२२ ठाकुरांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ज्याने फुलनदेवीला मारलं त्याच्यावरच आता पिक्चर येतोय

“बेह्माई गावात माझ्यासोबत जे काही भयानक झालं त्याची कल्पनाही कुणी करू शकत नाही. तेच दाखवत शेखर कपूरने मला पडद्यावर नग्न केलं. पिक्चर खपवण्यासाठी सत्यता कमी अन नग्नता जास्त दाखवली. यावर माझ्याशिवाय कुणीच काही बोललं नाही…. ना राजकीय नेते….. ना सेन्सॉर बोर्ड” 

ही जळजळीत प्रतिक्रिया होती फुलनदेवीची…

तिच्या आयुष्यात घडलेली ‘ती’ एक घटना तिच्या विद्रोही असणं सिद्ध करतं ते म्हणजे बेह्माई हत्याकांड.  तिच्यावर झालेल्या अत्याचाराचा सूड तिने तिच्या परीने उगवला अन बेह्माई हत्याकांड घडलं..भलेही कायद्याचा भाषेत हा बदला एक गुन्हा असेल…पण त्यानंतर ती संविधानिक मार्गाने सरकारला शरण देखील आली हे हि लक्षात घेतलंच पाहिजे.

चंबळ खोऱ्यातील डाकूंची राणी ते खासदार होऊन दिल्लीत येण्यापर्यंतची फुलनदेवीची विद्रोही कहाणी ‘बँडीट क्वीन’ या सिनेमाच्या माध्यमातून कळली असणार…आता असा एक सिनेमा येतोय ज्यातून आपल्याला शेर सिंग राणाची स्टोरी पाहायला मिळणार आहे…

 फुलनदेवी- बेह्माई हत्याकांड – शेर सिंग राणा अशी हि स्टोरी असणार..

बेह्माई हत्याकांडाचा अन या शेर सिंग राणाचा काय संबंध ?

फुलन देवीने आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेत बेह्माई येथील २२ ठाकुरांची हत्या केली केली होती. फुलन देवीच्या मनात ठाकूर (राजपूत ) समुदायावर असलेल्या रागाला अनेक कारणं होती यातील एक महत्वाचं कारण म्हणजे फुलन देवीची टोळी आणि ठाकूर टोळीच्या भांडणात फुलनचा विनयभंग झाला होता. एका ठाकूर टोळीतल्या डाकुने तिला विकत घेतलं होतं तर दुसऱ्या एका ठाकूर टोळीतील डाकुने तीला गावभर विवस्त्र फिरवलं होतं.  फुलन देवी हि मल्लह (नाविक) समुदायाची होती. तर हे ठाकूर उच्चजातीचे समजले जाणारे होते…

याच रागातून तीने २२ ठाकुरांची हत्या केली अन त्यानंतर ती चंबळमधील ‘रॉबिनहूड लेडी’ म्हणून ओळखली जाऊ लागली.   

पुढे उत्तर प्रदेशातील अर्जुन सिंग सरकारने फुलन देवीच्या अनेक अटी आणि शर्ती मान्य करत तीचं आत्मसमर्पण घडवून आणलं. त्यानंतर फुलनदेवी सक्रीय राजकारणात आली. समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली अन खासदार देखील बनली. 

तिच्या याच सगळ्या कहाणीवर आधारित बँडीट क्वीन’ नावाचं पुस्तक अन पिक्चर आलेला.  तिने केलेलं लग्न असेल किंव्हा तिच्या राजकीय कारकिर्दीमुळे ती अनेकदा बातम्यांमधून झळकत असायची. 

 २००१ सालात जुलै महिन्यात अनपेक्षित बातमी येते अन इथेच शेर सिंग राणाची एन्ट्री होते.. 

२५ जुलै २००२ रोजी खासदार फुलन देवीची दिल्लीतील सरकारी निवासस्थानी अज्ञातांनी गोळ्या घालून  हत्या केली जाते.  या घटनेच्या दोन दिवसानंतर एक शेर सिंग राणा नावाच्या ऐन तिशीतला युवक पत्रकार परिषद घेऊन फुलन देवीच्या हत्येची कबुली देत डेहराडून पोलिसांसमोर आत्मसमर्पण करतो. त्याच्या चौकशीदरम्यान बेह्माई येथील ठाकुरांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आपण फुलन देवीची हत्या केल्याचं तो पोलिसांना सांगतो. त्यानंतर शेर सिंग राणा याला तिहार जेलमध्ये ठेवण्यात आलं.हाच शेर सिंग ज्यावर पिक्चर येणारे..

