इस्रोच्या बैलगाडीतून आलेल्या ॲपलमुळे संपूर्ण भारतात दूरसंचार क्रांती सुरु झाली..

सगळ्या भारताला अभिमान वाटावी अशी घटना म्हणजे चांद्रयान-३ नं चंद्रावर केलेलं यशस्वी लँडिंग. १४ जुलैला सुरु झालेल्या प्रवासाचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा चांद्रयानानं अत्यंत यशस्वीपणे पार पाडला आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला.

आज भारत देश हे यश साजरं करतोय, ते इस्रोचे शास्त्रज्ञ आणि टीमच्या अपार मेहनतीमुळं. चांद्रयान-२ चं लँडिंग अपयशी ठरल्यानंतर इस्रोनं परत नव्या ताकदीनं चांद्रयान-३ ची तयारी केली आणि मिशन यशस्वीही करुन दाखवलं. ज्या इस्रोमुळं देशाला हा अभिमानाचा क्षण अनुभवता आला, त्या इस्रोनं एकेकाळी बैलगाडीवरुन उपग्रह नेला होता, भारतात दूरसंचार क्रांती करण्यासाठी.

या उपग्रहाने त्या काळातलं जगणं सुकर केलं आणि भारतीय संशोधकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला, हा होता ॲपल उपग्रह.

ॲपल फोन यायच्या आधीचा, पण आपला भारतीय ॲपल उपग्रह. तो कम्युनिकेशन सॅटेलाईट होता आणि त्याचीच ही गोष्ट. पण त्याची माहिती घेण्याआधी थोडी पार्श्वभूमी बघूया.

ज्यावेळी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशाचा बहुतांश भाग मध्ययुगातच जगत होता. आधुनिक शिक्षणाचा गंधही देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचला नव्हता. जगभरात कोणत्या प्रकारच संशोधन चाललय, जग कुठे निघालय याचा पत्ताच भारतीयांना इंग्रज सत्तेने लागू दिला नव्हता. आपल्या सोयीला पडेल तेच शिक्षण आणि तेवढाच विकास भारतात करणे हेच त्यांचे धोरण होते.

आता येणाऱ्या जगात अणुविज्ञानापासून ते अंतराळशास्त्राला महत्व येणार हे उघडपणे दिसत होतं. इंग्रज देश सोडून जाणार याची चाहूल लागताच शांती स्वरूप भटनागर आणि नेहरू यांनी जोर लावून सरकारला कौन्सिल ऑफ सायंटीफिक रिसर्चची स्थापना करायला लावली. यातूनच देशभरात विविध रिसर्च लॅब सुरु करण्यात आल्या.

पुढं भारतात अहमदाबाद येथे फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीची स्थापना डॉ. विक्रम साराभाई यांनी केली तर होमी भाभा यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चची स्थापना केली होती.

१९५७ साली रशियाचा स्पुटनिक हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षा तोडून अंतराळात पोहचला. जगभरासाठी ही क्रांतिकारी घटना होती. भाभा यांच्या नेतृत्वाखाली फक्त अंतराळ संशोधनासाठी एका विशेष संस्थेची निर्मिती करावी का याच्या अभ्यासासाठी एक समिती बसवण्यात आली होती आणि इस्रोची स्थापना झाली.

त्यानंतर आर्यभट्ट अंतराळात सोडण्याचा प्रयोग झाला. पण ते आपल्यासाठी पुरेस नव्हतं. मग १९ जून १९८१ मध्ये पूर्णतः भारतात बनवलेला ॲपल हा भारताचा पहिला सॅटेलाईट उपग्रह फ्रेंच गियाना येथील गुरू अवकाश तळावरून सोडण्यात आला.

युरोपियन स्पेस एजन्सी इस्सा या संस्थेकडे विकसनशील उड्डाणाचा तंत्र उपलब्ध असल्याने इस्रोने या ॲपल उपग्रहाच्या प्रक्षेपण अभियानासाठी त्यांचं सहकार्य मागितलं आणि त्यांनी आपल्याला हे सहकार्य विनामूल्य देऊ केलं होतं.

वास्तविक त्या काळात ॲपल उपग्रह बनवण्यासाठी पुरेशा सुविधा नव्हत्या तरीही इस्त्रोने एका शेडमध्ये दोन वर्षाच्या अल्पशा अवधीत हा आठशे सत्तर किलो वजनाचा उपग्रह तयार केला.

पण यामध्ये मुख्य अडचण अशी आली की अंतरिक्षात सोडल्यावर ॲपल वरील दोन सौर पट्ट्यांपैकी एक पट्टी यशस्वीरित्या उघडली पण दुसरी पट्टी उघडण्यात अपयश आलं. त्यामुळ वीजपुरवठा न होता ते बंद पडलं.

पण ॲपलमुळे अनेक महत्त्वाच्या गोष्टी साध्य झाल्या.

एक म्हणजे भारताने शैक्षणिक कारणासाठी साईट हा प्रकल्प हाती घेतला होता. त्यासाठी अमेरिकेचा उपग्रह एक वर्षासाठी उपलब्ध होणार होता. ॲपल उपग्रहाचा कार्यक्रम यशस्वी ठरल्याने त्यामुळे साईट प्रकल्पातील काम सुरू राहील. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ॲपलच्या साह्याने आपत्कालीन दूरसंचार सेवा पुरवण्याचा उद्देश सफल ठरला.

भूकंप वादळ पूर आदींसारख्या नैसर्गिक आपत्ती ओढवल्यावर आपत्तीग्रस्त भागात ॲपल सारख्या उपग्रहाद्वारे पर्यायी दूरसंचार व्यवस्था प्रस्थापित करून आपदग्रस्त लोकांना मदत पोहोचवणं शक्य झालं.

शेवटचं आणि महत्वाचं म्हणजे या ॲपलला ‘ॲपल’ अस नाव का पडलं ?
तर एरिया फॉर पॅसेंजर पे लोड एक्सपेरिमेन्ट हे त्याचं संक्षिप्त नाव. आणि त्यावरूनच ॲपल हे नाव पडलं. जेव्हा तो लाँच करायचा होता तेव्हा त्याची वाहतूक भारतीय शास्त्रज्ञांनी बैलगाडीतून केली होती. आणि अशा पद्धतीत जुगाड करून बनवलेल्या या उपग्रहाने भारताला दोन वर्ष अवकाश क्षेत्रात साथ दिली.

ॲपल भारताचा अभिमान होता!

या सॅटेलाईटचा वापर टेलिव्हिजन आणि रेडीओ ब्रॉडकास्टिंग साठी करण्यात आला. हा क्षण भारतासाठी अभिमानास्पद होता. ॲपलला १३ ऑगस्ट १९८१ ला देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशाला समर्पित केलं.

आणि हीच भारताच्या दूरसंचार क्षेत्राची नांदी होती.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.