एका रात्रीत तेलगीने जिच्यावर ९७ लाख उधळले, ती तरन्नूम आज काय करते माहितीय का..?

२००५-०६ चा काळ होता. नुकतेच मल्टिमिडीया फोन बाजारात येत होते. ४ रुपयेला एक व्हिडीओ या दराने मेमरी कार्ड भरून दिलं जायचं. चौकाचौकात मोबाईलची दुकानं निघाली होती. माणसं गाणी भरायची, पाहीजे ते व्हिडीओ घ्यायचे. आणि एक प्रश्न खाजगीत विचारायचे,

तरन्नूमचा फोटो आहे का? 

ब्लुटूथ आणि इन्फ्रारेडवरुन तरन्नूमचा फोटो शेअर होत राहिला. नंतर कळालं ती तरन्नूम नव्हती. ती साऊथमधली हिरोईन तम्मना भाटिया होती. अस हि ऐकण्यात आलं की तम्मना भाटियाला देखील या गोष्टीचा त्रास झाला. तिने पोलीस केस देखील केली होती. पण कारवाई करणार कोणावर हा प्रश्न होता. 

इतकं काय होतं तरन्नूममध्ये..? 

तर ती बातमी. तरन्नूम खान या बारबालावर तेलगीने एका रात्रीत ९७ लाख रुपये उधळले होते. तरन्नूमचे श्रीलंकन क्रिकेट सोबतच बॉलिवूडसोबत संबध होते. दिपा बारमध्ये नाचणारी तरन्नूम नाचायला सुरवात करताच तिच्यावर पैशांचा वर्षाव होतं असे. काही मिनटात उधळलेल्या पैशाची रक्कम लाखात जात असायची. तरन्नूमचा वर्सोव्यात बंगला होता. ती नाचायला फोर व्हिलरमधून यायची.

एकामागून एक भारतातल्या सर्वात हाय प्रोफाईल बारबालेविषयी जोडलेल्या गोष्टी. यातल्या किती खऱ्या किती खोट्या हे तिलाच माहिती पण एक गोष्ट मात्र निर्विवाद सत्य होती ती म्हणजे, बॉलिवूडच्या एका हिरोईनपेक्षा अधिक जास्त तिची क्रेझ होती.

तिची एक झलक मिळण्यासाठी मोठमोठ्ठे धनिक दिपा बारमध्ये गर्दी करायचे. 

तरन्नूम खान अस तिच पुर्ण नाव. सायन परिसरात ती रहायला होती. ती लहान असताना मुंबईत हिंदू मुस्लीम दंगल झाली होती. यात तिला वडिलांसोबत राहत घर सोडावं लागलं होतं. दंगलीच्या झटक्यातच तिच्या वडिलांच निधन झालं होतं आणि संपुर्ण कुटूंब रस्त्यावर आलं होतं. 

घरची परिस्थिती हलाखीची झाली आणि वयाच्या १५-१६ व्या वर्षी तरन्नूम खान बारमध्ये नाचू लागली. डान्सबार म्हणून तिच नाव झालं. तिची अदा पाहून तिला दुबईवरुन बोलावणं येवू लागलं. लोक सांगतात याच काळात ती सर्वात महागडी बारगर्ल म्हणून लोकांना माहिती झाली. 

एकामागोमाग येणाऱ्या पैशातून तरन्नूमने वर्सोव्यात एक बंगला खरेदी केला.

तनिष्क अस त्या बंगल्याच नाव. चारचाकी घेतली. एका रात्रीत ती लाखोंने पैस कमावू लागली. दिपा बारमध्ये फक्त तरन्नूमला पाहण्यासाठी बॉलिवडूचे अभिनेते येवू लागले. क्रिकेटर, सेलिब्रिटी अशा कित्येकांची लाईन लागलेली असायची. अशातच तेलगी देखील होता. तेलगीला अटक करण्यात आल्यानंतर आपण तरन्नूमवर एका रात्रीत ९७ लाख उधळल्याची कबुली त्याने दिली होती. 

याच दरम्यान २००५ च्या मार्च महिन्यात तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी डान्सबार बंदीचा निर्णय मांडला होता. १५ ऑगस्टपर्यन्त मुंबईतील सर्व डान्सबार बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. यावेळी भल्याभल्या डान्सबार मुली या व्यवसायातून बाहेर जावू लागल्या. 

