पैसा मिळवणं हे मुख्य धोरण तरीही टाटांनी गुड कॅपिटलिस्ट ही इमेज कशी सेट केली…?
माणसाच्या खिश्यात रुपाया नसला तरी चाललं पण एक प्रश्न मात्र डोक्यात असतोय. तो म्हणजे टाटा श्रीमंत आहेत की अंबानी. म्हणजे हा प्रश्न प्रत्येक माणसाला पडलेलाच असतोय. आत्ता काही महिन्यापूर्वी आम्ही त्यावर एक लेख लिहून सांगितलेलं दोघांच्यात कोण श्रीमंत आहे ते. याच लेखात एक संदर्भ होता. तो असा की टाटा श्रीमंत की अंबानी हाच प्रश्न एकदा टाटांना विचारण्यात आलेला. तेव्हा रतन टाटा म्हणालेले,
ते आर बिझनेसमॅन वी आर इंण्ड्रस्टिएलिस्ट
आत्ता तुम्ही म्हणाल आत्ता हे का सांगतोय. तर मुद्दाय युक्रेन रशिया युद्धाचा. काय झालं या युद्धामुळे भारताचे विद्यार्थी रशियात अडकून पडले. त्याची अनेक कारणं होती.
त्यातलं प्रमुख कारण होतं ते म्हणजे अशा परिस्थितीत एअर इंडियाने तिकीटांचे रेट दुप्पट केले.
आत्ता आपल्या जनतेने एअर इंडिया गुड कॅपेटॅलिस्ट टाटांकडे एअर इंडिया गेल्यानं जल्लोष केलेला. या सगळ्यांच्या जल्लोषावर पाणी पडलं.
लोकं म्हणायला लागले बघितलं का भांडवलदार भांडवलदारच असतो. पैसा छापणं हाच प्रमुख उद्योग असतो त्यांचा…
झालं आत्ता टाटा समुहाच्या आजवर सगळ्या कर्मावर बोळा फिरवायची वेळ आली. पण “देश का नमक टाटा” ही टाटांची इमेज झाली तर कशी हे पाहणं महत्वाचं आहे..त्यासाठीच हा लेख आहे.
तर सुरवात होते ती इतिहासातून…
” टाटा यांनी जे काही केले त्यात त्यांनी कधीही स्वार्थ पाहिला नाही “
महात्मा गांधी.होय हे वाक्य खुद्द महात्मा गांधी म्हणाले होते. महात्मा गांधी हे आयुष्यभर भांडवलशाहीच्या विरोधात राहिले. पण टाटांच्या बाबतीत त्यांची मते वेगळी होती. टाटांचे संस्थापक जमशेदजी टाटा यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त गांधींनी १९०५ मध्ये आपल्या इंडियन ओपिनियन या वृत्तपत्रातमध्ये हे वाक्य लिहलं होतं. इतकच नाही तर गांधींनी टाटा स्टीलच्या कामगारांचा संप सोडवण्यासाठी १९२५ मध्ये जमशेदपूरला भेट दिली होती.
आत्ता विरोधाभास हा की एकिकडे टाटा समुह हा भांडवलशाही होता. साहजिक तत्कालिन व्यवस्थेसोबत त्यांना ॲडजेस्टमेंट करणं गरजेचं होतं. साहजिक टाटा समुह आणि ब्रिटीश व्यवस्था यांचे चांगले संबंध होते. पण सोबत टाटा महात्मा गांधींच्या आश्रमाला देणग्या देखील देत. देशविधायक कामांना सपोर्ट करत. अशा देणग्यांची यादीच टाटांच्या वेबसाईटवर पहायला मिळू शकते. दूसरीकडे महात्मा गांधी ताज हॉटेलला दिलेल्या भेटी देखील टाटांनी नोंदवून ठेवल्या आहेत.
थोडक्यात काय देश या देशासाठी या गोष्टींसोबत टाटांनी नेहमीच स्वत:ला जोडून घेतलय.
दूसरा मुद्दा झाला तो किमान नैतिकतेचा.
टाटांनी आपल्या व्यवहारात नैतिकता जपली. म्हणजे टाटांनी भारतीय मानसिकतेत असणाऱ्या नैतिकतेचा ब्रॅण्ड केला. या बद्दल खुद्द जेआरडी टाटांना एक प्रश्न करण्यात आला होता. जेव्हा भारतात खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण नव्हतं तेव्हाच्या काळात म्हणजे परवाना राजच्या काळात रिलायन्स सारख्या कंपन्या शून्यातून उभारल्या. त्यासाठी बऱ्याचदा नियम वाकवण्यात आले. पळवाटा शोधण्यात आल्या. मात्र टाटा यापासून लांब राहिले किंवा तस वातावरण तयार करण्यात ते यशस्वी ठरले.
