जुलमी दुनियेच्या छाताडावर पाय देऊन गौहर जान देशातल्या पहिली करोडपती गायिका बनल्या

दुःख काय लेव्हलच असतं आणि त्या दुःखातून कसं सावरून संकटाना तोंड देत देत यश मिळवायचं याच्या गप्पा मारणं सोपं असतं पण जर ते प्रत्यक्ष आयुष्यात उतरवायचं असेल तेव्हा मात्र खरी कसोटी असते.

जेव्हा एखाद्या मुलीबद्दल किंवा महीलेबद्दल आपण बलात्कार झाला, अत्याचार झाला असं ऐकतो तेव्हा मात्र काळजात चर होतं. पिडीत महिला, मुली यांच्या आयुष्यात या घटना इतक्या इम्पॅक्ट करून जातात की काही नवीन करायला त्यांचं मन धजावत नाही. कितीही प्रयत्न केले तरी वास्तविक आयुष्यात त्या लवकर परतू शकत नाही. पण काही महिला इतक्या खंबीर असतात की जुलमी दुनियेच्या छातीवर पाय टाकून त्या आयुष्यात यशस्वी होऊन दाखवतात. अशा घटना इतिहासात अजरामर ठरतात आणि इतिहास त्यांचा कायम आदर करतो.

अशा खमक्या महिलांमध्ये एक नाव कायम टॉपला दिसतं ते म्हणजे गौहर जान. 

ही महिला म्हणजे जगभरातल्या लोकांची प्रेरणास्थान बनली. गौहर जान यांच्यासोबत वयाच्या तेराव्या वर्षी बलात्कार झाला होता त्यातून त्यांनी स्वतःला सावरलं आणि नंतर ज्या काळात स्त्रियांना डोईवरचा पदर खाली पडू द्यायचा नव्हता कायम पदरात मुस्कटदाबी करण्याची शिक्षा होती त्या काळात गौहर जान या पहिल्या रेकॉर्डिंग सुपरस्टार बनल्या होत्या. गौहर जान या पहिल्या गायिका होत्या ज्यांच्या गाण्यांना 78 rpm वर रेकॉर्ड केलं गेलं होतं. त्यामुळे गौहर जान यांना रेकॉर्डिंग सुपरस्टार म्हणून सुद्धा ओळखलं जातं

गौहर जान कोण होत्या ?

गौहर जान यांचा जन्म 26 जून 1873 रोजी उत्तर प्रदेश मधल्या आजमगड जिल्ह्यात झाला जन्माने त्या ख्रिश्चन होत्या. त्यांचं खरं नाव एंजेलिना योवर्ड होतं. गौहर जान या वंशाने आर्मेनियाच्या होत्या. त्यांची आई विक्टोरिया हेमिंग्ज यांचा जन्म भारतात झाला होता. त्या एक उत्तम सिंगर आणि डांसर होत्या. गौहर जान यांना म्युझिक आणि डान्सिंगची आवड आपल्या आईकडून जन्मजातच लाभली होती. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याचं हे उदाहरण.

गौहर जान यांचे आजोबा ब्रिटिश होते तर आजी हिंदू होती. त्यांच्या वडिलांचे नाव विलियम योवर्ड होतं. पण त्यांच्या आई-वडिलांचा 1879 मध्ये घटस्फोट झाला त्यावेळी गौहर जान या फक्त सहा वर्षांच्या होत्या. नवऱ्यासोबत च्या घटस्फोटानंतर गौहर जान यांची आई खुर्शीद नावाच्या एका माणसासोबत बनारसला आल्या.

बनारस मध्ये गौहर जान यांच्या आईने आणि स्वतः गौहर जान यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. यानंतर जेव्हा विक्टोरिया यांनी आपलं नाव मलका जान ठेवलं तेव्हा अँजेलिनाच नाव बदलून गौहर जान करण्यात आलं. काही दिवसातच मलका जान बनारस या प्रसिद्ध हूनरबाज गायिका आणि कथ्थक डान्सर म्हणून नावारूपाला आल्या. काही काळानंतर मलका जान आपल्या मुलीसोबत कलकत्त्याला आल्या आणि नवाब वाजिद अली शाह यांच्या दरबारात या आपली कला सादर करू लागल्या.