२००५ च्या अखेरीच इन्कम टॅक्स डिपार्टमेंन्टने एका बंगल्यावर धाड टाकली. 

तनिष्क, वर्सोवा. तरन्नूमच्या बंगल्यावर धाड टाकल्यानंतर विशेष अस घबाड पोलिसांच्या हाती लागल नाही. तिच्याकडे २२ लाखांची रोख रक्कम होती, ८ लाखांचे दागिणे होते.  CA नी माहिती न दिल्यामुळे मला रिटर्न्स भरण्याची माहिती मिळाली नाही अस तरन्नूमने सांगितलं. 

इथवर प्रकरण ठिक होतं पण तरन्नूम अडकली ती तिच्या फोन कॉल्समुळे.

चौकशी केल्यानंतर आदित्य पांचोली, मुथय्या मुरलीधरन, जगदीश सोढा, शोभन मेहता, प्रदिपकुमार, मिलींद धीरज अशा अनेकांची नावे समोर आली. याच  दरम्यान तेलगीच्या तोंडातून देखील तिच नाव बाहेर आलं आणि तरन्नूमची केस इन्कमटॅक्स डिपोर्टमेंट कडून मुंबई पोलीसांकडे गेली. 

२० ऑगस्ट २००५ रोजी आस्ट्रेलिया इंग्लडमध्ये झालेल्या क्रिकेट सामन्यात तीन बेटिंग केलं होतं आणि यातून तीला ३० लाख रुपये मिळणार होते हा आरोप सिद्ध करण्याइतपत पुरावे पोलिसांनी गोळा केले. याच तपासात मुथय्या मुरलीधरन आणि आदित्य पांचोलीच नाव समोर आलं. 

चौकशीदरम्यान मुरलीधरन ने सांगितलं की, आदित्य पांचोली त्याला तरन्नूमचा डान्स पाहण्यासाठी दिपा बारमध्ये घेवून आला होता.

पण पोलीसांना मॅच फिक्सिंगचा संशय होता. मुलरीधरन ने तो नाकारला. तरन्नूम सोबत ओळख होती पण कोणत्याही प्रकारे सट्टाबाजी करणाऱ्या लोकांसोबत मुरलीधरचे संबध नसल्याचं चौकशीत पुढे आलं. तरन्नूमचे सट्टेबाजांसोबत संबध होते इतकच सिद्ध झालं. दूसरीकडे आपल्याकडे असणाऱ्या संपत्तीबद्दल ती म्हणाली, वर्सोवातला बंगला तर तीने २७ लाखांना घेतला आहे. 

सप्टेंबर २००५ ला अटक करुन तिला भायखळ्याच्या जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. तेव्हा तिची ओळख प्रिती जैन हिच्यासोबत झाली. प्रिती जैनने मधुर भांडारकर यांनी बलात्कारा केला असा आरोप केला होता. पुढे मधुर भांडारकर यांना मारण्यासाठी तिने अरुण गवळीला सुपारी दिल्याच्या आरोपावरुन तिला अटक करण्यात आली होती. या दोघी जेलमध्ये मैत्रिणी झाल्या. आपल्या मैत्रीसाठी प्रिती जैनने दिपा की तरन्नूम नावाचा सिनेमा केला. 

संबध स्पष्ट न झाल्याने हळुहळु प्रकरण शांत झालं. आत्ता तरन्नूमच नाव कोणीच घेत नव्हतं. २००८ च्या दरम्यान तिने आयकर विभागाने जप्त केलेली प्रॉपर्टी परत द्यावी म्हणून मागणी केली इतकच. त्यानंतर केस संपली आणि तरन्नूम गायब झाली. तिचा फोटो कधीच समोर आला नाही. टिव्हीवर तिने मुलाखत दिली ती देखील बुरख्यात.

आज मुंबईतील पत्रकारांना विचारलं तर ते सांगतात तरन्नूम आत्ता दुबईत असते. तिथे उच्चभ्रू लोकांच ती मनोरंजन करते. आणि दिपा बारचं काय झालं तर दिपा बारच्या ठिकाणी आत्ता अध्यात्मिक केंद्र सुरु करणार असल्याचं ऐकण्यात आलं होतं. 

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.