कधीकाळी योगींची सावली असलेली आता त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे

देशभरामध्ये निवडणुकांचा शंखनाद झाला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाला लोक प्रतिसाद देत आहेत. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची नववी यादी जाहीर केली आहे. या यादीत काँग्रेसने १५ महिला उमेदवारांना तिकीट दिलं असून, एकूण ३३ उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवाय प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर काँग्रेस पक्षाने गोरखपूर शहरातून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उमेदवाराचा शोध पूर्ण केला आहे.

सीएम योगी आदित्यनाथ हे गोरखपूर सीटवरून लढणार असल्याने ही व्हीआयपी सीट बनली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष या जागेवर लागले आहे. 

काही दिवसांपूर्वीच समाजवादी पक्षाने योगींच्या विरोधात उपेंद्र शुक्ला यांच्या पत्नी ‘शुभवती शुक्ला’ यांना मैदानात उतरवलं आहे. तर आता गोरखपूर सदर मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या फेरीत आपला उमेदवार घोषित केला आहे. काँग्रेसने त्यांच्या यंदाच्या ‘लडकी हूं लढ़ सकती हूं’ या निवडणूक धोरणाला अनुसरत एक महिला चेहरा योगींच्या विरोधात उतरवला आहे. 

काँग्रेसकडून डॉ. चेतना पांडे योगींविरोधात गोरखपूर गड लढवणार आहेत.

सपाप्रमाणेच काँग्रेसनेही ब्राह्मणांना पक्षात घेण्यासाठी गोरखपूर विद्यापीठाच्या माजी उपाध्यक्षा डॉ. चेतना पांडे यांना उमेदवारी दिली असल्याच्या चर्चा यामुळे सुरु झाल्या आहेत. आता या व्हीआयपी सीटसाठी लढणारे व्यक्तिमत्व देखील व्हीआयपीच असणार असंही बोललं जातंय. तेव्हा कोण आहेत या चेतना पांडे जाणून घेऊया.

चेतना पांडे गोरखपूरच्या जगतबेला स्टेशनच्या शेजारी असलेल्या ‘मझगांवा’ या गावाच्या राहणाऱ्या आहेत. त्यांचे वडील रेल्वेत स्टेशन मास्तर होते. जे आता निवृत्त झाले आहेत. लहानपणापासूनच चेतना वक्तव्य शैलीत पटाईत होत्या. त्यांच्या संभाषण शैलीने अनेकांना त्यांनी प्रभावित केलं आहे. पुढे शिक्षणासाठी दीनदयाळ उपाध्याय गोरखपूर विद्यापीठात त्यांनी प्रवेश घेतला. विद्यापीठात चेतना पांडेची बोलण्याची शैली पाहून सगळेच प्रभावित व्हायचे.

गोरखपूर विद्यापीठात शिकत असताना चेतना विद्यार्थ्यांचा आवाज उठवण्यासाठी अनेक आंदोलनांमध्येही सहभाग घेत असायच्या. विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत त्यांच्या  लोकप्रियतेमुळे २००५ मध्ये चेतना पांडे उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्या. विद्यार्थी राजकारणासोबतच चेतना अभ्यासातही अव्वल स्थान पटकावत राहिल्या. विद्यापीठातून पीएचडी केल्यानंतर त्यांच्या नावासोबत डॉक्टर जोडलं गेलं आणि आता त्यांना डॉ.चेतना पांडे या नावाने ओळखलं जातं.

राजकारणासोबतच डॉ.चेतना पांडे या विद्यापीठाच्या काळापासून सांस्कृतिक कार्यात सक्रिय आहेत. त्या कवयित्री, तबलावादक आहेत. तबलावादक म्हणून त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावली आहेत. तर कविता क्षेत्रातही त्यांनी राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक पटकावलं आहे. शिवाय त्या पत्रकारही आहेत. चेतना यांची आतापर्यंत दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 

गोरखपूर झोनमधील ११ जिल्ह्यांतील महिलांसाठी त्या दीर्घकाळापासून काम करत आहेत. यासोबतच गोरखपूर विद्यापीठातील विद्यार्थी राजकारणात महिलांचा सहभाग वाढवण्यात चेतना पांडे यांचं मोठं योगदान आहे.

 

चेतना योगींविरुद्ध लढत आहे हे समजल्यावर योगींची सावली आता योगींविरुद्ध  निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे, अशा चर्चा आहेत. 

याचं कारण म्हणजे चेतना यांच्या राजकारणाची सुरुवात योगींसोबत झाली होती. योगी आदित्यनाथ यांच्यासोबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी (ABVP) त्या दीर्घकाळ संबंधित होत्या. मात्र विद्यार्थी राजकारणातून बाहेर पडलेल्या चेतना यांनी राजकारणासाठी काँग्रेस पक्षाची निवड केली. चेतना पांडे या तीन वर्षांपासून काँग्रेस पक्षाच्या सदस्या म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी २०१९ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

काँग्रेसच्या प्रियांका गांधी यांनी यंदा निवडणूक धोरणात महिला कार्ड टाकल्याने डॉ. सुरहिता करीम  यांच्या नावाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. पण डॉ. सुरहिता करीम यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. त्यानंतर डॉ.चेतना पांडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असल्याचं बोललं जातंय.

डॉ. चेतना पांडे गोरखपूरच्या विकासाच्या मुद्द्यावर योगी आदित्यनाथ यांना आव्हान देणार आहेत. योगी आदित्यनाथ हे बाहेरचे आहेत, यावेळी गोरखपूरच्या मुलीला संधी मिळायला हवी, असं त्यांचं म्हणणं आहे. गोरखपूरमधील अनेक गावं अजूनही पक्के रस्ते आणि सुविधांसाठी आसुसलेली आहेत. हलक्या पावसातही गोरखपूर शहरात पूर येतो. भाजपही या मुद्द्यांवर बोलण्यास टाळाटाळ करत आहे, असं म्हणत त्यांनी योगींना टक्कर देण्याची तयारी केली असल्याचं जाहीर केलंय.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.