युरोपियन लीगमध्ये राडा करणारी भारतीय पोरं……
क्रिकेटच्या सावलीत का होईना भारतात सुद्धा फुटबॉल वाढायला लागला आहे. युरोपियन लीगच्या दुनियेत भारतीय फुटबॉलपट्टू प्रवेश करायला लागले आहेत. भारतात फुटबॉलसाठी तयार होऊ लागलेलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि मिळणारा प्रतिसाद बघता युरोप मधील प्रत्येक टीमच्या लॉकर रूममध्ये भारतीय खेळाडूचं नाव नक्कीच बघायला मिळेल. भविष्यात ही संख्या वाढली तर या अगोदर नेमके किती भारतीय युरोपीयन संघाकडून खेळले आहेत याचा लोड कमी करण्यासाठी अशा खेळाडूंची यादी देतोय ज्यांनी युरोपियन लीग मध्ये भारतीय खेळाडू म्हणून सहभाग नोंदवला आहे.
१ ) मोहम्मद सलिम.
मोहम्मद सलिम हा युरोपियन क्लबकडून खेळणारा पहिला भारतीय खेळाडू होता. स्कॉटलंडचा सगळ्यात प्रसिद्ध क्लब सेल्टीकने सलिम यांना १९३६ साईन केलं होत. पण सेल्टीककडून त्यांनी फक्त २ मॅच खेळल्या . वैयक्तिक कारणामुळे त्यांनी लगेचच भारतात परत यायचा निर्णय घेतला. क्लबला त्यांचा खेळ एवढा आवडला होता त्यांनी सलिम यांना करार वाढवून द्यायचा पण निर्णय घेतला होता. पण तरीही ते भारतात परत आले. जर्मनीच्या क्लबकडून खेळायची देखील त्यांना ऑफर आली होती पण तीही ऑफर त्यांनी स्वीकारली नाही. त्यांची युरोप मधली कामगिरी मोठी नसली तरी युरोपियन फुटबॉल मध्ये भारताचा प्रवेश करून द्यायचं श्रेय सलीम यांना नक्कीच मिळेल.
२) बायचुंग भुतिया.
बायचुंग भुतिया, भारतीय फुटबॉल मधलं सगळ्यात मोठं नाव. भारताचा सगळ्यात यशस्वी कॅप्टन. जागतिक पातळीवर सर्वात जास्त गाजलेला भारतीय खेळाडू. युरोपमध्ये देखील भुतिया चांगलाच यशस्वी ठरला. युरोपियन क्लबकडून खेळणारा भुतिया दुसरा भारतीय खेळाडू ठरला. १९९९ मध्ये इंग्लंड मधील ब्यूरी एफ. सी. या संघाने त्याला साईन केलं. या क्लबकडून भुतियाने एकूण ३७ सामने खेळले आणि 3 गोल केले. युरोप मध्ये गोल करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला.
३) आदिती चौहान.
या लिस्ट मधील पहिली आणि एकमेव महिला खेळाडू. वयाच्या 15 व्या वर्षीच तिचं दिल्लीच्या U- १९ टीम मध्ये सिलेक्शन झालं होतं. SAF स्पर्धेचं विजेतेपद देखील आदितीच्या नावावर आहे. 2015 मध्ये इंग्लंड मधील वेस्टहॅम क्लबने तिला साईन करून घेतले. सबस्टिट्यूट गोलकीपर म्हणून खेळणारी आदिती लवकरच टीमची मुख्य गोलकीपर बनली.
४) सुनील छेत्री.
भारतीय फुटबॉल संघांचा सध्याचा कॅप्टन सुनील छेत्री देखील या यादीत आहे.
क्रिस्तीयानो रोनाल्डोने ज्या संघाकडून आपल्या फुटबॉल करिअरला सुरुवात केली त्या पोर्तुगालच्या स्पोर्टिंग लिस्बन संघाने 2012 मध्ये सुनील छेत्रीला आपल्याकडून साईन करून घेतले होते. स्पोर्टिंग कडून खेळायच्या आधी अमेरिकन सॉकर लीग मधील कॅन्सस सिटी या संघाकडून देखील छेत्री खेळला होता.
५) सुब्रता पॉल.
युरोपियन लीगमध्ये खेळणारा पहिला भारतीय गोलकीपर. 2011 मध्ये डॅनिश क्लब एफ.सी.वेस्टसलँड या संघाने सुब्रता पॉलला आपल्याकडे घेतले होते. मुख्य संघाबरोबर त्यानं एक जरी सामना खेळला नसला तरी डेन्मार्क मधील सेकंड टीएर लीगमध्ये त्यानं आपला ठसा उमटवला होता.
६) गुरप्रित सिंग संधू.
भारतीय संघाचा सध्याचा गोलकीपर संधूला 2014 मध्ये नॉर्वे मधील क्लब स्टाबेकने साईन केले होते. स्टाबेक संघाचा गोलकीपर म्हणून संधूने तीन सीजन खेळले. 2017 मध्ये संधू पुन्हा भारतात आला आणि सध्या तो इंडियन सुपर लीग मध्ये बंगळुरू एफ.सी. या संघाकडून खेळतो.