सट्टा बेकायदेशीर असताना ड्रीम 11 ला पैसे लावणं कायदेशीर आहे का?

एक काळ होता जेव्हा सट्टा म्हनलं की सगळ्यांचं कान उभं राहायचं. शटर वढून त्यामागं भिंती भरून आकडेवारी आणि पोस्टर लावणं, टीव्हीला चिकटून बसून हिशोब ठेवणं म्हणजे छोट्या शहरांतला सट्टा होता. मोठ्या माणसांचा हा उद्योग इम्रान हाशमीने जन्नत पिच्चरमध्ये दाखवलाय.

त्याच्यामुळं सट्टा ही कायतरी भयानक आणि शान्यासुरत्या सरळमार्गी माणसानी न करायची गोष्ट झाली होती. पण साक्षात धोनीच स्क्रीनवर येऊन “खेलो दिमाग से” म्हणत होता तेव्हा लै जणांच्या कपाळावर आढ्या पडल्या.

श्रीसंत आणि इतर पाच जणांना जेलमध्ये जावं लागलं ते काय होतं? सट्टा लावणाऱ्या लोकांना अटकेच्या बातम्या सोबत येतात आणि शेजारीच ड्रीम इलेव्हनची जाहिरात? ये भेदभाव क्यू?

तर याचं सरळ कारण आहे की ड्रीम इलेव्हन सट्टेबाजी विरोधाचा कायदा मोडत नाही. आपण लोकं एवढी हुशारेत की कायद्याची पळवाट आपण कायदा यायच्या आधीच काढून ठेवत असतोय. त्यामुळं ड्रीम इलेव्हन तसं लेटच आलं म्हणायला पाहिजे.
ड्रीम ११ ने आपल्या वेबसाईटवर भारतातील सर्व राज्ये आणि केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे आणि कायद्यांचे पालन करत आहोत असं लिहिलंय. त्यामुळं ते वापरणाऱ्या लोकांना अजिबात घाबरायची गरज नाही असं ते म्हणतात.

ड्रीम एलेव्हन कायद्याची जी पळवाट वापरते ते म्हणजे कौशल्य वापरायचा व्यवसाय म्हणून!

कायद्याने सट्टा ही विकेट पडेल की न पडेल यावर अवलंबून असते. त्यामुळं त्याचं वर्गीकरण खेळावर प्रभाव पाडणारे नियम असं केलं जातं. “श्रीसंत चौथ्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर नो बॉल टाकेल” हा झाला सट्टा. हा कुठंपन बेकायदेशीरच आहे.

जेव्हा काही लोक याविरुद्ध कोर्टात गेले होते तेव्हा हायकोर्टाने ड्रीम इलेव्हनच्या बाजूने निर्णय दिला होता.

कोर्टांने आपल्या निर्णयात ड्रीम इलेव्हनची पाठराखण केलीय. भारतीय संविधानातील अनुच्छेद 19 – (1) – (g) याचा आधार देऊन याला भक्कम करण्यात आलंय. भारतीय नागरिकांना आपलं स्किल वापरून हवा तो व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य असतं. त्याच्यावर युक्तिवाद करून ड्रीम ११ ने भारतात आपली पकड मजबूत केलीय.

कोर्टाच्या मते या कामासाठी कोणत्याही कौशल्याची गरज नायय. त्यामुळं याला बेकायदेशीर मानलं जातं.

याउलट ड्रीम 11 ची रचनाच अशी आहे की त्यात कौशल्याला वाव आहे असं मांडलं जातं. तुम्हाला क्रिकेट मधील बारकावे माहीत असणे ही याची पूर्वअट म्हटली जाते. खेळत असणाऱ्या खेळात जेवढे खेळाडू असतील तेवढे खेळाडू या आभासी टीममध्ये असतात.

एक बॉल, ओव्हर किंवा स्लॉट यावर बेटिंग शक्य नाही. ड्रीम ११ मध्ये तुम्हाला सगळ्या संपूर्ण मॅचवर पैसे लावायला लागतात. एका टीमचे किती प्लेयर घ्यावेत, किमान एक विकेट किपर घ्यायला लागेल असे नियम यात असल्याने खेळ फक्त बुकी लोकांचा बनून न राहता खरंच खेळाचं ज्ञान आहे त्यालाच खेळता येतो.

त्यामुळं भारतीय दंडसंहितेच्या पब्लिक गॅम्बलिंग ऍक्ट १८६७ मधून ड्रीम ११ ला वगळण्यात आले. त्याची ओळखच आता फँटसी क्रिकेट म्हणून करून दिली जाते. म्हणजेच त्यात फक्त इमॅजिनरी लेव्हलला फक्त आभास म्हणून त्यात खेळ सुरू झाल्यानंतर टीम बदलता येत नाही हा म्हत्त्वाचा फरक सांगितला जातो.

त्यामुळं अशी अनेक app आणि पोर्टल तुमच्यासाठी खुली होत आहेत. मोठमोठ्या खेळाडूंना चेहरा बनवून दाखवल्यानं त्याचा प्रभावही वाढत आहे. त्यामुळं हे क्षेत्र सतत विस्तारत जाईल असा अंदाज आहे.

पण अगदी वही घेऊन यांच्यामागे लागून, पाच वेब साईट आणि मॅच विश्लेषण बघून लोकं यात उतरत आहेत. त्यामुळं यातही प्रचंड स्पर्धा आहे. अर्थात यात तुम्ही किती कौशल्य मिळवता ही तुमची क्षमता महत्वाची आहेच. पण पडणाऱ्या फाशांचे किंवा संभाव्यतेचे गणित यात लागू पडतेच. म्हणून जर कोहलीला जाहिरातीत बघून फँटसी क्रिकेट खेळत नवीन दुकान टाकायची स्वप्नांना पंख फुटत असतील तर कारभारी दमानं एवढंच!

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.