गोव्यात दरवेळी किंगमेकर ठरणाऱ्या महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचा इतिहासही डीप आहे…

१० मार्च २०२२. भारत-पाकिस्तान मॅच नसली तरी सगळ्या देशाचं लक्ष टीव्हीकडं. लोकसभेची सेमीफायनल, राजतिलक का पैगाम असल्या खुंखार हेडलाईन्स डोळ्यांना दिसत होत्या. आता पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आहेत म्हणल्यावर तेवढं तर चालायचंच भिडू. उत्तरप्रदेश आणि पंजाबच्या निकालांच्या धुराळ्यात आपलं लाडकं गोवा मात्र बाजूला राहिलं. पारो आणि पार्टीच्या पलीकडं गोव्याचं राजकारणही डिपाय.. आणि ते सध्या घुमतंय दोन आमदार निवडून आणलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी भोवती.

विषय असा झालाय की, गोव्याची मॅजिक फिगर आहे २१. तिकडं जरा एक-दोन जागेनं फिगर हुकली की सारंगखेड्याला लाजवेल असा घोडेबाजार सुरू होतो. तिकडं कोण कुणाशी आघाडी करणार याची गणितं मंडळी जातात आणि त्यात किंगमेकर असते, 

महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी.

सध्याच्या निकालाचं काय झालंय?

भाजपनं २० जागांवर विजय मिळवल्यावर त्यांचा सत्तास्थापनेचा मार्ग दमदार झालाय, त्यात सध्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार प्रमोद सावंत यांनी भाजप अपक्षांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करु शकतं असा दावा केला. ११ जागा मिळवणारी काँग्रेस महाविकास आघाडीसारखा प्रयोग करणार का अशा चर्चाही होत्या.

 मात्र भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी, ‘अपक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीच्या (एमजीपी) आमदारांना सोबत घेऊन भाजप गोव्यात सत्तास्थापन करणार,’ असा दावा केला आणि काँग्रेसच्या आधीच विरळ असलेल्या आशाही संपुष्टात आल्या.

वाचायला साधं सोपं वाटत असलं, तरी यातही एक ट्विस्ट आहे-

निकालाच्या आदल्या दिवशी एमजीपीचे नेते, माजी मंत्री आणि आमदार सुदीन ढवळीकर यांनी एनडीटीव्हीशी बोलताना, ‘आम्ही आणि तृणमूल काँग्रेस एकत्र येऊन सत्तास्थापन करु. जर कुणाला पाठिंबा देण्याची गरज पडली, ज्यांच्यासोबत युती आहे त्या टीएमसीशी बोलणी करुनच निर्णय घेऊ.’ काही दिवसांपूर्वी ढवळीकर म्हणाले होते, ‘प्रमोद सावंत यांना पुन्हा मुख्यमंत्री बनू देणार नाही.’ पण निकालानंतर काही तासांतच हिंदी सिरीअलमध्ये असतात तसले ट्विस्ट गोव्याच्या राजकारणात पाहायला मिळालेत.

हा झाला वर्तमानकाळ, पण एमजीपीचा इतिहासही मोठ्ठा आणि मराठी माणसाला अभिमान वाटावा असा आहे…

गोवा पोर्तुगीजांच्या अधिपत्यामधून स्वतंत्र झालं ते १९६१ मध्ये. त्यानंतर १९६३ मध्ये गोव्यात निवडणुका झाल्या आणि पहिले मुख्यमंत्री बनले महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे दयानंद बांदोडकर. एमजीपीनं जवळपास १६ वर्ष गोव्याची सत्ता राखली. दयानंद बांदोडकर हेच एमजीपीचे संस्थापक होते. त्यांनी गोव्यातल्या ब्राह्मणेतर हिंदूंची, मागासवर्गीय समाजाची मोट बांधून एमजीपीचा बेस तयार केला.

