बॅन चायना बाजूला राहिलं, आता इस्रोनंच ओप्पोसोबत करार केलाय

गेल्या वर्षीची दिवाळी आठवतेय काय? लाईटच्या माळा असतील किंवा डेकोरेशनचं सामान, प्रत्येक गोष्ट खरेदी करताना कित्येकांनी ‘मेड इन चायना’चं लेबल आहे का नाही हे चेक केलं जायचं. जर हे लेबल असेल, तर गोष्ट घ्यायची नाही म्हणजे नाही, असं कित्येकांनी ठरवलं होतं. एवढंच काय ‘बॅन चायना’ हा ट्रेंड इतका फॉर्ममध्ये आला की, बीसीसीआयनं काही शे कोटींचं नुकसान सोसलं पण ओप्पो या चायनीज कंपनीकडून स्पॉन्सरशिप घेतली नाही.

हा बॅन चायना ट्रेंड येण्यामागचं कारण म्हणजे भारत आणि चीन सीमेवर वाढलेला तणाव. चीनी सैनिकांच्या कुरापती, भारतीय सैन्याशी होणारा संघर्ष, भारताच्या भूभागात होणारा चीनचा शिरकाव आणि कोरोनानं घातलेलं थैमान अशी अनेक कारणं या बॅन चायना ट्रेंडमागं होती. सरकारनंही चायनीज ॲप्सवर बंदी घातली आणि चीनभोवतीचा फास आणखी आवळला.

अजूनही भारत-चीन सीमेवर सातत्यानं काही घडत असतंच, पण सध्या बॅन चायना हा ट्रेंड काही फॉर्ममध्ये नाही. ओप्पोचे मोबाईल मात्र चांगलेच फॉर्ममध्ये आहेत. आता पांढरे फोटो येतात, उगा फिल्टर लावून माणसं गोरी येतात अशा कितीही शिव्या घातल्या तरी लय जणांच्या खिशात ओप्पोचे मोबाईल दिसतातच.

हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे नुकतीच समोर आलेली एक बातमी. इस्रो म्हणजे आपल्या भारतीयांचा मानबिंदू. गेल्या अनेक वर्षांमध्ये इस्रोनं विविध मोहिमा यशस्वी करत भारताची मान उंचावली, सोबतच अवकाश विज्ञान क्षेत्रात भारताचं वर्चस्व निर्माण केलं. याच इस्रोनं आता चायनीज कंपनी ओप्पोसोबत करार केला आहे.

अजूनही इस्रोनं या कराराबद्दल कोणतंही भाष्य केलेलं नाही. मात्र ओप्पो इंडियानं ट्विटर पोस्टद्वारे कराराची घोषणा केली आहे. ते म्हणाले, ‘आत्मनिर्भर भारताच्या योजनेला पाठिंबा देण्यासाठी आम्ही इस्रोसोबत करार केला आहे. इस्रोला चांगल्या दर्जाच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट क्षमता प्रदान करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. वापरकर्त्यांसाठी सोयीस्कर ठरणारं ‘NavIC’ ॲप्लिकेशन तयार करण्याचं उद्दिष्ट ठेवून, आम्ही एकत्रितपणे चांगलं भविष्य घडवण्यासाठी एक नवीन प्रवास सुरू करत आहोत,’

या करार नेमका कशासाठी आहे?

इस्त्रो आणि ओप्पो मिळून ‘NavIC’ मेसेज सेवा भारतीय वापरकर्त्यांना मोबाईलवर वापरता येईल यावं काम करणार आहेत. भारतीय वापरकर्त्यांच्या दृष्टीनं ही सेवा आणखी जलद व वापरण्यासाठी सुलभ कशी होईल, याकडंही या दोन कंपन्यांकडून लक्ष दिलं जाईल.

‘NavIC’ काय आहे?

NavIC चा अर्थ आहे, ‘नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन.’ भारतातल्या गंभीर राष्ट्रीय सेवांसाठी या स्वतंत्र सॅटेलाईटवर आधारित असणाऱ्या या मेसेजिंग सेवेचा वापर करण्यात येईल. ही सेवा याआधीही ‘इंडियन रेजिनल नॅव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टीम’ या नावानं वापरात होती. या मागचं मुख्य उद्दिष्ट वापरकर्त्याला बऱ्यापैकी चांगल्या अचूकतेसह विश्वसनीय लोकेशन सुविधा, नेव्हिगेशन आणि अचूक वेळ सांगणं हे आहे.

या करारामुळं सोशल मीडियावर वापरकर्त्यांनी इस्रोला लक्ष्य केलं आहे. चायनीज कंपनीशी करार करताना, भारताची संवेदनशील माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल, कशावरुन चीन त्याचा दुरुपयोग करणार नाही, असा अनेकांच्या टीकेचा सूर आहे. अनेकांनी, ‘एका बाजूला आपण चीनची कोंडी करायला बघतोय आणि भारतीय संस्था चिनी कंपन्यांशी करार करत आहेत, हा विरोधाभास का?’ अशी टीका केली आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.