२०१९ पासून १३ राज्यांच्या निवडणूका झाल्यात, प्रत्येक निकालानंतर कॉंग्रेस संपतानाच दिसतेय..

पंजाबमध्ये कॉंग्रेसची सत्ता होती. तिथे आप आले. ते देखील प्रचंड बहुमताने. युपीत भाजपने गड राखला. कधीकाळी युपीत कॉंग्रेसच्या ३०० च्या वर जागा असायच्या. आत्ता तिथे १ जागेवर कॉंग्रेसचा कार्यक्रम झाला आहे. गोव्यात कॉंग्रेस १२ जागांवर आटोपल आहे. उत्तराखंडमध्ये कॉंग्रेस १८ जागांवर आहे. मणिपूरमध्ये कॉंग्रेस ५ जागांवर आहे…

५ राज्यांच्या निवडणूकांमध्ये ४ राज्यात भाजपची सत्ता आलेय तर एका राज्यात आप ने डाव साधला आहे. या ५ राज्यांपैकी ५ ही राज्यात कॉंग्रेस कधीनाकधी १ नंबरचा पक्ष राहिलेला आहे. आज मात्र ते चित्र नाही..

कविवर्य संदीप-सलील यांच एक कविता आहे, “कंटाळ्याचा देखील आत्ता कंटाळा येतो” तस काम कॉंग्रेसचं झालं आहे. कॉंग्रेसच्या पराभवाची कारणे आत्ता कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना देखील शोधू वाटत नाहीत. तर आपण कशाला या कारणांवर लेख लिहून वेळ घालवा.

असो म्हणूनच आम्ही जरा वेगळा विषय निवडला. विषय असा आहे की २०१९ च्या लोकसभेनंतर किती राज्यांच्या निवडणूका झाल्या आणि यात किती राज्यात कॉंग्रेसचा विजय झाला..

२०१९ साली देशात पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत आले. याच वर्षी देशभरातील एकूण ६ राज्यांमध्ये निवडणूका झाल्या. या सहा राज्यांपैकी कॉंग्रेसचा कोणकोणत्या राज्यात विजय झाला आणि कोणकोणत्या राज्यात पराभव झाला ते पाहू.

१) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ 

महाराष्ट्रात २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादी आणि शिवसेना – भाजप एकत्र निवडणूक लढविल्या होता. त्यात भाजपला सर्वाधिक १०५, शिवसेनेला ५६, राष्ट्रवादी काँग्रेसला ५४ तर काँग्रेला ४४ जागा मिळाल्या होत्या.

महाराष्ट्रात काँग्रेसचा इतिहास इतका भक्कम असतांना देखील या निवडणुकीत काँग्रेसला सर्वात कमी जागा मिळाल्या होत्या. मात्र भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्याने राज्यात महविकास आघाडी स्थापन झाली आणि काँग्रेसला सत्तेत वाटा मिळाला. 

२) ओडिसा विधानसभा निवडणूक २०१९ 

मोदींच्या लाटेतही ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी राज्यातील आपली सत्ता कायम राखली.

एकूण १४७ जागांपैकी ११२ जागा बिजू जनता दलाने स्वबळावर जिंकल्या, बिजू जनता दलाचे अध्यक्ष नवीन पटनायक हे ओडिशाचे सलग पाचव्यांदा मुख्यमंत्री बनले. तर २३ जागा जिंकून भाजप दोन नंबरला तर काँग्रेस फक्त ९ जागा जिंकत तीन नंबरला आहे. त्या आधीच्या विधानसभा निवडणुकीत इथे काँग्रेसला १६ जागा मिळाल्या होत्या आणि काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष होता. 

२००० सालापासून इथे सलग बिजू जनता दलाचं सरकार आहे. येथील काँग्रेसची सत्ता पाहिली तर, १९४७ ते १९६७, १९७१ ते १९७७, १९८० ते १९९०, १९९५ ते २००० असा काँग्रेसचा कार्यकाळ राहिला आहे. पण २००० नंतर मात्र काँग्रेस इथे सत्ता स्थापन करू शकलं नाही.

३) अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणूक २०१९

२०१९ च्या लोकसभेत यश मिळवणाऱ्या भाजपने अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीतही एकूण ६० जागांपैकी ४२ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला आणि पेमा खांडू यांनी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर काँग्रेसने फक्त ४ जागा जिंकल्या होत्या. 

आता येथील काँग्रेसच्या सत्तेचं रेकॉर्ड पाहिलं तर, १९८० ते २००३,  २००७ ते २०१६ असा दीर्घकाळ काँग्रेस सत्तेवर होती पण २०१९ च्या निवडणुकीनंतर इथे भाजप सत्तेवर आली.

४) सिक्कीम विधानसभा निवडणूक २०१९

एकूण ३२ जागा असलेल्या सिक्कीम विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंट व विरोधी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा मध्ये थेट लढत होती. दोन्ही पक्षांना प्रत्येकी १६ जागा मिळाल्या होत्या.  

