श्रीरामाला भारताचा अभिमानबिंदू म्हणणाऱ्या इकबाल यांनी उर्दू मुस्लिमांची नाही असं सांगितलं होतं

पाकिस्तानच्या निर्मितीची कल्पना सर्वप्रथम मांडणारे म्हणून भारतात इकबाल यांना ओळखलं जातं. किंवा ‘सारे जहाँ से अच्छा’ हा कौमी तराणा लिहिणारे कवी म्हणूनही. ऑल इंडिया मुस्लिम लीगचे एक मोठे नेते आणि जिन्ना यांचे सहकारी म्हणून १९३० साली सरहद्द प्रांतात भारतीय मुस्लिमांचे एक राज्य असावं असं त्यांनी सर्वात आधी मांडलं.

देशभक्तीची ओळख देणाऱ्या आणि एकेकाळी नेहरूंना प्रभावित करणाऱ्या या कवीने आपलं सगळं आयुष्य भारतातच व्यतीत केलं. पण त्यांच्या हृदयात नेहमीच एका वेगळ्या देशाची संकल्पना होती. “नवी राष्ट्रे कवीच्या हृदयात तयार होतात” म्हणून त्यांनी ती मांडलीसुद्धा.

त्यांचा संस्कृत, इंग्रजी, उर्दू, पंजाबी, जर्मन आणि फारसी भाषेत हातखंडा होता. प्रभू श्रीराम, गुरु नानक आणि स्वामी रामतीर्थ यांच्या स्तुतीमध्ये त्यांनी अनेक कविता आणि कवने लिहिली.

है राम के वजूद पे हिन्दोस्ताँ को नाज़

अहल-ए-नज़र समझते हैं इस को इमाम-ए-हिंद

प्रभू श्रीराम यांचा उल्लेख ते इमाम-ए-हिंद म्हणून संबोधित करतात. रामाच्याअसण्यावर सगळ्या भारताला अभिमान आहे असं ते म्हणतात. इमामचा अर्थ प्रार्थनेसाठी आपण ज्याच्या मागे उभे असतो असा नेता वा गुरु असा होतो.

शेतकरी वर्गविषयी त्यांना कणव होती. त्यांच्या एका कवितेत तर ते क्रांतीची भाषा बोलतात. ‘लोकशाही आल्यावर जुन्या काळाच्या सगळ्या आठवणी पुसून लोकांनी पुढं यावं. ज्या शेतातून गरीब शेतकऱ्याला भाकर मिळत नाही अशा सगळ्या जहागिरी असणाऱ्या शेतांना आग लावावी’ अशी ईश्वराने माणसाला आज्ञा दिली आहे.

ते सोडा, रशियन राज्यक्रांतीमध्ये शेतकऱ्याचे नेतृत्व करणाऱ्या ब्लादिमीर लेनिन यांच्यावरही त्यांनी कविता केली होती.

‘गौतम बुद्धांचा संदेश भारत विसरला आहे. देशातल्या ब्राह्मणांनी आपल्याच घमेंडीच्या नशेमध्ये धुंद राहून आपल्या देशाचं कधीही न भरून येणारं नुकसान केलं आहे’ असंही ते कवितेत सांगून जातात.

देशातल्या प्रत्येक माणसाला हवाहवासा वाटणारा असा हा कवी होता. म्हणूनच त्यांना शायर-ए-म्शरिक म्हणजे पूर्वेचे महाकवी म्हणून ओळखलं जातं. (अर्थात अलामांनी भारताच्या कवींनी वरदेखलेपणा सोडून थोडे वेडेपणाचे धडेही गिरवले पाहिजेत असं म्हटलं आहे , हा भाग सोडा.)

त्यांना देशाच्या जनतेने म्हणूनच अलामा म्हणजे विद्वान म्हणून उपाधी दिली. थोर लिंगायत गुरुवर्य अलामा प्रभू यांच्यानंतर भारतात इकबाल यांनाच ओळखलं जातं.

 पण या कवीने एकेकाळी उर्दूपासून फारकत घेतली होती. अनुराग भारद्वाज यांनी यासंबंधी लेखन केलं आहे. आज भारतात उर्दू म्हणजे मुस्लिम असं एक समीकरण तयार झाल्याचं दिसतं. पण त्याकाळी इकबाल यांनी काही काळ उर्दू भाषेमध्ये लिहिणं सोडून दिलं होतं.

इस्लामच्या बहुसंख्य लोकांपर्यंत पोचण्यासाठी उर्दू ही एकमेव भाषा वापरणं पुरेसं नाही. त्यामुळे इतर देशांमधल्या मुस्लिम लोकांपर्यंत पोचायचं असेल तर वेगळ्या भाषेचा अवलंब करावा लागेल अशी भूमिका त्यांनी घेतली.

खरं म्हणजे ही भाषा इथल्या सगळ्या लोकांची होती. त्या काळी भारतात उर्दू किंवा हिंदुस्थानी भाषेचे प्राबल्य होते. आजही आपण ज्याला हिंदी सिनेमा म्हणतो त्यात बहुसंख्य शब्द हे उर्दूच असतात.

