त्यांनी शेअर्सवरती कविता रचल्या, ते उत्तम उद्योगपती होते.

महात्मा जोतिबा फुले हे नाव उच्चारताच आपल्या मनात येतात ते ‘समाजसुधारक’ क्रांतिसुर्य महात्मा फुले.

महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला, महात्मा फुलेंनी सनातनी ब्राह्मण्यवादावर जोरदार आसूड ओढला. दिनदुबळ्या शेतकरी, कामगार वर्गाची बाजू मांडली. त्यांच्या हक्कांसाठी लढा उभारला.

मात्र त्यांनी घर जाळून कोळश्याचा व्यापार मात्र नक्कीच केला नाही.

आजच्या काळात समाजसेवक म्हणजे, तो गरिब असावा असे मत बळावत असताना महात्मा फुलेंचा आदर्श घ्यावा लागतो.

कारण लोकवर्गणी गोळा करून त्यांनी हा लढा उभारला नाही तर स्वत: उत्तम बिझनेस करून त्यांनी पैसे कमावले. हे पैसे त्यांनी गोरगरिबांच्या कल्याणासाठी खर्च केले.

महात्मा फुले हे काळाच्या पुढचे व्यक्ती होते हे आपण सांगतो,

मात्र आजच्या काळात देखील लोकांना समाजसेवा करत असताना स्वत: फकीर रहाण्याची सवय जडते ती किती चुकीची आहे हे देखील महात्मा फुलांच्या विचारातून शिकता येतं.

महात्मा फुले पैशांच्या दृष्टीने मोठ्ठे आसामी होते ही गोष्ट आपण समजून घेतली पाहीजे व त्या मार्गाने पाऊल टाकून समाजउन्नतीचा मार्ग स्वीकारला पाहीजे.

महात्मा फुले म्हणतात,

शेअर घेणाऱ्यास गळा भाल दोरी! पावतीत सारी जडीबुटी!
पैसे बुडाल्यास नाही त्यास दाद! सुका आशीर्वाद भटासाठी!
उचल्याच्या परी खिसे कातरिती ! तोंड लपविती जोती म्हणे!

शेअर्स विकत घेत असताना पावती हीच जडीबुटी आहे. व्यवहारात कशा प्रकारची पारदर्शकता असावी हे जोतिबा सांगतात.

विचार करा सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी ते शेअर्स वरती लिहतात.

महात्मा जोतिराव यांच्या कंपनीने कात्रजचा बोगदा बांधला, येरवड्याचा पूल आणि खडकवासला धरणाचा कालवा बांधण्याचे काम देखील त्यांच्या कंपनीने पूर्ण केले.

एक उद्योगपती, कार्यकारी संचालक, अर्थतज्ञ आणि शेअर्स मार्केटचे अभ्यासक अशी त्यांची विविधांगी भूमिका राहिली याकडे दूर्लक्ष करून चालणार नाही.

पुणे कमर्शियल आणि काॅन्ट्रक्टिंग कंपनीने महात्मा फुले कार्यकारी संचालक होते.

एक उत्तम उद्योगपती म्हणून त्यांची गणना केली जात असे. तत्कालीन पुण्यातील श्रीमंत व्यक्तींमध्ये महात्मा फुलेंचे नाव बऱ्याच वरच्या क्रमांकावर होते.

धरणे, पूल, राजवाडे, कापडगिरण्या अशी बरीच कामे या कंपनीने केली.

प्रा. हरी नरके आपल्या लेखात लिहतात, 

मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत, भायखळा पूल आणि परळचे रेल्वे वर्कशॉप, मुंबईतील अनेक कापडगिरण्या, भंडारदरा जलाशय, बडोद्याचा सयाजीराव गायकवाडांचा लक्ष्मीविलास राजवाडा, आदींची बांधकामे सत्यशोधकांनी केलेली आहेत.

राजू बाबाजी वंजारी यांनी मुंबईतील टाइम्स ऑफ इंडियाची इमारत, सोलापूरची लक्ष्मी विष्णू मिल आणि लक्ष्मीदास खिमजी यांच्या मुंबईतील कापड गिरण्या बांधल्या.

हे सर्वजण जोतीरावांचे निकटचे स्नेही आणि जोतीरावांच्या कंपनीचे भागीदारही होते.

त्यांनी सत्यशोधक चळवळीला फार मोठे योगदान दिलेलं आहे.

जोतीरावांच्या कंपनीनं केलेली महत्त्वाची कामं म्हणजे कात्रजचा बोगदा, येरवड्याचा पूल आणि खडकवासला धरणाचा कालवा होय. पूल, धरणे, कालवे, बोगदे आणि रस्ते व सुंदर इमारती यांसारखी अनेक दर्जेदार बांधकामं त्यांनी केली.

त्यातून मिळविलेली रक्कम सामाजिक कामासाठी मुक्त हस्ते खर्चून टाकली.

जोतीरावांच्या या कंपनीतर्फे पुस्तक प्रकाशनाचंही काम केलं जाई. बौद्ध विचारवंत अश्वघोष यांच्या वज्रसूची या जगप्रसिद्ध ग्रंथावर आधारित पुस्तक तुकाराम तात्या पडवळ यांनी १८६५ साली लिहिलं. जोतीरावांनी ते ‘जातीभेद विवेकसार’ प्रकाशित केलं.

या कंपनीचं पुण्यात पुस्तकविक्री केंद्र होतं.

सोन्याचे दागिने बनविण्याचे साचे विकण्याची एजन्सी जोतीरावांकडे होती. ही कंपनी भाजीपाला विक्री व पुरवठा यांचेही काम करीत असे.

एक अव्वल दर्जाचे यशस्वी व्यापारी, उद्योगपती आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतीरावांचा नावलौकिक होता.

नित्य यश देई त्यांच्या उद्योगास, सुख सर्वत्रांस जोती म्हणे!

सर्व दुर्गुणांचा आळस हा पिता, बाळपणी कित्ता मुलीमुला!

तरूणपणात दुर्गुणी संसारी, वृद्धपणी करी हाय हाय!

उद्योगा सोडून कलाल बनती, शिव्याशाप देती जणामाजी!

आळशास सुख कधीच होईना, शांतता पावेना जोती म्हणे!

आळशांचा धंदा उद्योग करीती, दुकान मांडीती सोरटीचे!

नावनिशी नाही पैसा देई त्यांची, आदा आढाव्याची देत नाही!

उचल्याचे परी मूढास नाडीती, तमाशा दावीती उद्योगास!

अशा आळशाची शेवटी फजिती, धूळमाती खाती जोती म्हणे!

असे महात्मा फुले लिहतात. म्हणूनच महात्मा फुलेंना बिल्डर नव्हे तर नेशन बिल्डर म्हणावे लागते.

ही माहिती प्रा. हरी नरके यांच्या संकेतस्थळाला उपलब्ध आहे.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.