२४ जागा लढलेल्या काँग्रेसला एकही जागा जिंकून आणता आली नाही, थोडक्यात सिक्कीमच्या राजकीय इतिहासात १९७४ ते १९७९ दरम्यान सिक्कीम नॅशनल काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे मिळून सत्ता स्थापन केली होती. २०१९ च्या आधी एसडीएफ प्रमुख पवन चामलिंग यांच्या नेतृत्वात सलग २४ वर्षे इथे सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंटची सत्ता होती.

५) झारखंड विधानसभा निवडणूक २०१९

झारखंडमधील एकूण ८१ जागांपैकी झारखंड मुक्ती मोर्चाने ३० जागा, भाजपने २५ आणि काँग्रेसने १६ जागा जिंकल्या होत्या. या विधानसभा निवडणुकीत हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वात झामुमो-कॉंग्रेस-आरजेडी या आघाडीने स्पष्ट बहुमताने जिंकली आणि हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

या आघाडीमुळे काँग्रेस झारखंडमधील सरकारचा पहिल्यांदाच भाग बनू शकली कारण याआधी इथे काँग्रेस कधीच सत्तेत नव्हती.

६) हरयाणा विधानसभा निवडणूक २०१९ 

हरयाणामध्ये २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेचा प्रभाव होता कारण या दोन्ही विधानसभा निवडणुकीत भाजपने बाजी मारली. यात भाजपने ४०, माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुड्डा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने ३१, दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पक्षाने १० जागा जिंकल्या होत्या. इथे २००५ आणि २००९ अशा दोन विधानसभा निवडणूकीमध्ये काँग्रेसने बाजी मारली होती.

त्यानंतर कोरोना आला. २०२०-२१ साली पुढील राज्यांच्या निवडणूका पार पडल्या. यामध्ये पहिल्या क्रमांकाचे राज्य येते ते पश्चिम बंगाल.

 

७) पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

या  विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यातल्या एकूण २८८ जागांपैकी २१३ जागांवर तृणमूलने दणक्यात विजय मिळवला होता. तर भाजपने २९१ जागा लढवल्या होत्या आणि ७७ जागांवर भाजप पक्ष निवडून आला होता.

या निकालामध्ये सर्वात वाईट म्हणजे काँग्रेसने या निवडणुकीत ७७ जागांवर उमेदवार उभे केले होते पण काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नव्हती. थोडक्यात बंगालमध्ये काँग्रेसचा सफाया झाला. 

बंगालच्या राजकीय इतिहासात डोकावलं तर, पश्चिम  बंगालमध्ये १९७२ ते १९७७ काँग्रेचे सरकार होते. काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर राय हे होते. १९७७ ते २०११ या दीर्घ काळात पश्चिम बंगाल मध्ये कम्युनिस्ट पक्षाची सत्ता होती. २०१६ पासून ममता बॅनर्जी काँग्रेस, कम्युनिस्ट पक्षाला बाजूला करून सत्तेत आहे. 

८) केरळ विधानसभा निवडणूक २०२१ 

२०२१ च्या केरळ विधानसभा निवडणुकांमध्ये एकूण १४० जागांपैकी काँग्रेसने १०८ जागा लढवल्या होत्या, त्यात पक्षाला २१ च जागा जिंकता आल्या होत्या. राहुल गांधी केरळ मधील वायनाड लोकसभा मतदार संघाचं प्रतिनिधित्व करतात, आणि याच जोरावर काँग्रेसने केरळची निवडणूक लढवली होती त्यामुळे इथे काँग्रेस निवडून येईल अशी अपेक्षा होती. तसेच प्रचारसभा, रॅली मध्ये राहुल गांधी बरेच सक्रिय होते पण त्याचा सकारात्मक परिणाम निकालांमध्ये दिसून आला नाही. 

आणखी एक मुद्दा म्हणजे, केरळचा राजकीय इतिहास पाहायला गेलं तर इथे दर ५ वर्षांनी सत्ता बदल होत राहतात, त्यानुसार इथे काँग्रेस यायला पाहिजे होती असा अंदाज होता पण ते शक्य झालं नाही. 

९) आसाम विधानसभा निवडणूक २०२१ 

आसाम विधानसभा निवडणुकीत, राज्यातील एकूण १२६ जागांपैकी काँग्रेसने ९५ जागा लढवल्या होत्या, त्यातून काँग्रेसला फक्त २९ जागा जिंकता आल्या. काँग्रेस पक्ष त्याच्या आधी सलग २ टर्म पासून सत्तेपासून लांब होता. या विधानसभेच्या निवडणुकीत तरी काँग्रेसला निवडून यायची आशा होती पण ते काही शक्य झालं नाही. 

