दुर्लक्षित राहील. पण त्याचं त्याला वाईट नाही वाटणार कारण तो दुसरा द्रविडचं आहे. मैदानावर आणि मैदानाबाहेर देखील.

साल होत २००६. बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर कॉर्पोरेट क्रिकेट टूर्नामेंट सुरु होती. इंडियन ऑईलची बॅटिंग सुरु होती. त्यावेळचा भारतीय संघाचा कॅप्टन राहुल द्रविड ग्राउंडवर जॉगिंगसाठी आला होता.

मैदानाला फेऱ्या मारता मारता त्याचं लक्ष चालू असलेल्या मॅचवर होत. एका बॅटसमनकडे त्याचं राहून राहून लक्ष जात होत. तो बॅटसमन अतिशय एकाग्र चित्ताने खेळत होता. एकही चेंडू तो हवेत मारत नव्हता, त्याचा डिफेन्स अफलातून होता. खराब बॉलला बरोबर गॅपमधून दिशा देत होता. बॉलर त्याच्या बॅटिंगला वैतागले होते.

मॅच द्रविडच्या होम ग्राउंडवर सुरु होती त्यामुळे तिथे सगळे त्याच्या ओळखीचे होते. त्याने स्कोरर ला त्या बॅट्समनचे नाव विचारले. स्कोररने आज्ञाधारक पणे सांगितले,

“चेतेश्वर पुजारा. ६७ धावा, १३० बॉल.”

द्रविडने कोणाला तरी विचारले की हा कोणत्या रणजी संघासाठी खेळतो? उत्तर मिळालं, सौराष्ट्र. द्रविडने लगेचच ग्राउंडवरून सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांना निरंजन शहांना फोन केला. निरंजन शहांना कळेना भारतीय कॅप्टनला काय बोलायचं आहे? द्रविड त्यांना म्हणाला,

” तुमच्या रणजी टीम मध्ये एक खेळाडू आहे, चेतेश्वर पुजारा. आजकाल दुर्मिळ अशी तंत्रशुद्ध फलंदाजी तो करतो. तो भारताचा भविष्यकाळ आहे. त्याची योग्य ती काळजी घ्या.”

राहुल द्रविडला माहित होत की आजकालच्या क्रिकेटमध्ये सिक्स मारणाऱ्या स्टार बॅटसमनची चलती आहे. इथे तंत्राला किंमत नाही. यामुळे चेतेश्वर पुजारा हा बाकीच्याच्या तुलनेत दुर्लक्षिला जाणार अथवा राजकारणाचा भाग होणार. स्वतः राहुल द्रविडला यातून जावे लागले होते. त्यामुळे त्याने आधीच सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला तंबी देऊन ठेवली.

परत एकदा जेव्हा रणजी खेळायला तो राजकोटला गेला. तेव्हा पुजारा बॅटिंगसाठी ५व्या क्रमांकावर खेळत होता. द्रविडने सौराष्ट्रच्या कॅप्टनला सांगितल पुजाराला वरच्या क्रमांकावर खेळवा.

जेव्हा पुजाराला कोणीच ओळखत नव्हत तेव्हा राहुल द्रविडला कळाल होत हाच आपला वारसदार असणार आहे.

चेतेश्वर पुजारा तेव्हा अठरा वर्षाचा होता. इंडियन ऑईलने उदयोन्मुख खेळाडूना स्कॉलरशिपची योजना केली होती त्यात पुजाराचा समावेश होता. त्याच वर्षी त्याची निवड १९ वर्षाखालील खेळाडूंच्या विश्वकपसाठी भारतीय संघात झाली.

पुजाराने द्रविडचा विश्वास सार्थ ठरवला. त्याने या अंडर नाईनटीन वर्ल्डकप मध्ये तीन अर्धशतक आणि एक शतक मारून सर्वाधिक रना काढल्या. तो मालिकावीर ठरला.

चेतेश्वर पुजारा आज भारतीय कसोटी संघाचा आधारस्तंभ आहे. ऑस्ट्रेलियाच्या पिचवर जेव्हा बाकीचे खेळाडू स्वस्तात परतत होते तेव्हा तो पुजारा नांगी टाकून उभा होता. एका सामन्यात तर त्याने सर्वात जास्त चेंडू खेळण्याचा विक्रम गावस्कर यांचा विक्रम मोडला.

पुजाराच्या तंत्रशुद्ध फलंदाजीमुळे भारतीय संघाला पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन भूमीवर कसोटी मालिकेत विजय मिळवता आला.

द्रविड हा खऱ्या अर्थाने पुजाराचा गुरु आहे. आजही कधी पुजारा फॉर्म मधून बाहेर गेला तर तो सल्ल्यासाठी प्रथम राहुलला गाठतो. दोघांच्याही क्रिकेट कारकिर्दीकडे पहिले तर दोघांचाही प्रवास अगदी समान पद्धतीने झाला आहे. द्रविडला आणि पुजाराला कसोटी क्रिकेटमध्ये ३०००, ४००० आणि ५००० धावांचे टप्पे गाठायला अगदी सेम इनिंग लागल्या. अतिशय कमाल योगायोग जुळून आलाय.

तंत्राच्या बाबतीत सुनील गावस्कर आणि राहुल द्रविड यांच्या परंपरेत बसणारा पुजारा हा त्याच्या मैदानाबाहेरच्या वर्तनात सुद्धा द्रविडचीच फोटो कॉपी आहे. अतिशय संयमी मितभाषी असलेला पुजारा कधीच कोणत्या वादात अडकत नाही. बाकीचे खेळाडू आयपीएल ट्वेंटीट्वेंटीच्या पैशाच्या झगमगाटामागे धावत असताना आपले बेसिक तंत्र पक्के करण्यात पुजारा व्यस्त असतो.

आयपीएलमुळे क्रिकेट हा खेळापेक्षा मनोरंजन बनत चालला असताना चेतेश्वर पुजारासारखे खेळाडू हे क्रिकेटसाठी शेवटचे आशास्थान उरले आहेत.

हे ही वाचा भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.