उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त ‘ठाकरे’ शिंदेंच्या मंचावर ; अशी आहे ठाकरे कुटूंबाची वंशावळ

शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आणि बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दसरा मेळावा पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याच्या हजेरी लावली, ती ठाकरे घराण्यातल्या तीन जणांनी.

एक होते जयदेव ठाकरे, दुसऱ्या होत्या स्मिता ठाकरे आणि तिसरे होते निहार ठाकरे. या मेळाव्यात जयदेव ठाकरे यांनी स्टेजवर हजेरी लावत, आपलं मनोगत व्यक्त केलं आणि एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा असल्याचंही जाहीर केलं.

त्यानंतर एकनाथ शिंदेंनी स्टेजच्या खाली असलेल्या स्मिता ठाकरे आणि निहार ठाकरे यांना सन्मानपूर्वक स्टेजवर आणण्याचे आदेश आपल्या मंत्र्यांना दिले.

दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात स्वतः उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे वगळता इतर ठाकरे कुटुंबीय दिसून आले नाहीत. त्यामुळं माणसं कमेंट करुन विचारू लागली की ठाकरे कुटूंबात नक्की किती सदस्य आहेत? अन् कोण कोणाचा कोण लागतो? बरं यातले उद्धव ठाकरेंच्या सोबत कोण आहे?

म्हणूनच ठाकरे कुटूंबाची वंशावळ सांगण्यासाठी हा लेख..

ठाकरे कुटूंबाच मुळ आडनाव धोडपकर. प्रबोधनकारांचे पणजोबा कृष्ण माधव धोडपकर हे रायगडच्या पालीत रहायचे. पुढे प्रबोधनकारांचे आजोबा रामचंद्र धोडपकर हे पनवेलमध्ये स्थायिक झाले. इथे त्यांनी आपले मुळ आडनाव धोडपकर सोडून पनवेलकर आडनाव लावण्यास सुरवात केली.

प्रबोधनकार देखील स्वत:चे आडनाव धोडपकर असंच लावीत. पण पुढे ब्रिटीश लेखक विल्यम मेकपीस थॅकरे यांच्या प्रभावातून त्यांनी आपलं आडनाव पनवेलकर वरून ठाकरे असं केलं.

त्यामुळेच ठाकरे कुटूंब ठाकरे आडनावाचं स्पेलिंग THAKARAY अस न लिहता ते इंग्लिश उच्चाराप्रमाणे THACKERAY अस लिहतं..

केशव सिताराम ठाकरे अर्थात प्रबोधनकार ठाकरे यांचा विवाह झाला तो रमाबाई ठाकरे यांच्यासोबत. प्रबोधनकार ठाकरे व रामाबाईंना 5 मूली आणि 3 मुलं. पमा टिपणीस, सरला गडकरी, सुशिला गुप्ते, संजीवनी करंदीकर आणि सुधा सुळे अशा या पाच मुली. तर प्रबोधनकरांना तीन मुलं – बाळासाहेब ठाकरे हे सर्वात थोरले, त्यांच्या पाठचे श्रीकांत ठाकरे आणि रमेश ठाकरे.. 

प्रबोधनकारांच्या तीन मुलांपैकी एक रमेश ठाकरे हे अविवाहीत राहिले. ते कधी राजकारणाच्या पटलावर चर्चेत आले नाहीत. १९९९ साली वयाच्या ६० व्या वर्षी त्यांच निधन झालं.

उरले बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे हे दोन भाऊ. यातील पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरेंची वंशावळ पाहू…

बाळासाहेब ठाकरेंचं लग्न झालं ते सरला वैद्य यांच्याशी. जून १९४८ मध्ये २१ वर्षांचे बाळ ठाकरे यांनी सोळा वर्षांच्या सरला वैद्य यांच्याशी विवाह झाला. माहेरच्या सरला वैद्य सासरी येवून मिनाताई झाल्या. बाळासाहेब व मिनाताईंना तीन मुलं. सगळ्यात थोरले बिंदुमाधव, मधले जयदेव ठाकरे आणि धाकटे उद्धव ठाकरे.

पैकी सर्वात थोरले बिंदुमाधव यांना ‘बिंदा’ या टोपन नावानेच ओळखलं जायचं. त्यांनी कधीही सक्रिय राजकारणात येण्याचा कल दाखवला नव्हता. सुरुवातीला त्यांनी स्वत:ची व्हिडिओ कंपनी सुरू केली आणि नंतर फीचर फिल्म्सच्या निर्मितीकडे वळले. ‘अग्निसाक्षी’ या चित्रपटाच्या निर्मितीतून ते प्रकाशझोतात आले.

त्यांचं लग्न माधवी ठाकरेंशी झालं. बिंदुमाधव व माधवी यांना दोन मुलं. एक मुलगा व एक मुलगी. मुलाचं नाव निहार ठाकरे तर मुलीचं नाव नेहा ठाकरे. २० एप्रिल १९९६ रोजी लोणावळा इथं एका मोटार अपघातात बिंदा यांचा मृत्यू झाला.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत या कुटूंबाचं पटलं नाही असच दिसतं. कारण अलीकडेच निहार ठाकरे यांचं लग्न इंदापूरचे नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांच्याशी झालं. तेव्हा निहार ठाकरे राज ठाकरेंच्या कुटूंबाला पत्रिका देण्यासाठी गेले होते. नुकतीच निहार ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, त्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले. 