६ व्या ते १३ व्या शतकात मध्य भारतातल्या शौरसेनी प्राकृत भाषेच्या प्रभावातून उर्दूचा जन्म झाला होता. मुघलांच्या काळात तिचा विकास झाला. शेवटचा मुघल राजा बहादुरशहा जफर स्वतः नामांकित कवी होते. इंग्रजांच्या काळात छावणीत हिंदू आणि मुस्लिम सैनिकांना सोयीसाठी हीच भाषा जवळची होती. त्यामुळे देशात याच भाषेचा प्रसार झाला.

त्या काळातील हिंदू आणि शीख धर्मग्रंथ, लेखन आणि इतर व्यवहार उर्दूमधूनच होत असत. लखनौच्या काही घरांमध्ये अजूनही ३०० वर्षांहून जुन्या महाभारताच्या प्रती आढळतात. 

याच कारणामुळे आलामा इकबाल यांनी उर्दूला मुस्लिम समाजाची भाषा मानण्यास नकार दिला असं अनुराग भारद्वाज सांगतात.

१९१० साली आलामा इकबाल यांनी एक लेख लिहिला होता. त्याचं नाव आहे “मिल्लत-ए-बैजा पर इक इम्रानी नज़र”. म्हणजे ‘श्वेतवर्णीय लोकांच्या धर्मावर म्हणजेच इस्लामचं एक विश्लेषण’. जगभर पसरलेल्या मुस्लिम समुदायाला मिल्लत-ए-बैजा असं म्हणतात. किंवा कुरानला अनेकदा ‘किताब-ए-मिल्लत-ए-बैजा’ म्हणूनही ओळखलं जातं.

यात ते फारसी भाषेचा इस्लामी विचार घडवण्यामागचा इतिहास सांगतात. त्याबरोबरच भविष्यातील मुस्लिम समुदायावर फारसीचा काय प्रभाव असेल याचंही वर्णन करतात. त्यांच्या मते फारसी हीच मुस्लिम जगताची भाषा असेल.

एवढंच नाही, ‘मक़ालात-ए-इकबाल’मध्ये ‘इराणवर मिळवलेला विजय ही इस्लामच्या इतिहासातील सर्वात महत्त्वपूर्ण घटना होती’ याचाही ते उल्लेख करतात. १२६व्या पानावर ‘इस्लामी संस्कृतीसाठी पर्शियन भाषेची भूमिका सर्वात महत्त्वाची, निर्णायक आणि अटळ राहील’ हेही ते सांगून जातात.

डॉ. अली रझा ताहीर यांनी आपल्या लेखांमध्ये आणि प्रबंधांमध्ये याचा विस्ताराने उल्लेख केला आहे.

यात इकबाल हे उर्दूपासून कसे दूर होत गेले याचा आराखडा मांडला आहे.

त्याच्या मते फारसी भाषा ही उर्दूपेक्षा समृद्ध होती. आकलनाच्या आणि लिखाणाच्या दृष्टीने फारसीने त्यांना उर्दूपेक्षा मोठा अवकाश उपलब्ध करून दिला होता. आपल्या युरोपच्या भेटीत ते काही काळ आजारी होते.

या काळात त्यांना उर्दू साहित्य मिळणे अवघड होते. त्या काळात त्यांनी फारसी साहित्याचा अभ्यास केला. आपले विचार व्यक्त करण्यासाठी फारसी ही उर्दूपेक्षा उजवी भाषा आहे असं त्यांना जाणवलं. त्यामुळे त्यांनी आपल्या कविता आणि साहित्यासाठी फारसी भाषेची निवड केली. म्हणूनच त्यांचं बहुतेक गाजलेलं साहित्य हे फारसी भाषेमध्ये आहे.

इकबाल देशभक्तीपासून इस्लामकडे वाहत गेले असल्याचं निरीक्षण नेहरूंनी आपल्या लेखनात नोंदवलं आहे. जवळचे मित्र असूनही नेहरू यांनी हा गोष्टीसाठी इकबाल यांच्यावर टीका केली.

यामुळे समाज एकमेकांपासून दुरावत गेला. त्यांना मानणारे लोकही भारतापासून दूर होत गेले. इथल्या सामूहिक परंपरेचा ऱ्हास झाला. देशाविषयी वाटणारी कणव कमी होऊन त्याची जागा एका वेगळ्या भीती आणि तुटलेपणाच्या भावनेने घेतली. याची परिणीती पुढे पाकिस्तानच्या निर्मितीत झाली.

पण आज तेथेच बहुसंख्य उर्दूभाषिक भारतातून मिळालेला उर्दूचा वारसा जपून आहेत. तुटलेपणाच्या भावनेमधून पाकिस्तानची राजकीय समाज अजून दूर झाली नसल्याचंही अनेक संशोधनामध्ये सिद्ध झालं आहे.

हे दोन्ही देश पुन्हा एकत्र होतील अशी भीती तेथील राजकारण्यांना सतत सतावत असते, म्हणून पाकिस्तानात धर्मांधता आणि मुल्ला-मौलवींचं प्राबल्य वाढल्याचं अनेक संशोधक सांगतात. त्यामुळं आपल्या या कार्यात अलामा किती यशस्वी झाले हा प्रश्न उरतोच.

पूर्वेच्या आणि पश्चिमेच्या २८५ वैशिष्ट्यांच्या नोंदी त्यांनी आपल्या कवितेत केल्या आहेत. कदाचित त्यांनी हे उर्दूत केलं असतं तर पूर्वेच्या वैशिष्टयांमध्ये अजून भर पडली असती असं म्हणायला वाव आहे.

  • भिडू वैभव वाळुंज

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.