महत्त्वाचा संघर्ष

१९७९ पर्यंत सत्तेत असणाऱ्या एमजीपीचा आणि युनायटेड गोवन्स पार्टीचा संघर्ष चांगलाच गाजला. महाराष्ट्रवाडी गोमंतक पार्टी हे नाव घेण्यामागची पक्षाची भूमिका होती, की सारखीच संस्कृती असल्यानं गोव्याचं महाराष्ट्रात विलीनीकरण व्हावं आणि गोव्याची राजभाषा ही मराठी असावी. त्यांना विरोध  करणारी युनायटेड गोवन्स पार्टीही ख्रिश्नन बहुल होती आणि त्यांचा आग्रह होता की गोवा स्वतंत्र असावं आणि राजभाषा कोंकणी असावी. 

दयानंद बांदोडकर यांनी मात्र मराठी आणि महाराष्ट्राचा आग्रह लावून धरला होता. हा मुद्दा इतका तापला की १९६७ मध्ये या प्रश्नावर गोव्याच्या जनतेचं सार्वमत घेण्यात आलं, त्यात लोकांनी गोवा स्वतंत्र असावं आणि राजभाषा कोकणी असावी असा कौल दिला. १९८७ मध्ये गोव्याला राज्याचा दर्जा मिळाला आणि तिथलं राजकारण बदललं.

१९८९ च्या निवडणुकीत १८ आणि १९९४ च्या निवडणुकीत १२ जागा जिंकत एमजीपीनं चांगलं यश मिळवलं खरं, पण १९९९ नंतर भाजपचं गोव्यातलं प्राबल्य वाढलं, बांदोडकर यांनी रुजवलेला भाषा आणि अस्मितेचा जोरही ओसरला होता, त्यामुळं एमजीपीला सातत्यानं एकेरी आकड्यांमधलं यश मिळत गेलं. २०१२ पर्यंत त्यांनी बहुतांश निवडणुकांमध्ये काँग्रेससोबत युती केली होती. मात्र २०१२ नंतर त्यांनी स्वतंत्र लढण्यावर भर दिला.

२०१७ चं राजकारण

विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष ठरला, पण मॅजिक फिगर गाठण्यासाठीचं बहुमत त्यांच्याकडे नव्हतं. त्यांच्या हालचाली पूर्ण होईपर्यंत भाजपनं एमजीपी आणि अपक्षांना हाती घेत संधी साधली. पक्षाचे सर्वेसर्वा सुदीन ढवळीकर यांना भाजपनं कॅबिनेट मंत्रीपदही दिलं, मात्र २०१९ मध्ये प्रमोद सावंत यांनी, ‘ढवळीकर सातत्यानं भाजप विरोधात वक्तव्य करतात,’ असं सांगत त्यांना मंत्रीमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला. 

२०१७ मध्ये एमजीपीचे ढवळीकर धरुन तीन आमदार निवडून आले होते, उरलेल्या दोघांनी एमजीपीला रामराम ठोकत भाजप गाठली.

२०२२ – इथे ओशाळल्या टीव्ही मालिका

एमजीपी आणि तृणमूलनं ही निवडणूक सोबत लढवली, पण तृणमूलची पाटी कोरी राहिली आणि एमजीपीला मिळाल्या २ जागा. तृणमूलसोबत सत्तास्थापन करण्याचा पत्ता तर कट झाला, पण ज्या प्रमोद सावंतांसोबत सत्ता स्थापन करणार नाही असं सुदीन ढवळीकरांनी जाहीर केलेलं, त्यांच्याच भाजपला एमजीपीनं निकालाच्या रात्रीच पाठिंबा दिलाय. त्यातच ‘प्रमोद सावंतच मुख्यमंत्री राहतील का हे माहीत नाही,’ असं वक्तव्य भाजप मंत्री विश्वजित राणे यांनी केलंय. म्हणजे भाजपमधलं अंतर्गत राजकारण वेगळंच आहे.

त्यामुळं गोव्याच्या राजकारणात टीव्ही मालिकांना लाजवेल असा आणखी एखादा ट्विस्ट येण्याची आणि ढवळीकर यांची मोठी मागणी मान्य होण्याची शक्यता अजूनही नाकारता येत नाही. त्यामुळं २०१७ असेल किंवा २०२२, आमदारांची संख्या भले दोन-तीन असली तरी सुदीन ढवळीकर आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी सत्तेचे फासे आपल्या हातात ठेवतायत आणि त्यांचं दान आपल्याबाजूनं पाडण्यासाठी प्रयत्नही करतायत हे नक्की…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.