बीडच्या कंकालेश्‍वर मंदिराच्या खांबांची मोजणी प्रत्येकवेळी वेगवेगळी येते…

मराठवाडा, महाराष्ट्रातला काहीसा दुर्लक्षित असलेला भाग अशी हाक ऐकायला मिळते. पण भिडू हा भाग तितकाच समृद्ध सुद्धा आहे. मग तो भाषेच्या बाबतीत असो, किंवा इतिहासाच्या आणि पौराणिक गोष्टींच्या बाबतीत. तिथल्या लेण्या, ऐतिहासिक इमारती बघून मराठवाड्याला आपली ऐतिहासिक ओळख सांगायची गरज पडत नाही. याच ऐतिहासिक वारश्यात आणखी एक भर म्हणजे कंकालेश्वर मंदिर.  

 बीड शहरातलं  हे कंकालेश्वर मंदिर यादव काळातील असल्याचं म्हटलं जातं. त्याला बीडच ग्रामदैवत सुद्धा म्हटल जात. म्हणजे पार १५०० वर्ष जुनं. ८४ मीटर चौकोनी आकाराच्या तलावाच्या मधोमध हे शिव मंदिर, बिंदुसरा नदीच्या काठावर उभं आहे. चारही बाजूने भर भक्कम आणि नक्षीदार खांब या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.  

असं म्हणतात की, १० ते ११ व्या शतकात चालुक्य राजा विक्रमादित्य सहावा यानं हे मंदिर बांधले. हे दशावतारी मंदिर आहे. चालुक्य काळातील स्त्रिया लढाईत प्रत्यक्ष भाग घेत असायच्या, त्यामुळे या मंदिरावर लढणार्‍या स्त्रियांचं सुद्धा शिल्पकाम करण्यात आलंय. या कंकालेश्वर मंदिरात आणि त्यांच्या स्तंभावर ग्रीक शिल्पकलेची छाप पाहायला मिळते. आणि फक्त हिंदूच नाही तर जैन धर्मियातील आर्यनाथ, नेमिनाथ या दोन तीर्थंकरांचे शिल्पही या मंदिरावर सापडतात. 

कंकालेश्वर मंदिर जरी पुरातन काळातलं असलं तर ते अनेक वर्ष बंद होतं. फक्त महाशिवरात्रीच्या यात्रेला तिथं गर्दी पाहायला मिळायची. पण पुढे महाशिवरात्रीच्या जत्रेलाही बंदी घालण्याचा निर्णय निझामाच्या मंत्रिमंडळानं घेतला. निझामाने सरकारी हुकूम काढून शामबुवा पाठक या पुजार्‍यास मंदिरात पूजेसाठी नियुक्त केले.  

दरम्यान, क्रांतिकारी तरुण पुरुषोत्तम गोडसे याने निझामाच्या या हुकूमाला भीक न घालता पोलिसांचा बंदोबस्त मोडीत काढून कंकालेश्वर मंदिरातील पिंडीला अभिषेक घातला होता, यानंतर त्यांच्यावर कारवाई सुद्धा झाली. तसं पाहिलं तर आपला देश १५ अगस १९४७ साली स्वतंत्र झाला. पण मंदिर खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालं ते १७ सप्टेंबर १९४८ साली म्हणजे हैदराबाद स्वातंत्र्यदिनादिवशी.  

जसं प्रत्येक ऐतिहासिक गोष्टीबाबत जशा दंतकथा प्रसिद्ध असतात तशा या मंदिराबाबत सुद्धा आहेत. म्हणजे जसं कि आपण आधी म्हटलं हे मंदिर चालुक्य राजा विक्रमादित्यने बांधलं होत, तर कोणी म्हणतं असुराने बांधलंय. 

 पण या कंकालेश्वर मंदिराबाबत स्थानिक लोकांकडून एक इंटरेस्टिंग गोष्ट कायम सांगितली जाते. असं म्हणतात या मंदिराच्या खांबाची मोजणी प्रत्येक वेळी वेगवेगळी येते. म्हणजे तुम्ही जर मंदिराच्या चारही बाजूचे खांब एकदा मोजले आणि दुसऱ्यांदा परत मोजायला गेलात तर पहिल्यांदा मोजलेल्या आकड्यापेक्षा आकडे जास्त तरी असतील किंवा कमी तरी. 

तिथं येणारे भाविक हे खांब मोजून आकडा बरोबर यावा म्हणून त्या खांबावर खडूने आकडे सुद्धा टाकतात. पण तरी सुद्धा मोजणी कमी-जास्तच होत असते, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. एवढंच नाही तर तिथले गावकरी सांगतात कि, बीडच ग्रामदैवत असणाऱ्या या मंदिराच्या खाली एक रहस्यमय एक तळघर आहे, हे इत्येक वर्षांपासून बंद आहे. आजपर्यंत तिथं कोणीच गेलं नाहीये. असं म्हणतात तिथी अनेक रहस्य दडलेली आहेत.

ते काही असलं तरी तुम्ही बीडला कंकालेश्वर मंदिरात गेलात, तर खांब मोजायला तेवढं विसरु नका.

 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.