गौहर जान यांनी डान्स आणि म्युझिक कोलकत्ता मध्ये शिकलं. त्यांनी रामपूरचे उस्ताद वजीर खान आणि कलकत्त्याचे प्यारे साहेब यांच्याकडून गायनाची तालीम मिळवली. लवकरच त्या ध्रुपद, ख्याल आणि बंगाली कीर्तन सादर करण्यात पारंगत झाल्या. इथूनच गौहर जान यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. कितीही उंच पट्टीचा आवाज लावायचा असो गौहर जान यांचा हात कोणी धरु शकत नव्हतं, सुरावटी त्यांच्या इतक्या कोणाच्याच पक्क्या नसायच्या.

गौहर जान यांनी संगीताच्या दुनियेत आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. 

गौहर जान यांनी आपला पहिला परफॉर्मन्स 1887 मध्ये दरभंगा राजवटी दिला होता जे की आता वर्तमान काळात बिहारमध्ये आहे. या घटनेनंतर त्यांना तिथं दरबारी संगीतकार म्हणून मान मिळाला. 1896 साली त्यांनी कोलकत्ता मध्ये परफॉर्म करायला सुरुवात केली. त्यांच्या गायकीचे आणि अदाकारीचे करोडो चाहते होते आणि त्यांना रेकॉर्ड मध्ये फर्स्ट डान्सिंग गर्ल असा किताब देण्यात आला होता जो अजूनही अबाधित आहे.

संपूर्ण भारतभरात त्यांनी आपली कला सादर केली. त्यांना जॉर्ज पंचम ज्या दिल्ली दरबारात सुद्धा त्यांना परफॉर्म करायला बोलवण्यात आलं होतं. गौहर जान यांनी हमदम नावाने बऱ्याच गझला लिहिल्या. 19 व्या शतकामध्ये गौहर जान सगळ्यात महागड्या सिंगर होत्या.

असं म्हटलं जातं की जेव्हा सोन्याच्या शंभर मोहरा मिळतील तेव्हा त्या मैफील मध्ये जात असे आणि आपली कला सादर करत असे. त्यांच्या गायनाने श्रोते अगदी मंत्रमुग्ध होऊन जायचे.

सुरुवातीच्या काळात गौहर जान या सगळ्यात श्रीमंत महिला होत्या. त्यांचे पोशाख आणि दागिने त्या काळातल्या राणींना सुद्धा भारी भरायचे. आपल्या कमाईचा बराच मोठा वाटा त्यांनी कोलकत्ता मध्ये इन्व्हेस्ट केला जिथे त्यांच्या कोठ्या होत्या.

भलेही गौहर जान या श्रीमंती आणि मोठ्या राजेशाही थाटात वाढल्या, पण तत्कालीन समाज असा होता जो गायिकांना वाईट नजरेने बघायचा. अशावेळी गौहर जान यांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागला. त्यांना खरं प्रेम कधी मिळालं नाही, त्यांना वेळोवेळी धोका मिळाला गेला. प्रौढावस्तामध्ये गोहर जान यांनी आपल्यापेक्षा कमी वयाच्या एका पठाणसोबत लग्न केलं पण त्या सासरी काय गेल्या नाही. प्रकरण कोर्टापर्यंत गेलं , ज्यामुळे गौहर जान यांना आपली संपत्ती विकावी लागली. असं म्हटलं जातं की कधी काळी आपल्या दागिन्यांनी आणि पोशाखांनी त्यावेळच्या राण्यांना मात देणारी गौहर जान आपल्या शेवटच्या काळात एकटी पडली आणि एकटेपणातच 17 जानेवारी 1930 साली त्यांचं निधन झालं.

भारतीय शास्त्रीय संगीताला नवीन उंची प्राप्त करून देणाऱ्या गौहर जान यांना शोषणाचा सामना करावा लागला होता. गौहर जान या अवघ्या तेरा वर्षाच्या असताना त्यांच्यावर बलात्कार झाला होता. पण त्यांनी अशा काळात दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर पुनरागमन केलं आणि सांगितिक क्षेत्रात मोठ यश मिळवलं. त्यांचं जीवन हे महिलांचे शोषण, धोका, लुटपाट आणि संघर्षाची कहाणी आहे. विक्रम संपथ यांनी ‘ माय नेम इज गौहर जान ‘ या पुस्तकाच्या माध्यमातून गौहर जान यांची गोष्ट जगाला सांगितली. गौहर जान हे फक्त एक नाव नाही तर त्या महिलांसाठी प्रेरणा आहे ज्या पीडित आहेत, शोषित आहेत. गौहर जान यांच्या जीवनपटातून यशस्वी लढा कसा द्यायचा हे शिकण्यासारखं आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.