या दरम्यान सीएए कायद्याचा मुद्दा चांगलाच पेटला होता. आणि नेमका हाच मुद्दा उचलून धरला, त्यात आसामच्या नागरिकांनी देखील सीएए कायद्याला जोरदार विरोध केला होता. आसाममध्ये प्रचंड आंदोलनही झाली होती. 

याचाच फायदा या निवडणुकीत काँग्रेसने सीएए हा मोठा मुद्दा केला पण निकालांवर त्याचा फारसा परिणाम झाला नाही हे दिसून आलं. कारण या निवडणुकीचा निकाल पाहिला तर भाजपने ९३ जागा लढवल्या आणि ६० वर विजय मिळवला होता. 

१०) तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१

जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर झालेली पहिलीच विधानसभा निवडणुक होती. या निवडणुकीत एकूण २३४ जागा पैकी काँग्रेसने १८ जागा जिंकल्या होत्या. इथे काँग्रेस डीएमकेच्या नेतृत्वाखाली लढली. मागच्या निवडणुकीपेक्षा १० जागा जास्त जिंकून आणल्या. पण इथे डीएमकेच्या जिंकून येण्याचे श्रेय पूर्णतः स्टॅलिन यांच्या नावाने आहे. 

येथील इतिहास पाहिला तर तामिळनाडूमध्ये १९६७ पासूनच काँग्रेसचे वाईट दिवस चालू झाले. याच साली काँग्रेसची सत्ता गेली. आणि त्यानंतर कित्येक दशके झालीत तरी काँग्रेसला स्वबळावर बहुमत घेता येत नाहीये. त्या अर्थाने काँग्रेस चौकटीच्या बाहेर गेलेले तामिळनाडू हे पहिले राज्य म्हणलं जातं. 

११) पॉण्डेचेरी विधानसभा निवडणूक २०२१ 

एकूण ३० जागा पैकी काँग्रेसने १४ जागा लढवल्या होत्या अन त्यात २ जागा काँग्रेसला जिंकता आल्या. मागच्या टर्म मध्ये काँग्रेसची सत्ता होती. ऑल इंडिया एनआर काँग्रेस अर्थात AINRC आणि भाजप या दोघांची मिळून सत्ता स्थापन केली. AINRCचे अध्यक्ष एन रंगास्वामी हे मुख्यमंत्री आहेत. 

येथील काँग्रेसच्या सत्तेचं रेकॉर्ड बघता, काँग्रेस १९६३, १९६४, १९६७, १९६८ पर्यंत सलग सत्तेत होती. त्यानंतर १९६९ मध्ये डीएमके सत्तेत आली. त्यानंतर थेट १९८५ ते १९९०, १९९१ ते १९९६, आणि त्यानंतर २००० ते २००८ अशी दीर्घकाळ काँग्रेस सत्तेवर होती. त्यानंतर २०१६ ते २०२१ पर्यंत पॉण्डेचेरी मध्ये काँग्रेसची सत्ता होती त्यानंतर २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराजय झाला. 

पण एकंदरीत पॉण्डेचेरी मधील काँग्रेसच्या सत्तेचा दीर्घ कार्यकाळ बघता २०२१ च्या विधानसभेत केवळ २ जागा काँग्रेस जिंकतंय याचा अर्थ पॉण्डेचेरी मध्ये काँग्रेस सपशेल संपली म्हणायला वाव आहे. 

१२) बिहार विधानसभा निवडणूक २०२०   

२०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीत एकूण २४३ जागांपैकी काँग्रेस ७० जागांवर लढली. त्यात पक्षाला १९ जागांवर विजय मिळवता आला. मागच्या निवडणुकीमधील जिंकलेल्या जागांची आकडेवारी पहिली तर लक्षात येते की, काँग्रेसला २०२० च्या विधानसभेत ९ जागा कमी जिंकता आल्या.

या निकालानंतर आरजेडीने सत्ता स्थापनेचा हुकलेल्या संधीचं खापर काँग्रेसवर फोडलं होतं. कारण आरजेडीचे नेते उघड उघड म्हणत होते कि, काँग्रेसच्या अपयशामुळेच आम्ही मागे पडलो,   आरजेडी सत्ता स्थापनेच्या जवळ आली असती मात्र काँग्रेसचा पाठिंबा नसल्यामुळे त्यांना सत्तेचा आकडा पार करता आला नव्हता. 

१३) दिल्ली विधानसभा निवडणूक २०२० 

२०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत एकूण ७० जागांपैकी आप ने ६३ जागा जिंकत पुन्हा सत्ता स्थापन केली होती.  तर काँग्रेसने ६६ जागा लढवल्या होत्या पण एकाही जागेवर काँग्रेसला यश मिळवता आलं नव्हतं. तर भाजपानं सात जागांवर विजय मिळवला होता. या निवडणुकीत दिल्लीकरांनी सलग तिसऱ्यांदा ‘आप’ला सत्तेच्या खुर्चीवर बसवलं.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.