निहार यांची बहिण नेहा ठाकरे यांचं लग्न डॉ. मनन ठक्कर यांच्यासोबत झालं. मनन ठक्कर हे मुस्लीम आहेत अशी अफवा त्यावेळी पाकिस्तानपर्यंत पोहचली होती. आजही अनेकजणांना ते खरं वाटतं. ठक्कर हे गुजराती कुटूंबातून आलेले आहेत.

हे झालं बिंदुमाधव यांच्या कुटूंबाचं. त्यानंतर नंबर लागतो तो जयदेव ठाकरे यांचा…

जयदेव ठाकरेंची तीन लग्न झाली. पहिल्या पत्नीचं नाव जयश्री ठाकरे, दूसऱ्या पत्नीचं नाव स्मिता ठाकरे आणि तिसऱ्या पत्नीचं नाव अनुराधा ठाकरे.  

जयदेव यांना पहिली पत्नी जयश्री यांच्यापासून जयदीप, दूसरी पत्नी स्मिता ठाकरे यांच्यापासून राहूल आणि ऐश्वर्य आणि तिसरी पत्नी अनुराधा यांच्यापासून माधुरी अशी एकूण चार मुलं आहेत. यापैकी जयदीप ठाकरे हे सध्या आर्ट डिरेक्टर, ग्राफीक्स डिझायनर म्हणून कार्यरत आहेत. राहूल ठाकरे हे मराठी व हिंदी सिनेमासाठी लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून कार्यरत आहेत.

स्मिता ठाकरे यांच्याशी २००४ मध्ये घटस्फोट झाल्यानंतर जयदेव ठाकरे यांनी अनुराधा ठाकरे यांच्याशी लग्न केलं. त्यांना माधुरी नावाची मुलगी आहे.

आता येउयात उद्धव ठाकरे यांच्याकडे…

१९८९ मध्ये उद्धव ठाकरेंचा रश्मी ठाकरे यांच्याशी विवाह झाला. त्यांना दोन मुलं आहे. पहिले आदित्य ठाकरे आणि दुसरे तेजस ठाकरे. यातील आदित्य ठाकरे हे राजकारणात सक्रिय आहेत. गेल्या सरकारमध्ये त्यांनी पर्यावरणमंत्री होते. तर धाकटा मुलगा तेजस हा वन्यजीव अभ्यासक म्हणजेच वाईल्डलाईफ रिसर्चर आहे, खेकड्याची जात शोधण्याचं श्रेय त्यांच्या नावावर आहे.

ही होती बाळासाहेब ठाकरेंची वंशावळ. आता बाळासाहेब ठाकरेंचे धाकटे बंधु श्रीकांत ठाकरे यांच्याकडे येवू…

बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नी मिनाताई यांची बहिण कुंदा यांच्यासोबत श्रीकांत ठाकरेंचं लग्न झालं. श्रीकांत ठाकरे व कुंदा ठाकरे यांना दोन मुलं. एक मुलगा ज्यांच नाव राज ठाकरे आणि एक मुलगी जिचं नाव जयवंती. श्रीकांत ठाकरेंनी आपल्या मुलांची नावं संगीताच्या रागावरून ठेवायचं ठरवलं. मुलाचं नाव स्वरराज, आणि मुलीचं नाव जयवंती ठेवलं. 

जेव्हा स्वरराज व्यंगचित्र काढायला लागला तेव्हा बाळासाहेबांनी त्याचं नाव बदलून नुसतं राज केलं. आणि तेव्हापासून त्यांना राज ठाकरे म्हणून ओळखलं जाऊ लागलं. 

राज ठाकरे यांचा विवाह मराठी सिनेसृष्टीचे छायाचित्रकार, निर्माते आणि दिग्दर्शक मोहन वाघ यांच्या कन्या शर्मिला वाघ यांच्याशी झाला. त्यांना अमित ठाकरे हा मुलगा आणि उर्वशी ठाकरे ही मुलगी. अमित ठाकरे देखील राजकारणात सक्रिय आहेत. सध्या पक्षवाढीसाठी ते महाराष्ट्राचे दौरे करताना दिसत आहेत. नुकतंच त्यांना मुलगाही झालाय ज्याचं नाव ‘किआन’ असं ठेवण्यात आलंय.

आत्ता थोडक्यात एक नजर टाकूया…

केशव सिताराम ठाकरे अर्थात प्रबोधनकार ठाकरेंना पाच मुली व तीन मुलं. पैकी एक अविवाहित राहिला. थोरले बाळासाहेब. त्यांना तीन मुलं. सर्वात थोरले बिंदुमाधव, मधले जयदेव व धाकटे उद्धव. बिंदुमाधव यांना दोन मुलं निहार व नेहा. तर जयदेव यांच्या तीन पत्नी. पहिल्या जयश्री, दूसऱ्या स्मिता आणि तिसऱ्या अनुराधा. जयदेव यांना चार मुलं. जयदीप, राहूल, ऐश्वर्य आणि माधुरी. तर बाळासाहेबांचे सर्वात धाकटे चिरंजीव उद्धव यांना दोन मुलं आदित्य आणि तेजस.

दूसरीकडे प्रबोधनकारांचे धाकटे चिरंजीव श्रीकांत यांना एक मुलगा एक मुलगी. राज आणि जयवंती. राज ठाकरेंना देखील एक मुलगा आणि एक मुलगी. मुलाच नाव अमित तर मुलीचं नाव उर्वशी… 

अशी आहे ठाकरे कुटूंबाची वंशावळ, आत्ता यापुढे ठाकरे कुटूंबातलं कोण कोणाला भेटलं तर कन्फ्यूज होवू नका इतकंच..

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.