नयनतारा सहगलचा आवाज दाबणे इंदिरा गांधीला सुद्धा जमले नव्हते.

भिडू काय हो तुमचं नेहरू गांधी शिवाय दिवस पुढ जात नाही काय? होय काय करायचं? आमच्या पंतप्रधानांच भाषण नेहरू गांधी शिवाय पुढ सरकत नाही तर आम्ही कोण त्यांच्यासमोर ? अहो आयुष्यभर जे या घराण्याला शिव्या घालत निवडून येतात त्यांच्या पण पक्षामध्ये गांधीची सून आणि पोरगा मंत्री संत्री आहेत.

तर तुम्हाला सांगायला आम्हाला आज आनंद वाटतो की याच नेहरू-गांधीच्या रक्ताची एक व्यक्ती होती. जिच्याकडे आणीबाणीच्या काळात खुद्द इंदिरा गांधीला ताई तुझी ही हुकुमशाही आणि घराणेशाही बास असं सांगण्याचा दम होता. ऐकून धक्का बसला ना?

तो काळ होता जेव्हा मोठी मोठी भाषणे ठोकणारे नेते इंदिरा गांधीनी झुकायला सांगितल्यावर गुढघ्यावर रांगत होते आणि तेव्हा त्यांची आत्येबहीण इंदिरा गांधीवर सगळ्यात मोठी टीका करत होती. तिचं नाव नयनतारा सहगल.

जवाहरलाल नेहरूंची लाडकी बहीण विजयालक्ष्मी पंडीत. त्यांच्याप्रमाणेच स्वातंत्र्यलढ्यात खूप वर्षे तुरुंगात काढली. अशा वेळी आनंदभवन या नेहरूंच्या घरात इंदिरा आणि नयनतारा एकत्र वाढल्या.

nayanthara 621x414
तरूणपणीच्या नयनतारा सहगल आणि इंदिरा गांधी

विजयालक्ष्मी यांचे पती रणजीत सीताराम पंडीत जे स्वतः मराठी आणि संस्कृत भाषेतले पंडीत होते तेसुद्धा स्वातंत्र्ययुद्धात भाग घेतल्यामुळे तुरुंगात होते. बरेलीमध्ये  तुरुंगावास भोगत असताना त्यांना दुर्धर आजाराने घेरले. जेलमध्ये त्यांच्यावर कोणतेही उपचार झाले नाहीत. अगदी हाडाचा सापळा उरलेल्या रणजीत पंडीत यांना भेटायला विजयालक्ष्मी तुरुंगात गेल्या.

त्यावेळी स्ट्रेचरवरून त्यांना भेटायला आलेल्या त्यांच्या पतीने त्यांना निक्षून सांगितले ,

” काहीही झाले तरी माझ्यासाठी ब्रिटीश सरकारकडे माफीची याचना करायची नाही. गांधी आणि नेहरू या सिंहाच्या साथीने मी लढलो आहे. मगआता मी भित्र्या कोल्ह्याप्रमाणे वागावे असे तुला वाटते का?”

अशा या वाघाचं रक्त नयनतारा यांच्यासुद्धा धमन्यांमध्ये खेळतय.

कधीही तत्वासाठी तडजोड त्यांनी केली नाही. आणिबाणीच्या काळात पेपरमध्ये कॉलम लिहून नयनताराने इंदिरा आपल्या वडिलांच्या लोकशाही मुल्यांपासून लांब जात आहे या टीकेची झोड उठवली. इंदिरा गांधी त्यांच्यावर चिडून असायच्या पण त्याचा कधीही नयनताराना फरक पडला नाही. ती लेखिका होती आणि लेखिकाच राहिली. पण कधीही राजकारणात उतरली नाही.

 सोनिया गांधीना सुद्धा त्यांनी २०१४च्या निकालानंतर पोराच्या प्रेमापायी देशावर घराणेशाही लादू नको असं स्पष्ट शब्दात सांगितलं होत.

चुकीची गोष्ट घडत असेल तर हात बांधून बघत बसने हे संस्कारच नयनतारा सहगल वर झाले नव्हते. म्हणूनच जेव्हा २०१५ मध्ये विचारवंत आणि साहित्यिकांवर हल्ले होऊ लागले तेव्हा त्याचा त्यांनी निषेध  म्हणून त्यांनी आपल्याला मिळालेला साहित्य अकादमी पुरस्कार परत केला.

आज नयनतारा सहगल ९१ वर्षाच्या आहेत. आज पण आपले विचार खणखणीत मांडतात. त्यांना यावर्षीच्या यवतमाळमध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बोलवण्यात आलं होत. पण नंतर मराठी साहित्यवीरांनी ऐनवेळी त्यांच भाषण रद्द केलं.

काही जण म्हणतायत की त्या इंग्रजी लेखिका आहेत म्हणून त्यांच भाषण रद्द केलं. पण यापूर्वीच्या संमेलनात मराठी सोडून अनेक भाषेतलं साहित्यिक येऊन आपले विचार मांडून गेले आहेत यामुळे भाषेचा मुद्दा गैरलागू आहे.

नयनतारा सहगल यांचे वडील मुळचे रत्नागिरीचे असल्यामुळे त्यांचे मराठी मातीशी नातेही आहे. मग त्यांचे भाषण रद्द करण्याचं कारण काय हा प्रश्न उरतो. काहीजण म्हणतात की त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयीचे विचार आजकाल अनेकांना पचणारे नाहीत म्हणून त्यांचे भाषण रद्द करण्यात आले आहे.

भाषण रद्द करून नयनतारा सहगल चा आवाज दाबता येईल असं कोणाला वाटत असेल तर त्यांना लक्षात नाही खुद्द इंदिरा गांधीला जे जमलं नाही ते संमेलनाचे इव्हेंट साजरे करणाऱ्याना कसे जमेल?

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.