‘नो स्मोकिंग’ बनवणाऱ्या अनुरागला सिगरेट सोडायला २५ वर्षे लागली.
“Everyday thousands of people quit smoking, by dying ”
अनुराग कश्यपच्या ‘नो स्मोकिंग’ चित्रपटातील हे प्रसिद्ध वाक्य.
अनुराग आणि सिगरेटचं अतूट असं नात आहे. त्याच्या चित्रपटात सिगरेटचा झुरका मारणारी एखादी व्यक्तिरेखा जर सापडली नाही तर आपल्याला आश्चर्याचा धक्काच बसेल. अनुराग आणि सिगरेटचं अॅडीक्शन ही काही लपून राहिलेली गोष्ट नाही. त्यामुळे अनुराग कश्यपने सिगरेट सोडल्याची पोस्ट इन्स्टाग्रामवर टाकली आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली.
अनुरागनेच सांगितल्याप्रमाणे वयाच्या १९ व्या वर्षीपासूनच त्याला सिगारेटची सवय लागली. तेव्हाचपासूनचा सिगरेट सोबतचा त्याचा याराना. सिगरेट पिणं शरीरासाठी अपायकारक असल्याचं अनुरागने कधीही नाकारलं नाही, उलट ‘नो स्मोकिंग’ सारखा चित्रपट त्याने खास याच विषयावर बनवला. त्या काळातही त्याला विचारण्यात आलं होतं की जी गोष्ट तू स्वतः करू शकत नाहीस ती गोष्ट इतरांना कसा काय सांगू शकतोस?
तेव्हाही त्याचं म्हणणं असंच होतं की,
“मला अजूनही मी ओढलेल्या पहिल्या सिगरेटबद्दल पश्चाताप होतो. मुलींवर इम्प्रेशन झाडण्यासाठी सुरु केलेली ही गोष्ट कधी व्यसन बनून बसली हे माझंच मला कळल नाही. आजही माझे जे काही मेडिकल इशूज आहेत ते सर्व सिगरेटमुळेच आहेत. पहिली सिगरेट ओढणाऱ्या तरुण-तरुणींसाठी मी हा चित्रपट बनवला आहे.”
‘नो स्मोकिंग’ हा काही सरळसोट व्यसनाधीनतेविरुद्ध संदेश देणारा टिपिकल पिक्चर नव्हता. यातले बरेच प्रसंग अंगावर येतात. का कुणास ठाऊक पण संपूर्ण चित्रपटभर सिगरेटच्या धुराचा वास पसरला आहे असंच वाटत राहत. सिगरेटची ‘लत’ लागलेला जॉन अब्राहम आणि त्याची सिगरेट सोडवण्यासाठी मागे लागलेला परेश रावलचा बंगाली बाबा यांची ती कहाणी.
व्यसनी माणसाच्या मानसिक स्थितीबद्दल विचारात पडायला लावणारा हा पिक्चर त्या काळात चालला नाही. आजही समजायला अवघड असा उल्लेख याच्याबद्दल केला जातो. भारतीय चित्रपट सृष्टीतला एक वेगळा प्रयोग म्हणून ओळखल्या जाणऱ्या या पिक्चरच्या अपयशाचा अनुरागवर खूप मोठा परिणाम झाला.
अनुरागच्या मते तो त्याकाळात कटू स्वभावाचा बनला होता. आयुष्यातला विरोधाभास म्हणजे या काळात तो जास्त व्यसनाधीन बनला.
दारू-सिगरेट-ड्रग्ज यांच्या विळख्यात तो अडकला आणि यातच त्याचा बायकोशी घटस्फोट झाला.
जेव्हा सेन्सॉर बोर्डाने पिक्चरमधल्या ज्या ज्या सीनमध्ये सिगरेट दाखवली आहे त्या त्या सीनच्या खाली “Cigarette smoking is injurious to health” हा संदेश दाखवणे कंपल्सरी केले तेव्हा अनुरागचा ‘अग्ली’ नावाचा पिक्चर रिलीज होत होता. अनुरागने तो संदेश वापरायला नकार दिला. सेन्सोर बोर्डाच्या या निर्णयाविरोधात तो कोर्टात गेला.
सिगरेट ओढणं हे कितीही चुकीचं असलं तरी मानवी सवयीचा तो भाग आहे आणि पिक्चरमध्ये मेसेज लिहिला म्हणून ती सवय बदलणार नाही असा त्याचा युक्तिवाद होता. उद्या पिक्चरमध्ये खून दाखवला तर “खून करणे समाजासाठी अपायकारक आहे” असा संदेश सीनच्या खाली लिहायला लावणार का हा प्रश्न त्याने सेन्सॉर बोर्डाला विचारला.
पुढे अनुरागला एक पाउल मागे घ्यावे लागले आणि पिक्चर रिलीज झाला, पण सिगरेटच्या वादाने अनुरागची पाठ काही सोडली नाही. ‘अग्ली’ असो ‘देव डी’ असो ‘गँग्स ऑफ वासेपूर’ असो किंवा ‘रमण राघव’ अशा कित्येक चित्रपटात सिगरेट आहेच.
एक वेळ अशी आली होती की त्याचं ‘चेन स्मोकर’ असणं हे धोक्याच्या पातळीला जाऊन पोहचलं होतं. जवळच्या अनेकांनी त्याला याबद्दल सावध करण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी २५ वर्षापासून त्याला साथ देणारी सिगरेट त्याने सोडली.
या ‘ब्रेकअप’नंतर च्या ४० दिवसांनी त्याने हे जाहीररीत्या पोस्ट टाकून मान्य केलं.
सिगरेट तुम्हाला कणाकणाने मारते एवढंच नाही, तर ती तुम्हाला दैनंदिन जीवनात गुलाम करून टाकते. आज अनुराग कश्यपचा ४६ वा वाढदिवस. सिगरेट सोडून त्याने स्वतः च्या आयुष्यात नक्कीच काही दिवस वाढवले आहेत.
तुम्ही तुमचं आयुर्मान कधी वाढवताय..?
हे हि वाच भिडू.
- बॉलीवूडला कात टाकायला भाग पाडणारं मंडी हाऊस आहे तरी काय ?
- लोकलमध्ये शेजारी येवून बसणारा मुंबईवर राज करणारा भिकू म्हात्रे असू शकतो हे सत्या नं सांगितलं.
- तो सीन बघताच लक्षात आलं होतं फिल्मइंडस्ट्रीमध्ये नवा लंबी रेस का घोडा आला आहे.