खरं तर शेर सिंग राणा दोनदा चर्चेत आलेला. पहिल्यांदा जेंव्हा त्याने फुलनदेवीला गोळ्या घातल्या अन तिची हत्या केली. दुसऱ्यांदा जेंव्हा तो जेलमध्ये होता तेंव्हा तो अगदी फिल्मी स्टाईलमध्ये जेलमधून पळून गेलेला. हाय सिक्युरिटी असलेल्या तुरुंगातून पळून गेल्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला होता. 

चार्ल्स शोभराज याच्यानंतर फिल्मी स्टाईलने पळून जाणारा तो दुसरा कैदी ठरला होता.

हि २००४ ची घटना आहे, त्याने चक्क तिहारमधून धूम ठोकली होती. तिहारमधून पळून गेल्यानंतर तो थेट अफगाणिस्तानात गेला होता. त्यानंतर २००६ साली त्याला कोलकात्यात पकडण्यात आलं. त्यावेळी आपण पृथ्वीराज चौहान यांच्या अस्थी भारतात आणण्यासाठी काबुलला गेलो असल्याचं त्याने माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. विशेष म्हणजे हे अवशेष भारतात आणून उत्तर प्रदेशात पृथ्वीराज चौहान यांचं मंदिर बांधण्याचा चंग त्याने बांधला होता. 

पळून जाण्यापासून ते काबुल आणि परत भारतात येईपर्यंतच्या अशा सर्वच घडामोडींचं त्याने व्हिडीओ शूट देखील केलं होतं.  अखेर १७ मे २००६ रोजी कोलकाता येथे अटक झाल्यानंतर त्याला परत तिहारमध्ये पाठविण्यात आलं. दिल्लीच्या ट्रायल कोर्टाने १४ ऑगस्ट २०१४ रोजी फुलन देवीच्या हत्येप्रकरणी शेर सिंगला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याच दिल्ली उच्च न्यायालयाने राणाला अंतरिम सर्वमत दिले. तर २०१२ मध्ये तर त्याने यूपीच्या जेवर विधानसभेतून स्वतंत्र विधानसभा निवडणूक लढवली होती.

खटल्यादरम्यानच्या काळात त्याने  “जेल डायरी- तिहार से कंदहार तक” नावाचं पुस्तक लिहिलं. याच पुस्तकावर आधारित “शेर सिंग राणा” नावाचा चित्रपट येणार असं घोषित झालं आहे.

२९ ऑक्टोबर २०२१ रोजी निर्माता विनोद भानुशाली आणि दिग्दर्शक श्री नारायण सिंह या जोडीने शेरसिंग राणा यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची घोषणा केली होती. यात शेर सिंग राणाची भूमिका विद्युत जामवाल साकारणार आहे. 

एक हत्यारा असलेल्या शेर सिंगवर बायोपिक का येत असेल ? 

शेर सिंगने फुलनदेवीची हत्या केली याच एका घटनेवर हा पिक्चर नसून तर शेर सिंग राणाने लहान वयातच अनेक कारणांमुळे संपूर्ण भारतात खळबळ उडवून दिली होती. याशिवाय आणखी एक कारण म्हणजे ज्यामुळे त्याला राजपूत समाजात खूप मानतात. 

त्याचं कारण म्हणजे, अफगाणिस्तानमधील कंदाहारमधून चौहान घराण्याचा ११ व्या शतकातील शासक पृथ्वीराज चौहान यांच्या खुणा परत आणण्यासाठी शेर सिंग जगभरात चर्चेत आला होता. एका महान शासकाचे अवशेष परत आणणारी एकमेव व्यक्ती म्हणून राजपूत समाजात त्याला खूप आदर दिला जातो. 

शेरसिंग राणा यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या बायोपिकची निर्मिती विनोद भानुशाली, कमलेश भानुशाली, विशाल गुरनानी, विशाल त्यागी, मोहम्मद इम्रान खान यांनी केली असून जुही पारेख मेहता सहनिर्माते असणार आहेत. भानुशाली स्टुडिओ लिमिटेड सोबत हा चित्रपट मटर पेट्रोल फिल्म्सच्या बॅनरखाली बनवला जाणार आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.