तर मुद्दा असा की जेआरडी टाटांना जेव्हा प्रश्न विचारला की तुम्ही लायसन्स राजच्या काळात ज्या वेगाने इतर कंपन्या वाढल्या त्या वेगाने का वाढला नाहीत तेव्हा जेआरडी टाटांच विधान होतं,
टाटा नेहमी नियमानुसार वागतात…
आत्ता ही झाली लांबड.लिहता लिहता उगी फिलॉसॉफिकल टच आला. मुळ मुद्दा आहे तो टाटांनी प्रॅक्टिकल लेव्हलला काय काम केलय की ज्यामुळे चांगला भांडवलदार म्हणून त्यांची इमेज सेट झाली. त्यासाठी खालचा डेटा बघितला पाहीजे,
सायन्स, फंडामेंटल रिसर्च, कॅन्सर संशोधन, सोशल सायन्स, आर्टस् अशा क्षेत्रात टाटांनी संस्थात्मक उभारणी केली हे सत्य आहे. ब्रिटीश भारतात व स्वातंत्र्य भारतात टाटांनी आपल्या उद्योग व्यवसायासोबत शैक्षणिक संस्थांचा पाया रचला. साहजिक अशा संस्थामधून उच्चशिक्षण घेणाऱ्यांच्या पिढ्याच टाटांनी देशाला दिल्या. विशेष म्हणजे अशा क्षेत्रामध्ये काम करताना टाटांनी त्याचं बाजार मांडला नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर कोकिलाबेन हॉस्पीटल आणि टाटा कॅन्सर हॉस्पीटलच बघता येईल.
आत्ता हे सांगण्यासाठी मोठ्या लोकांच्या भाषेत सांगायचं झालं तर टाटा द ग्लोबल कॉर्पोरेशन दॅट बिल्ड इंडियन कॅपिटलिझम या पुस्तकात मिर्सिया रायनू सांगतात,
परोपकाराच्या संस्थात्मकीकरणामुळे जी सॉफ्ट पॉवर तयार होते ती टाटांना धंदा करण्याचा एक सामाजिक लायसन्स देते.
यातूनच “टाटा” देश का नमक सारखा ब्रॅण्ड तयार होतो. मग अशा वेळी अनेक गोष्टी उभारल्या जातात. उदाहरणच द्यायचं झालं तर भारतीयांना ५ स्टार हॉटेलमध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणून ताज हॉटेल उभारण्याची गोष्ट. सत्ताकेंद्राबरोबर सुरक्षित अंतर ठेवून व्यवहार जपणे हे टाटांना जमलं आहे.
अदानी किंवा अंबानी सत्ताकेंद्राच्या अतीजवळ असतात किंवा सहारा समुहासारखे उद्योग सत्ताकेंद्राच्या अगदी दूरवर जातात. पण योग्य अंतर टाटा राखून असतात. उदाहरण सांहायचं तर खुद्द जेआरडी टाटांनी आणिबाणीची स्तुतीच केलेली. रतन टाटा देखील मोदींची स्तुती करताना दिसतात. अगदी महात्मा गांधींपासून ते जयप्रकाश नारायण आणि मिनु मसानी यांच्यापर्यन्त टाटा हितसंबंध जपूनच राहिले असा इतिहास सांगतो.. नवल टाटांचा लोकसभा लढवण्याचा अयशस्वी प्रयत्न सोडला तर सत्तेपासून योग्य अंतर टाटांनी व्यवस्थित राखलं.
पण याचा अर्थ टाटा वादापासून लांब राहिले असा आहे का …
तर नाही. १९९६ मध्ये गोपाळपूर ओडिशा येथे प्रतिस्पर्धी गटाकडून एका युनियन नेत्याची हत्या करण्यात आली होती आणि १९८९ मध्ये महाराष्ट्रातील टेल्को प्लांटवर झालेला संप वादग्रस्त होता.
२००६ मध्ये ओडिशातील कलिंगनगर येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात डझनभर आदिवासी आंदोलकांचा मृत्यू झाला. आणि स्थानिक समुदायाच्या विरोधामुळे टाटाला २००८ मध्ये पश्चिम बंगालमधील सिंगूर येथून गुजरातमधील सानंद येथे ऑटो प्लांट हलवावा लागला.
अगदी हल्लीच उदाहरण सांगायचं झालं तर राडीया टेप प्रकरण.आसाम गण परिषेदेचे प्रफुल्ल महातो यांनी टाटा उल्फा या अतिरेकी संघटनेबरोबर हातमिळवणी करण्याचा आरोप लावला होता. टाटा समूहाचे व्यवस्थापक ब्रोजेन गोगोई यांनी ULFA च्या कल्चरल सचिव प्रणती डेका यांच्यासोबत वैद्यकीय उपचारांसाठी मुंबईला प्रवास केला होता, ज्याचा खर्च टाटा टी ने उचलला होता.
पण टाटांच्या सामाजिक ब्रॅण्डसमोर अशा बातम्या जास्त काळ टिकल्या नाहीत. काळ जसा जसा सरकत पुढे गेला तशा तशा टाटांची गुड कॅपेटेलिस्ट हीच इमेज निर्विवादपणे सेट होत गेली.
हे ही वाच भिडू :
- पुतीन यांना आजही त्यांच्या स्वप्नातला सोव्हिएत रशिया पुन्हा उभा करायचा आहे.
- काश्मीर प्रश्न असो की गोवा, रशियासारखा देश UN मध्ये भारताच्या मागे होता म्हणूनच…
- २००४ मध्ये चालून आलेलं मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीने का सोडलं होतं?